घरताज्या घडामोडीगाडी जप्त झाली, मग फाडला ५० लाखांचा धनादेश

गाडी जप्त झाली, मग फाडला ५० लाखांचा धनादेश

Subscribe

मालमत्ता कर न भरणाऱ्या विरोधात यंदा प्रथमच अधिक कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे

आपल्या परिसरातील मालमत्ता कर न भरणाऱ्या विरोधात यंदा प्रथमच अधिक कठोर पावले उचलणाऱ्या महापालिकेने थकबाकीदारांची वाहने, फर्निचर, टीव्ही, फ्रिज आदी वस्तू जप्त करण्यास गेल्या आठवड्यापासून सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने आज ‘के पूर्व’ विभागातील अंधेरी एमआयडीसी परिसरात असणाऱ्या ‘ई सी एच डी सिल्क मिल्स’ या कंपनीची इनोव्हा कार जप्त करण्यात आली. कार जप्ती नंतर खडबडून जागे झालेल्या कंपनीने तातडीने 50 लाखांचा धनादेश महापालिकेच्या विभाग कार्यालयाकडे जमा करत जप्त केलेली कार सोडवून नेली आहे; अशी माहिती के पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी दिली आहे.

अंधेरी एमआयडीसी परिसरात असणाऱ्या भूखंड क्रमांक ए ६९ या कंपनीकडे तब्बल १ कोटी ९६ लाख ८७ हजार २७६ रुपयांची थकबाकी मालमत्ता करापोटी होती. महापालिकेच्या नियमानुसार वेळोवेळी नोटीस बजावून व वारंवार सूचना देऊन देखील सदर कंपनीद्वारे मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ केली जात होती.

- Advertisement -

मालमत्ता कर भरण्यास केली जात असलेली टाळाटाळ बघून आज अखेरचा उपाय म्हणून या कंपनीची चल संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार सर्वप्रथम या कंपनीच्या मालकीची इनोव्हा कार आज सकाळी जप्त करण्यात आली. त्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधीने महापालिकेच्या ‘के पूर्व’ विभाग कार्यालयात धाव घेत ५० लाख रुपयांच्या पहिल्या हप्त्याचा धनादेश महापालिकेच्या करनिर्धारक व संकलन खात्यातील कर्मचाऱ्यांकडे सुपुर्द केला. हा धनादेश प्राप्त झाल्यानंतर व उर्वरित रक्कम देखील लवकरात लवकर भरण्याची हमी देण्यात आल्यानंतर जप्त केलेली इनोवा कार सोडण्यात आली आहे.

नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा अव्याहतपणे देणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे जमा करावयाचा मालमत्ता कर भरावयास टाळाटाळ करणाऱ्यांवर महापालिकेची धडक कारवाई गेल्या आठवड्यापासून अव्याहतपणे सुरू आहे. या कारवाई अंतर्गत महापालिकेच्या सव्वाशे वर्षांच्या इतिहासात यंदा प्रथमच चला संपत्ती जप्त करण्याची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महापालिका क्षेत्रात मालमत्ताकर थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. वाहन वा इतर वस्तू जप्ती सारखी अप्रिय कारवाई होऊ नये, यासाठी मालमत्ता कर थकबाकी दारांनी शेवटच्या तारखेची वाट न बघता मालमत्ता कर तातडीने महापालिकेकडे जमा करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने द्वारे करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -