घरCORONA UPDATEआयुर्वेद, होमिओपॅथीला गैरवैद्यक ठरवल्याप्रकरणी एमसीआयएमचे केंद्राला पत्र

आयुर्वेद, होमिओपॅथीला गैरवैद्यक ठरवल्याप्रकरणी एमसीआयएमचे केंद्राला पत्र

Subscribe

आयुर्वेद आणि होमिओपॅथीच्या डॉक्टरांचे मनोबल खच्चीकरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही जाहिरात तातडीने रद्द करण्याबरोबरच संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी.

कोरोनाचा सामना करण्यासाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चमार्फत (आयसीएमआर) पदभरती संदर्भात काढलेल्या जाहिरातीच्या परिपत्रकात आयुर्वेद आणि होमिओपॅथीच्या डॉक्टरांचा गैरवैद्यक असा उल्लेख करत त्यांना दुय्यम वागणूक देण्यात आली आहे. यामुळे आयुर्वेद आणि होमिओपॅथीच्या डॉक्टरांचे मनोबल खच्चीकरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही जाहिरात तातडीने रद्द करण्याबरोबरच संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी. तसेच पुन्हा असा प्रकार घडणार नाही अशा सूचना आयसीएमआरला देण्यात याव्यात असे पत्र महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनकडून (एमसीआयएम) केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना पाठवण्यात आले आहे.

कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आयसीएमआरने एसएई कोओर्डीनेटर कन्सल्टंट आणि प्रोजेक्ट अँड रेग्युलेटर कोओर्डीनेटर या दोन पदांची भरती काढली. यासाठी आयसीएमआरकडून काढण्यात आलेल्या जाहिरातीत वैद्यक आणि गैरवैद्यक अशा दोन गटात भरती करण्यात येणार आहे. मात्र वैद्यक गटात एमबीबीएस, पदव्युत्तर, डिप्लोमा, एमडी केलेल्या डॉक्टरांचा समावेश केला आहे. तर गैरवैद्यक गटामध्ये बीएएमएस, बीएचएमएस पदवीधारकांचा उल्लेख केला आहे. आयुर्वेद आणि होमिओपॅथी हे वैद्यक शास्त्राचा भाग असून भारतीय वैद्यक पद्धती म्हणून जगभरात प्रसिद्ध असतानाही आयसीएमआरकडून बीएएमएस, बीएचएमएस पदवीधारकांना गैरवैद्यकीय ठरवत भारतीय उपचार पद्ध्तीला दुय्यम दर्जा दिला आहे. भारतीय चिकित्सा पद्धतीने आरोग्य क्षेत्रात आपले बहुमोल योगदान दिले आहे. कोरोनाच्या महामारीतही भारतीय चिकित्सा पद्धतीचे चिकित्सक संशोधन, चिकित्सक सेवा आणि मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहेत. असे असतानाही आयसीएमआरकडून आयुर्वेद आणि होमिओपॅथीचा उल्लेख ‘नॉन मेडिकल’ असा अपमानजनक करण्यात आला आहे. यामुळे आयुर्वेद आणि होमिओपॅथीच्या डॉक्टरांचे मानसिक खच्चीकरण होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

ही जाहिरात तातडीने रद्द करण्यात यावी. तसेच संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी एमसीआयएमचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना पत्र लिहून केली आहे. तसेच असा प्रकार पुन्हा करण्यात येऊ नये अशा सूचना आयसीएमआरला देण्यात याव्यात असेही पत्रात नमूद केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -