घरमुंबईमीटर रिडिंगला बाय बाय

मीटर रिडिंगला बाय बाय

Subscribe

दाराबाहेर नीट दिसत नसलेला, घरात पेटीत लपवलेला, मीटर केबिन लॉक असलेला, रिडिंग न दिसणारा असे वीज मीटरसोबत चालणारे लपवाछपवीचे प्रकार आता मोडीत निघणार आहेत. वीज मीटर रिडिंगसाठी मेहनत घेणार्‍या एजन्सींच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी आता महावितरणने एक पाऊल पुढे जात मीटर रिडिंगसाठी नवीन तंत्रज्ञान आणले आहे. मानवी हस्तक्षेपामुळे वीज मीटरमधील फेरफार तसेच चुकीचे मीटर रिडिंग यासारखे प्रकार या नव्या तंत्रज्ञानामुळे यापुढे आटोक्यात येण्यासाठी मदत होईल. रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञानामुळे महावितरण कंपनीतील मीटर रिडिंगची वर्षानुवर्षे असणारी परंपरा मोडीत काढणार आहे.

आरएफ मीटरच्या ऑटोमॅटिक तंत्रज्ञानामुळे अधिकाधिक अचूक मीटर रिडींग ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वीजबिलाशी संबंधित तक्रारीही कमी होतील. वीज ग्राहकांचे बिलिंगशी संबंधित विषय मार्गी लावण्यासाठी आरएफ मीटरचा प्रायोगिक प्रकल्प राबवणार असल्याची माहिती महावितरणने राज्य वीज नियामक आयोगाला दिली होती. या प्रायोगिक प्रकल्पाअंतर्गत ८.५ लाख मीटर महावितरणने खरेदी केले आहेत. सध्या राज्यात ५३१ मीटर रिडिंगच्या एजन्सी आहेत.

- Advertisement -

राज्यात लातूर, जळगाव आणि अहमदनगर याठिकाणी प्रायोगिक तत्वावर आरएफ मीटरचा प्रयोग होणार आहे. या भागातील विजेची गळती सर्वाधिक आहे. त्यामुळे सातत्याने याठिकाणी वीजमीटरचे मॉनिटरींग करणे हे आरएफ तंत्रज्ञानामुळे शक्य होईल.

महावितरणला येणार्‍या तक्रारींमध्ये सर्वाधिक तक्रारी या विजेच्या मीटर रिडींगशी संबंधित असतात. चुकीच्या मीटर रिडिंगमुळेच अनेकदा महावितरणला सरासरी वीजबिलही नाईलाजाने द्यावे लागते. पण आरएफ मीटरच्या ऑटोमॅटिक तंत्रज्ञानामुळे प्रत्येक दिवसाच मीटर रिडींग महावितरणच्या सर्व्हरमध्ये अपडेट होणार आहे. वीज ग्राहकांच्या वीज वापरातील कमी अधिक प्रमाणदेखील या यंत्रणेच्या माध्यमातून सातत्याने मॉनिटर करणे शक्य होईल. त्यामुळे महावितरणचे स्थानिक कर्मचारी आणि वीज चोरी करणारे समाजकंटक यांच्यातील गैरप्रकारांंचे चक्र तोडण्यासाठी आरएफ तंत्रज्ञान महत्वाच ठरणार आहे. आरएफ मीटर अंमलबजावणीसाठी एका खाजगी कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी तसेच देखभालीसाठी पाच वर्षाचा कालावधी आहे.
काय आहे आरएफ तंत्रज्ञान

- Advertisement -

वीज ग्राहकांना वीज पुरवठा करणार्‍या ट्रान्सफॉर्मरच्या ठिकाणी डेटा कॉन्सट्रेटर युनिट (डीसीयू) हे उपकरण बसविण्यात येईल. डीसीयूचे वैशिष्ठ्य म्हणजे हे ऑटोमॅटिक पद्धतीने वीज ग्राहकांच्या मीटरचा डेटा कॅप्चर करून सर्व्हरला पाठवतो. डीसीयू उपकरणासाठी सीम कार्ड बसवण्यात येते. आरएफ तंत्रज्ञानाचा वापर करत हा सगळा डेटा सर्व्हरला पाठवण्यात येतो. या सगळ्या प्रक्रियेत कोणताही मानवनिर्मित हस्तक्षेप नसतो. डीसीयूच्या माध्यमातून सरासरी २०० ते ३०० मीटरचे रिडिंग घेणे शक्य आहे.

पॉईंटर्स
राज्यातील महावितरणचे वीज ग्राहक २.५ कोटी
राज्यातील मीटर एजन्सी ५३१
प्रायोगिक प्रकल्प – लातूर, जळगाव, नगर
आरएफ मीटर खरेदी – ८.५ लाख

आरएफ तंत्रज्ञानामुळे वीज ग्राहकांच्या बिलिंग सायकलची अतिशय वेगाने माहिती अपडेट होणार आहे. महत्वाचे म्हणजे महावितरणला सध्याच्या बिलिंग पद्धतीसाठी मोजावा लागणारा पैसाही या तंत्रज्ञामुळे कमी होणार आहे. सध्याच्या यंत्रणेच्या तुलनेत हे तंत्रज्ञान मीटर रिडिंगच्या पद्धतीत अधिक पारदर्शकता आणि सुसूत्रता आणेल, असा विश्वास वाटतो. प्रायोगिक प्रकल्पाच्या यशानंतर संपूर्ण राज्यात या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा विचार होईल.
– दिनेशचंद्र साबू, संचालक (प्रकल्प), महावितरण.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -