घरताज्या घडामोडीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘देवनार’ला जनावरांचा बाजार भरवण्यास मनसेचा विरोध

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘देवनार’ला जनावरांचा बाजार भरवण्यास मनसेचा विरोध

Subscribe

मागील तीन महिन्यांपासून बंद असलेला देवनार कत्तलखाना मागील आठ दिवसांपासून सुरू झाला आहे. मात्र, या देवनार कत्तलखान्यात बकरी ईद निमित्त जनावरांचा बाजार भरवला जात असून या जनावरांच्या खरेदीसाठी मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यातून अनेक नागरिक येत असतात. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारच्या गर्दीमुळे या आजाराचा संसर्ग होण्याची भीती लक्षात घेता हा बाजार न भरवण्याची सूचना मनसेचे सरचिटणीस राजा चौघुले यांनी देवनारच्या महाव्यवस्थापकांना पत्र देऊन यंदा बाजार भरवण्यास परवानगी देऊ नये अशी सूचना केली आहे. आपण कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून कोणत्याही धर्माच्या भावनेचा अनादर व्हावा म्हणूनही आपण ही मागणी करत नसल्याचेही चौघुले यांनी स्पष्ट केले.

मुंबईत एका बाजुला कोरोनाच्या आजाराचा धोका लक्षात घेता दहिहंडीसह गणेशोत्सवावर निर्बंध आणत हे गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने हे उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे निर्देश सरकारने दिले आहे. त्याच धर्तीवर बकरी ईदचा सणही याचप्रकारे साधे पणाने साजरा केला जायला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. बकरी ईद निमित्त भरणारा बकऱ्यांचा, जनावरांच्या बाजारात विविध राज्यातून व्यापारी व त्यांचे कामगार येतात. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडून सगळे नियम पायदळी तुडवून आपण कोरोनाच्या महामारी वाढीसाठी एकप्रकारे हातभारच लावला जाणार आहे. या हा बाजार भरला तर मुंबईत तसेच मुंबई बाहेरही कोरोनाच्या महामारीचा प्रसार जोरात होईल आणि त्यात एम विभागातील रहिवाशी, मुंबईतील नागरिक आणि महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी, पोलीस तसेच इतर वर्गाला बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीकोनातून देवनार पशुवधगृहात बकरी ईद निमित्त कुर्बानीकरता जनावरांचा बाजार आपण भरवू नये अशी अशाप्रकारची सूचना पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक योगेश शेट्ये यांना पत्राद्वारे केली आहे. आपण याची माहिती महापालिका प्रशासन व राज्य सरकारला द्यावी, असेही राजा चौघुले यांनी या निवेदनात म्हटले आहे. परंतु आपण योग्य निर्णय न घेता हा बाजार भरवण्यास परवानगी दिल्यास पुढे जी परिस्थिती उद्भवेल त्याला आपण, मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र शासन जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

- Advertisement -

अशाप्रकारे बाजार भरवल्यास त्याचा मोठा ताण पोलीस यंत्रणेवर पडणार आहे. आधीच कोरोनामुळे पोलीस अतिशय तणावाखाली काम करत आहेत. त्यातच हा बाजार संवेदनशील विभागातील आहे. त्यामुळे काही विपरित घडल्यास कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे आपण कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून कोणत्याही धर्माच्या भावनेचा अनादर व्हावा म्हणूनही आपण ही मागणी करत नसल्याचेही चौघुले यांनी या निवेदनात स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -