घरमुंबईमुंबई पोलिसांकडून तब्बल साडे तीन कोटींचा मुद्देमाल परत

मुंबई पोलिसांकडून तब्बल साडे तीन कोटींचा मुद्देमाल परत

Subscribe

मध्य प्रादेशिक विभागाच्या भायखळा येथील कार्यलयात मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला होता.

चोरीला गेलेला ऐवज अथवा एखाद्या गंभीर गुन्ह्यात गेलेला मुद्देमाल परत मिळेल का? असा प्रश्न तक्रारदारांना पडतो, तर अनेकजण चोरीला गेलेल्या ऐवजावर पाणी सोडून देतात. मुंबई पोलिसांनी मागील काही महिन्यांत मुंबईत घडलेल्या गुन्ह्यांत, तसेच उघडकीस आणलेल्या गुन्ह्यांत हस्तगत करण्यात आलेला सुमारे साडे तीन कोटी रुपयांचा ऐवज मंगळवारी तक्रारदारांना परत केला. चोरीला गेलेले मंगळसूत्र, तसेच दागिने तक्रारदारांना मुंबई पोलिसांनी परत दिले.

मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबई पोलीस दलाची धुरा हाती घेताच मुंबईत घडणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचबरोबर गुन्हे उघडकीस आणून चोरीला गेलेले ऐवज अथवा मुद्देमाल जप्त करून तो तक्रादारांना परत मिळवून देण्यावर भर दिला आहे. मुंबईत मागील काही महिन्यांत घडलेल्या गुन्ह्यांची उकल करून हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल, ऐवज तक्रारदारांना परत देण्यासाठी मुंबई पोलिसांकडून कार्यक्रम राबवण्यात आला आहे.

- Advertisement -

या कार्यक्रमाची सुरुवात मध्य प्रादेशिक विभागातून करण्यात आली आहे. मंगळवारी मध्य प्रादेशिक विभागाच्या भायखळा येथील कार्यलयात या मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमात मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या हस्ते सुमारे साडे तीन कोटी रुपयाचा मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात आला. या मुद्देमालात सर्वाधिक सोन्याचे दागिने, महिलांचे मंगळसूत्रे, सोनसाखळीचा समावेश होता.

एकट्या भायखळा पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांत सुमारे एक कोटी ३० लाख रुपयांचा मुद्देमाल तक्रादारांना परत करण्यात आला आहे. तसेच दादर, सायन पोलीस ठाण्यातील फसवणूक, जबरी चोरी, सोनसाखळी चोरी इत्यादी गंभीर गुन्ह्यांतील सुमारे २ कोटींचा ऐवज परत करण्यात आला आहे. खून, दरोडा, या गुन्हयातील २४ लाख रुपयांचा ऐवज परत करण्यात आला आहे. याप्रसंगी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण आणि पोलीस आयुक्त तसेच सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम पार पडला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -