घरठाणेमुंबई, ठाणे,नवी मुंबईतील शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद

मुंबई, ठाणे,नवी मुंबईतील शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद

Subscribe

मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात कोरोनाचा डेल्टा आणि ओमायक्रॉनचा कहर वाढल्याने येथील इयत्ता १ ली ते ९ वी आणि इयत्ता ११ वीच्या सर्व शाळा, महाविद्यालये मंगळवारपासून ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता कोविडचा संसर्ग आणखीन वाढत गेल्यास पुन्हा एकदा मुंबईची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने सुरू होणार आहे. राज्य शासन व मुंबई महापालिकेने मुंबईत कोविड व ओमायक्रॉनला रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रकारच्या उपाययोजना युद्धपातळीवर सुरू केल्या आहेत. राज्य शासन व मुंबई महापालिका यांनी मिळून शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने अवघ्या काही दिवसातच शालेय विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा प्रत्यक्ष शालेय शिक्षणाऐवजी ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागणार आहे. मात्र, इयत्ता १० आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा मात्र सुरू ठेवण्यात येणार आहेत.

सद्यस्थितीत जगातील काही देशांमध्ये व मुंबई महापालिका क्षेत्रात ओमायक्रॉन या कोविडच्या नव्या प्रजातीचा प्रभाव वाढत आहे. मुंबईतील कोविड – १९ चा प्रादुर्भाव वाढत असल्याचे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबईतील इयत्ता १० वी व १२ वी चे वर्ग वगळता इयत्ता पहिली ते इयत्ता ९ वी आणि इयत्ता ११ वी चे सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळा पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या आदेशाने येत्या ४ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत प्रत्यक्ष बंद ठेवण्यात येणार आहेत.

- Advertisement -

मात्र, इयत्ता पहिली ते इयत्ता ९ वी व इयत्ता ११ वी या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष शाळेत उपस्थित न राहता यापूर्वी दिलेल्या निर्देशाप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने अध्ययन अध्यापनाचे कार्य सुरू राहणार आहे. महापालिका क्षेत्रातील शाळेतील १५ ते १८ वर्षे वयोगट असलेल्या विद्यार्थ्यांचे नियोजनानुसार लसीकरण केंद्रावर उपस्थित राहून लसीकरण सुरू राहणार आहे. याकरिता महापालिका शाळांसह अन्य खासगी शाळांमधील लसीकरणास पात्र असणार्‍या १५ ते १८ वर्षे या वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घेण्यासाठी शाळेत बोलवता येणार आहे.

पालिकेच्या शाळा या प्रत्यक्ष बंद ठेवण्यात आल्या असल्या तरी ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू राहणार आहेत. पालिका क्षेत्रातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे नियोजनानुसार लसीकरण होणार असून यासाठी महापालिका शाळांसह अन्य खासगी शाळांमधील लसीकरणास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलवता येईल, असे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

ठाणे, नवी मुंबईत दहावी-बारावीचे वर्ग सुरु 

कोविड 19 आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार संसर्ग रोखण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ठाणे तसेच नवी मुंबईतील शाळा मंगळवार 4 जानेवारीपासून ते 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती ठाणे व नवी मुंबई महानगरपालिकेने दिली असून संबंधित पालिका क्षेत्रातील इयत्ता दहावी-बारावीचे वर्ग वगळता अन्य वर्गासाठी सर्व व्यवस्थापनाच्या तसेच सर्व माध्यमांच्या शाळा प्रत्यक्ष अध्यापनासाठी 31 जानेवारी 2022 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, ऑनलाईन पद्धतीने वर्ग सुरूच राहणार असल्याची माहिती ठाणे महापालिका महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली आहे.

दरम्यान, दहावी-बारावीचे नियमित वर्ग सुरूच राहणार आहेत. यामध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता 9 वी व 11 वी या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष शाळेत उपस्थित न राहता यापूर्वी दिलेल्या निर्देशाप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने वर्ग सुरू राहतील. 15 डिसेंबर 2021 रोजी पहिली ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या होत्या. मात्र, पुन्हा कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता ठाणे व नवी मुंबई महापालिकेने शाळांबाबत अखेर निर्णय घेतला आहे.

आता पोलीसही वर्क फ्रॉम होम

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्या बघता पोलीस दलाला दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले असून शक्य असेल तर ५५ वर्षे पेक्षा अधिक आणि इतर व्याधी असलेल्या पोलिसांना वर्क फ्रॉम होम देण्यात यावे, असे निर्देश राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. कोरोनाच्या मागील दोन लाटेत राज्यभरात शेकडो पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला होता, यावेळी दक्षता म्हणून हे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत असून त्यात पोलीस दलात देखील हा संसर्ग वाढत आहे. मुंबई पोलीस दलामध्ये सध्यस्थितीत १५४ सक्रिय रुग्ण असून राज्यात २१९ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. ही संख्या अधिक वाढू नये यासाठी पोलीस वसाहती, पोलीस ठाणी, पोलिसांची शासकीय वाहने यांचे वारंवार निर्जंतुकीकरण करावे, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना पोलीस महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आहेत.

तसेच ५५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय शस्त्रक्रिया, कर्करोग, अंजोप्लॅस्टी शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रतिरोपण या आजाराने ग्रासलेल्या पोलिसांना शक्य झाल्यास घरी बसूनच काम द्या तसेच त्यांच्या आजाराचा आढावा घेऊन ते लोकांच्या संपर्कात येणार नाही किंवा कमी संपर्कात असेल अशा ठिकाणी त्यांची नेमणूक करावी, असे निर्देश पोलीस महासंचालक कार्यालय यांच्याकडून देण्यात आले आहेत.

मुंबईत सोमवारी ८ हजार ८२ नवे रुग्ण

मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होऊ लागलीय. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना चिंतेत टाकणारी माहिती समोर आलीय. मुंबईत सोमवारी ८हजार ८२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईत सोमवारी 8 हजार 82 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर सोमवारी दोन मृत्यूंची नोंद करण्यात आलीय. याशिवाय, 622 जणांनी कोरोनावर मात केलीय. ज्यामुळे राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7 लाख 51 हजार 358 वर पोहोचलीय. दरम्यान, बरे झालेल्या रुग्णांचा दर 93 टक्क्यांवर गेला आहे. मुंबईत सध्या 29 हजार 829 रुग्ण सक्रिय आहेत. शहरातील रुग्ण दुपटीचा दर 138 दिवसांवर पोहोचलाय. मुंबईत सध्या 37 हजार 274 रुग्ण सक्रिय आहेत.

सध्या मुंबईत आढळत असलेल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी तब्बल 80 टक्के रुग्ण ओमायक्रॉनबाधित असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल यांनी एका विशेष मुलाखातीत दिलीय. तसेच ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे मुंबईकरांना घाबरण्याची आवश्यकता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई महापालिकेने परदेशातून येणार्‍या प्रवाशांना क्वारंटाईन आणि होम क्वॉरंटाईन करण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवल्याची माहितीही त्यांनी दिलीय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -