घरताज्या घडामोडीमाझे कुटुंब, माझी जबाबदारी: १ कोटींपेक्षा अधिक व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण

माझे कुटुंब, माझी जबाबदारी: १ कोटींपेक्षा अधिक व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण

Subscribe

राज्यातील ‘कोविड १९’ ला रोखण्यासाठी प्राथमिक आरोग्य तपासणी करणे, आरोग्य शिक्षण देणे आणि कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर २०२० या कालावधीत संपूर्ण राज्यभरात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात प्रभावीपणे राबविली जात आहे. या अंतर्गत घरोघरी जाऊन २ टप्प्यात सर्वेक्षण करायचे असून यापैकी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्वेक्षणाचा पहिला टप्पा गेल्याच आठवड्यात पूर्ण झाला आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रातील ३३ लाखांपेक्षा अधिक घरातील १ कोटीपेक्षा अधिक व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तर आता १५ ते २५ ऑक्टोबर २०२० या दरम्यान राबविण्यात येत असलेला सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा प्रगतीपथावर आहे.

या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यादरम्यान जे नागरिक बाहेरगावी होते, त्यांचे सर्वेक्षण दुस-या टप्प्यादरम्यान होणार आहे. सर्वेक्षणादरम्यान कुटुंबातील सदस्यांची ऑक्सिजन पातळी आणि शारीरिक तापमान तपासण्याचा समावेश असून प्रत्येक कुटुंबाच्या स्तरावर आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यात येत आहे. त्याचबरोबर ज्या नागरिकांना इतर आजार असतील, त्यांची स्वतंत्र नोंद घेतली जात आहे, तर ज्या नागरिकांना कोविडची लक्षणे असतील, त्यांना महापालिकेच्या दवाखान्यात अथवा रुग्णालयात पुढील आवश्यक त्या तपासणीसाठी पाठवले जात आहे.

- Advertisement -

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा हा बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने आणि महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या नेतृत्वात राबविला जात आहे. तर अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनात या मोहिमेचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अंतर्गत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या कामाचे समन्वयन हे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे करण्यात येत आहे.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिमेतील सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा १५ ते २५ ऑक्टोबर २०२० दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यात येत आहे. या दुसऱ्या टप्प्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वयंसेवकांचा चमू प्रत्येक घरी जाऊन कुटुंबातील सदस्यांची प्राथमिक माहिती नोंदवून घेत आहे. यामध्ये वय, लिंग यासह मधुमेह, रक्तदाब यासारख्या इतर आजारांची माहिती घेण्यासह कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे तापमान व प्राणवायू पातळी (SpO2) देखील नोंदवून घेण्यात येत आहे. त्याचबरोबर कोविडला प्रतिबंध करण्यासाठी कुटुंबाने आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याने कोणकोणत्या उपाययोजना आपापल्या स्तरावर अंमलात आणाव्यात, याचीही माहिती घरोघरी जाऊन पुन्हा एकदा देण्यात येत आहे. ही माहिती सहजसोप्या भाषेत देणारे एक पत्रक सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यातच वितरित करण्यात आले आहे. तसेच जे नागरिक सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यात बाहेरगावी होते, अशा कुटुंबांना हे पत्रक सर्वेक्षणाच्या दुस-या टप्प्यात देण्यात येणार आहे.

- Advertisement -

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे स्वयंसेवकांचे अनेक चमू तयार करण्यात आले असून प्रत्येक चमूत ३ स्वयंसेवक कार्यरत आहेत. यानुसार स्वयंसेवकांचा प्रत्येक चमू हा दररोज साधारणपणे ७५ ते १०० कुटुंबीयांचे सर्वेक्षण करीत आहे. तरी, नागरिकांनी सर्वेक्षणासाठी त्यांच्या घरी येणाऱ्या महापालिकेच्या स्वयंसेवकांना सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाद्वारे पुन्हा एकदा करण्यात येत आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -