घरमुंबईFarmers Protest : शरद पवारांच्या 'त्या' पत्राचा भाजपकडून गैरवापर - राष्ट्रवादी काँग्रेस

Farmers Protest : शरद पवारांच्या ‘त्या’ पत्राचा भाजपकडून गैरवापर – राष्ट्रवादी काँग्रेस

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार केंद्रात कृषीमंत्री असताना युपीए सरकारच्या काळात त्यांनी विविध राज्यांमधल्या राज्य सरकारांना लिहिलेले एक पत्र सध्या भाजपकडून जाहीर केलं जात आहे. या पत्रातून शरद पवारांनी एपीएमसीसंदर्भात मांडलेली भूमिका त्यांचं नव्या कृषी कायद्यांना समर्थनच असल्याचं दाखवते, असा दावा देखील भाजपकडून केला जात आहे. मात्र, त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. ‘शरद पवारांच्या त्या पत्राचा वापर करून त्यांचं नव्या कृषी कायद्यांना समर्थन आहे असा गैरसमज भाजपकडून पसरवला जात आहे’, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.

शरद पवारांनी लिहिलेल्या या पत्राचा संदर्भ सकाळी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आणि नंतर संध्याकाळी भाजपचे महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या पत्रकार परिषदेत घेतला. त्यामुळे भाजपकडून या पत्रावरून शरद पवारांना आणि पर्यायाने विरोधकांना लक्ष्य केलं जात असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर खुलासा केला आहे.

- Advertisement -

‘ते’ पत्र त्रुटींसंदर्भात होतं!

‘केंद्रात अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार असतानाच मॉडेल एपीएमसी कायदा मंजूर झाला होता. मात्र, त्यामध्ये अनेक त्रुटी होत्या. नंतर युपीए सरकारच्या काळात जेव्हा शरद पवार केंद्रात कृषीमंत्री झाले, तेव्हा त्यांनी या कायद्यातल्या त्रुटी दूर करण्यासंदर्भात राज्य सरकारांना ते पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी कायद्यातल्या त्रुटी वगळून त्या त्या राज्य सरकारांनी आपल्या राज्यात त्याची अंमलबजावणी करावी, असं सुचवलं होतं. त्यानुसार काही मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यात तो कायदा लागू देखील केला. पण केंद्र सरकारने आता मंजूर केलेले कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नसून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. एमएसपीचा या कायद्यात उल्लेखच नसून एपीएमसीच्या भवितव्याविषयी देखील यातून प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. शिवाय, शेतकरी खासगी व्यापाऱ्याकडे माल विक्रीसाठी गेला, तर त्याला आधारभूत किंमत मिळेलच, याची कोणतीही खात्री कायद्यामध्ये नमूद नाही’, असं राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, यासंदर्भात येत्या ९ डिसेंबर रोजी शरद पवार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -