घरमुंबईचंद्रकांत पाटील आधी तुमचं बघा - नवाब मलिक

चंद्रकांत पाटील आधी तुमचं बघा – नवाब मलिक

Subscribe

निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसतसा पक्षीय राजकारणाला ऊत येऊ लागला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वतंत्र लढून दाखवावं असं आव्हान देणाऱ्या चंद्रकांत पाटलांंना नवाब मलिकांनी उलट आव्हान दिलं आहे.

‘राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि समविचारी पक्षांची आघाडी निश्चित आहे. त्याची चिंता तुम्ही करु नका. आधी तुमच्यासोबत तुमचा सहकारी पक्ष शिवसेना रहातो का ते बघा’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपचे आमदार आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक टीका केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला वेगवेगळे लढण्याचे आव्हान दिले होते. त्या वक्तव्याचा नवाब मलिक यांनी समाचार घेताना चंद्रकांत पाटील यांना ‘आधी स्वत:चं बघा’ असा टोलाही लगावला.

‘चंद्रकांत पाटील आम्हाला आव्हान देत आहेत की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये हिंमत असेल तर वेगवेगळी निवडणूक लढवून दाखवा. परंतु आमची आघाडी निश्चित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि समविचारी पक्षांची आघाडी देशात आणि महाराष्ट्रामध्ये ठरलेली आहे आणि आम्ही एकत्रितच निवडणूका लढवणार आहोत’, असेही नवाब मलिक यांनी यावेळी ठामपणे सांगितले.

‘तुमचे सहकारी पक्ष तुमच्यासोबत निवडणुका लढवू इच्छित नाहीत किंवा यायला तयार नाहीत. त्या भीतीपोटी तुम्ही दुसऱ्या पक्षांना आव्हान देण्याचे काम करत आहात. आधी शिवसेना तुमच्यासोबत राहील का याची चिंता तुम्ही करा. आम्ही एकसंघ राहणार आहोत.’ असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. ‘तुम्ही अशी कितीही आव्हाने दिलीत, तरी ती आम्ही स्वीकारणार नाही. आमच्यासमोर फक्त एकच आव्हान आहे ते म्हणजे या देशातून…राज्यातून भाजपला हद्दपार करणे आणि ते आम्ही करुन दाखवणार,’ असा आत्मविश्वासही नवाब मलिक यांनी बोलून दाखवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -