घरCORONA UPDATEकल्याण-डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊन हवा, सर्वपक्षीय आमदारांची मागणी!

कल्याण-डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊन हवा, सर्वपक्षीय आमदारांची मागणी!

Subscribe

कल्याण डोंबिवलीतील झपाट्याने वाढणारे कोरोनाचे आकडे पाहता याठिकाणी पुन्हा लॉकडाऊन घेण्याची मागणी सर्वपक्षीय आमदारांनी शनिवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शिंदे यांनी शनिवारी कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात सर्व आमदार, पोलीस अधिकारी, प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी आमदारांनी पुन्हा लॉकडाऊन घेण्याची मागणी केली. गेल्या आठवड्याभरापासून कल्याण डोंबिवलीत आधी १०० आणि आता २०० हून अधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. कोरोना वाढीचा हा वेग पाहता ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही तातडीची बैठक बोलावली होती.

या बैठकीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयसीयू आणि ऑक्सिजनचे प्रत्येकी २०० बेड्स वाढवण्याचा निर्णय घेतला. तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवणे, डॉक्टर,परिचारिका, सपोर्टिंग स्टाफचे मनुष्यबळ वाढवण्याचे निर्देशही पालकमंत्री शिंदे यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले. तसेच आवश्यकता भासल्यास राज्य सरकारकडून आणखी मदत उपलब्ध करून देण्यात येईल. मात्र कोरोना रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

- Advertisement -

दरम्यान, कल्याण डोंबिवलीतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता एक कडक लॉकडाऊन घेण्याची गरज मनसे आमदार राजू पाटील यांच्यासह इतर आमदारांनी व्यक्त केली. महापालिका प्रशासनाने या लॉकडाऊनच्या काळामध्ये पालिकेच्या सुविधा वाढवण्यावर भर देणे गरजेचे आहे. जेणेकरून लॉकडाऊन उठल्यावर जास्तीत जास्त कोरोना रुग्णांना सुविधा देता येतील असे मत पाटील यांनी व्यक्त केले. तर कोविडसाठी काम करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांची नावं महापालिकेने जाहीर करावीत. जेणेकरून तातडीच्या काळात लोकांना संपर्क करणे सोपे होईल अशी सूचना आमदार रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केली. तर कल्याण पूर्वेचे आमदार यांनीही वाढत्या रुग्णसंख्येबाबत लॉकडाऊन पाळणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या कार्यपद्धती बाबत कल्याण डोंबिवलीतील आमदारांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत नाराजी व्यक्त केली. आयुक्त हे आमदार, नगरसेवकांचे फोन उचलत नाहीत, तक्रारी ऐकून घेत नाहीत, लोकांची कामे करत नाहीत असा तक्रारींचा पाढाही वाचला. सुरूवातीला महापालिका आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापालिकेची कोविडची सदयथिती व त्‍यासाठी महापालिका करीत असलेली उपाययोजना याबाबतची माहिती प्रोजेक्‍टरवर सर्व उपस्थितांसमोर सादर केली. सदर बैठकीस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर विनिता राणे, आमदार विश्‍वनाथ भोईर, आमदार जगन्‍नाथ शिंदे तसेच अतिरिक्त पोलीस उपायुक्‍त दत्‍तात्रय कराळे, स्थायी समिती सभापती विकास म्‍हात्रे, सभागृह नेते प्रकाश पेणकर, विरोधी पक्ष नेते राहुल दामले आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -