घरमुंबईलोकलचे नवे वेळापत्रक

लोकलचे नवे वेळापत्रक

Subscribe

कामावर जाणार्‍या मुंबईकरांना लवकरच दिलासा

मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी राज्य सरकारने आखुन दिलेल्या वेळापत्रकामुळे नव्याने अडचण निर्माण झाली आहे. ती अडचण सोडवण्यासाठी लोकल प्रवासाचे सुधारीत वेळापत्रक लागू करण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. मुंबईकरांना सोयीचे, हिताचे ठरेल अशा प्रवासाच्या वेळा लवकरच जाहीर केल्या जातील, असे टोपेंनी स्पष्ट केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १० महिने बंद असलेली मुंबई उपनगरीय लोकल सेवा १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुली करण्यात आली. नव्या वेळापत्रकानुसार सर्वसामान्य मुंबईकरांना सकाळी ७ ते १२ संध्याकाळी ४ ते रात्री ९ यावेळी लोकलने प्रवास वर्ज्य कारण्यात आला आहे. मात्र, याचवेळी कार्यालये सुरू होत असल्याने लाखो मुंबईकरांना लोकलप्रवासाऐवजी गर्दीतून इतर वाहनातून प्रवास करावा लागतोय.

याची दखल घेत लोकल प्रवासाच्या वेळा पुन्हा बदलणार असल्याचे संकेतच आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. उपनगरीय रेल्वे वाहतूक सेवा सोमवारपासून सर्वसामान्य जनतेसाठी सुरू झाली असली तरी कामाच्या वेळा साधता येत नसल्याने पहिल्या दिवशी फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. हा निर्णय घेताना तीन टप्प्यांत प्रवासाचे निर्बंध घातले आहेत. मात्र, त्याचा उलटा परिणाम दिसून येत आहे. वेळेच्या मर्यादा घालूनही गर्दी कायम आहे. तसेच, सुमारे २५ लाख चाकरमान्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचणे अजूनही अशक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

मुंबईकरांच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार लोकलच्या वेळेत लवकरच बदल करण्यात येतील. मुंबईत पत्रकारांशी बोलताना टोपे यांनी ही माहिती दिली. मुंबईकरांच्या कामाच्या दृष्टीने लोकल सेवा ही महत्त्वाची आहे. मुंबईकरांची सोय लक्षात घेऊन वेळेच्या बाबतीत काही करता येत असेल तर ते नक्की केले जाईल, असे टोपे म्हणाले. त्यासाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा केला जाईल. शेवटी सरकारसाठी जनतेचे हित महत्त्वाचे आहे. त्यामुळे राज्य सरकार लवकरच या संदर्भात निर्णय घेईल, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -