मुंबई पालिका निवडणूक आरक्षणाविरोधात फक्त ३ हरकती

Only 3 objections against Mumbai Municipal Corporation election reservation Have arrived
मुंबई पालिका निवडणूक आरक्षणाविरोधात फक्त ३ हरकती

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ३१ मे रोजी प्रभाग आरक्षण सोडत लॉटरी पद्धतीने काढण्यात आली. गेल्या २ दिवसांत निवडणूक विभागाकडे फक्त ३ हरकती व सूचना आल्याचे समजते. ६ जूनपर्यंत हरकती व सूचना देण्याची मुदत आहे. त्यामुळे आता आणखीन किती हरकती व सूचना येतील, हे मुदत संपल्यानंतरच समोर येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने काही दिवसांपूर्वीच प्रभाग रचना केली होती. तर राज्य शासन व निवडणूक आयोग यांच्या मंजुरीने मुंबईतील प्रभागांची संख्या २२७ वरून वाढवून २३६ एवढी करण्यात आली. त्यानंतर ३१ मे रोजी २३६ प्रभागातून ५० टक्के महिलांसाठी ११८ प्रभाग, अनुसूचित जातीसाठी १५ प्रभाग, अनुसूचित जमातीसाठी २ प्रभाग आरक्षित करण्यासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्याचा कमी – अधिक फटका सर्वच राजकीय पक्षांचा माजी नगरसेवकांना बसला. मात्र या आरक्षणाचा काँग्रेसच्या २९ पैकी २१ माजी नगरसेवकांना सर्वात जास्त फटका बसला, असा आरोप काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप व पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. तसेच, त्या विरोधात निवडणूक विभागाकडे हरकती व सूचना मांडून दाद मागण्यात येईल. मात्र जर न्याय न मिळाल्यास प्रसंगी न्यायालयात धाव घेऊन दाद मागण्यात येईल, असा इशारा त्यांनी पालिकेला दिला आहे. मात्र गेल्या २ दिवसांत निवडणूक विभागाकडे फक्त ३ हरकती व सूचना आल्याचे समजते.

मात्र, काँग्रेसकडून सदर प्रभाग आरक्षणाबाबत अधिकाधिक हरकती व सूचना येऊ शकतात, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तसेच, हरकती व सूचना मांडण्यासाठी ६ जून ही शेवटची मुदत असल्याने तोपर्यंत आणखीन काही प्रमाणात हरकती व सूचना येण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.