घरमुंबईपावसाळ्यात मुंबईकरांच्या पायाखाली मॅनहोलचा राक्षस

पावसाळ्यात मुंबईकरांच्या पायाखाली मॅनहोलचा राक्षस

Subscribe

अतिवृष्टीमुळे परळसारख्या सखल भागात पाणी साचले जाते. या पाण्याचा निचरा करण्यासाठी मॅनहोल उघडले जातात. मात्र पालिकेकडून याची दक्षता घेतली जात नाही. मॅनहोलवर अनेक जाळ्या जरी बसवल्या असल्या तरी मात्र सुरक्षिततेचा अभाव दिसून येत आहे.

गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीदरम्यान मुंबईत सर्वत्र पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यात रस्त्यावरील उघडा मॅनहोल न दिसल्याने त्यात पडून सुप्रसिद्ध डॉ. अमरापूरकर यांचा मृत्यू झाला होता. अमरापूरकर यांच्या मृत्यूनंतर मुंबईतील मॅनहोलचा विषय प्राधान्याने चर्चेत आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने मॅनहोलवर जाळ्या बसवण्याचा निर्णय घेतला. तरी जाळ्या बसवण्यात आलेल्या मॅनहोलची संख्या नगण्य आहे. यामुळे मुंबईत मोठा पाऊस पडून सर्वत्र पाणी साचल्यास उघड्या मॅनहोलमध्ये पडून लोकांवर जीव गमावण्याची पाळी येऊ शकते.

२६ जुलै २००५ आणि २९ ऑगस्ट २०१७ हे दोन दिवस मुंबईकर कधीही विसरणार नाहीत. या दोन्ही दिवशी मुंबईची तुंबई झाली होती. २९ ऑगस्टला बॉम्बे हॉस्पिटलमधील पोट विकारतज्ज्ञ डॉ. अमरापूरकर आपली गाडी एल्फिन्स्टन येथे बंद पडल्याने साचलेल्या पाण्यातून प्रभादेवी येथील आपल्या घराकडे पायी जात होते. त्यावेळी पाण्याखाली गेलेल्या उघड्या मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला. अमरापूरकर यांच्या मृत्यूनंतर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणीवेळी मुंबईमधील मॅनहोल सुरक्षित करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

- Advertisement -

शहर व उपनगरात ७२ हजार मॅनहोल

मुंबईत पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या व मलनि:सारण विभाग या दोन विभागांकडून त्यांच्या अखत्यारित येणार्‍या मॅनहोलची काळजी घेतली जाते. मुंबई शहरात व्हीआयपी नागरिक असल्याने तेथील गटारे इंग्रजांच्या काळापासून बंदिस्त करण्यात आली आहेत. शहरात या बंदिस्त गटारांवर पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे २४ हजार ५०० मॅनहोल आहेत. पूर्व आणि पश्चिम उपनगरात या विभागाच्या अखत्यारित किती मॅनहोल आहेत याची माहिती या विभागातील अधिकारी देऊ शकलेले नाहीत. तर मलनिःसारण विभागाकडे चौकशी केली असता त्यांच्या अखत्यारित शहर व उपनगरात ७२ हजार मॅनहोल असल्याची माहिती मुख्य अभियंता अशोक यमगर यांनी दिली.

सुरक्षा जाळ्या बसवण्याचा पालिकेचा निर्णय

पावसाळ्यात मुंबईमध्ये २२५ ठिकाणी पाणी साचते. पाणी साचणारी शहरात ६३ तर उपनगरात १६२ ठिकाणे आहेत. पाणी साचणार्‍या २२५ ठिकाणांवरील २०५७ मॅनहोलवर पर्जन्य जलवाहिन्या आणि मलनिःसारण या दोन विभागांकडून सुरक्षा जाळ्या बसवण्याचा निर्णय पालिकेने घेतला. पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून १ कोटी ७० लाख रुपये खर्चून १४२५ जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. तर ६० लाख रुपये खर्चून मलनिःसारण वाहिन्या विभागाकडून ६३२ जाळ्या बसवल्या जात आहेत. शहर, पूर्व व पश्चिम उपनगरात वेगवेगळ्या आकाराचे मॅनहोल असल्याने त्याप्रमाणे जाळ्या नसल्याने या कामाला दोन महिने लागू शकतात, अशी माहिती मलनिःसारण विभागाकडून देण्यात आली.

- Advertisement -

जलवाहिन्या आणि मलनिःसारणचे ९६ हजार ५०० मॅनहोल

मुंबईत दोन्ही विभागाचे ९६ हजार ५०० मॅनहोल असून, उपनगरात मॅनहोल किती यांची नेमकी संख्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडे नाही. याचा अर्थ मुंबईत लाखोंच्या संख्येने मॅनहोल आहेत. यापैकी न्यायालयाने सांगितले म्हणून फक्त मोठ्या प्रमाणात पाणी साचणार्‍या ठिकाणच्या २०५७ ठिकाणीच जाळ्या बसवल्या जात आहेत. मुंबईत मोठा पाऊस पडल्यास शहरात सगळीकडेच पाणी साचते. पाणी साचल्यावर पाण्याचा निचरा होण्यासाठी अनेक ठिकाणी मॅनहोल उघडली जातात. अशा ठिकाणी जाळ्या नसल्याने डॉ. अमरापूरकर यांच्यासारखे आपणही मॅनहोलमधून वाहून जाऊ शकतो, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

मॅनहोलमुळे झालेल्या दुर्घटना

वरळीच्या मरिअम नगरमध्ये २०१० साली तुषार जाधव या ११ वर्षीय मुलाचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. २९ ऑगस्ट २०१७ ला वरळी येथे डॉ. अमरापूरकर यांचा मृत्यू झाला. २२ नोव्हेंबर २०१७ रोजी मुलुंडच्या मंदिरातून घरी परतताना भक्ती मार्गावरील मॅनहोलमध्ये निलीमा पुराणिक ही महिला पडली. ही महिला मॅनहोलमध्ये १५ मिनिटे होती. पोलीस आणि अग्निशमन दलाने या महिलेला बाहेर काढल्याने तिचा जीव वाचला.

मॅनहोलची संख्या माहीत नाही

शहरात पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे २४ हजार ५०० मॅनहोल आहेत. मात्र पूर्व आणि पश्चिम उपनगरात या विभागाच्या अखत्यारित किती मॅनहोल आहेत, याचा नेमका आकडा या विभागाकडे नाही. हा आकडा जमवण्याचे काम सुरू असल्याचे या विभागातील अधिकार्‍याने सांगितले.

शहरात पाणी साचल्यावर ते पाणी वाहून नेण्याची जबाबदारी पर्जन्य जलवाहिन्या विभागाची आहे. त्यांच्या वाहिन्यांमधून पाणी वाहून नेण्याची क्षमता संपल्यास आमच्या मलनिःसारण वाहिन्यांचे मॅनहोल उघडण्यास सांगण्यात येते. आम्ही पर्जन्य जलवाहिन्या विभागाला मदत म्हणून मॅनहोल उघडतो. अन्यथा आमचे मॅनहोल उघडले जात नाहीत. उघडल्यास आमचे कर्मचारी त्या ठिकाणी उभे असतात.
– अशोक यमगर, प्रमुख अभियंता, मलनिःसारण वाहिन्या विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -