दुकानांवरील पाट्या मराठीत करण्यासाठी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अवधी, अन्यथा कारवाईचा बडगा

after Rajya Sabha, mlc election, maharashtra political crisis Shiv Sena try to save Mumbai Municipal Corporation leader meeting start

मुंबई हद्दीतील दुकाने व हॉटेल्स आदींवरील पाट्या, नामफलक मराठी भाषेत व ठळक अक्षरात लिहिण्याबाबत पालिकेने दिलेली मुदत ३१ मे रोजी संपुष्टात आली आहे. पालिका प्रशासन जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यन्त मराठी पाट्यांबाबत आढावा घेणार आहे. त्यामुळे तोपर्यंत तरी संबंधित दुकाने, हॉटेल्स चालकांना मुदत मिळणारा आहे. मात्र, त्यानंतर पालिकेकडून कारवाईबाबत बडगा उगारण्यात येणार आहे.

मराठी भाषेत पाटी, नामफलक लावण्यास नकार दिल्यास संबंधितांवर न्यायालयात खटले दाखल करणे व न्यायालयीन कारवाई टाळण्यासाठी एका कामगारामागे दोन हजार रुपयांचा दंड न्यायालयीन कारवाईनंतर वसूल केला जाणार आहे.

राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मार्च २०२२ ला दुकाने, आस्थापनांवरील पाट्या, नामफलक मराठी भाषेत आणि ठळक अक्षरात लिहिण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यावर अंमलबजावणी करण्याचे आदेश शासन व पालिका स्तरावर देण्यात आले होते. यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार दहा किंवा दहापेक्षा जास्त कामगार असेल्या दुकाने, हॉटेल्सवरील पाट्या, नामफलक मराठी भाषेत असणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, आता शासनाच्या नवीन नियमानुसार कर्मचार्‍यांची संख्या कितीही असली तरी दुकाने, हॉटेल्स यांवरील पाट्या, नामफलक मराठी भाषेत आणि ठळक अक्षरात लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे.

त्यावर पालिकेकडून अंमलबजावणी करण्यात येत आहे. दुकाने व आस्थापनांना ३१ मेपर्यंत पाट्या, नामफलक मराठी भाषेत व ठळक अक्षरात लिहिण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान, मद्यविक्रेत्या दुकानांनाही आता महान व्यक्ती किंवा गडकिल्ल्यांची नावे देता येणार नाहीत. याबाबतची कार्यवाही करण्यासाठी ३० जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.