घरमुंबईधक्कादायक! 'ही' क्लृप्ती वापरुन चोरट्यांनी १५ बॅंकांना चुना लावला

धक्कादायक! ‘ही’ क्लृप्ती वापरुन चोरट्यांनी १५ बॅंकांना चुना लावला

Subscribe

एटीएम मशीनसोबत छेडछाड करुन दोन चोरट्यांनी देशातील १५ बॅंकाना सुमारे १ कोटी रुपयांनी लुबाडले आहे. यासाठी त्यांनी वेगळीच क्लृप्ती वापरली आहे. अखेर, या दोन्ही चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

बँकाच्या एटीएम मशीनमधून कार्डच्या साह्याने रोकड काढताना चांगल्याचांगल्याची भंबेरी उडते. एटीएम मशीनमधून पैसे आले नाही, तर आपल्या खात्यातून पैसे जातात कि काय? हि भीती सर्वसामान्यांना नेहमी असते. मात्र एटीएम मशीनमधून रोकड काढून रोकड आलीच नसल्याची तक्रार बँकेत करून बॅकांची फसवणूक करणाऱ्या हरियाना आणि राजस्थानातील दोन तरुणांना नागपाडा पोलिसांनी गोवा येथून अटक केली आहे. एटीएम मशीनसोबत छेडछाड करुन या दोघांनी देशभरातील सुमारे १५ पेक्षा अधिक बँकांची फसवणूक केली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बॅंकाचीच फसवणूक केल्याचा हा प्रकार पहिल्यांदाच समोर आला आहे.

१५ बॅंकाना सुमारे १ कोटी पेक्षा अधिक रुपयांना चुना लावला

असिफ खान आणि असमत खान असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही मूळचे राजस्थान आणि हरियाणा या राज्यातील आहेत. अटक करण्यात आलेले दोघे सुशिक्षित तरुण आहेत. पोलिसांनी या दोघाजवळ विविध बँकांचे ५१ डेबिट आणि एटीएम कार्ड जप्त केले आहे. विविध बँकामध्ये स्वतःचे खाते उघडून हे दोघे स्वताच्या प्रत्येक खात्यात ३० ते ४० हजार रुपये ठेवत असे. त्यानंतर बँकाच्या एटीएम सेंटर मध्ये जाऊन एटीएम कार्डच्या साहाय्याने एटीएम मधून रोकड काढत असे. परंतु मशीनमधून पैसे बाहेर येण्यापूर्वी एक जण अर्धवट आलेले रोकड तशीच हाताने पकडत आणि दुसरा मशीनच्या मागे जाऊन एटीएम मशीनच्या मागे असलेला स्विच बंद करून अडकलेली रोकड खेचून बाहेर काढुन परत मशीन सुरु करीत असे. त्यानंतर हे दोघे बँकांच्या हेल्पलाईन नंबरवर फोन करून एटीएममधून रोकड आलीच नसल्याची तक्रार करीत होते, त्यामुळे बँक त्याच्या खात्यात काढलेली रक्कम परत पाठवत होती. या प्रकारची बँकांची फसवणूक त्यांनी देशभरात केली असून पोलिसांच्या तपासत १५ बॅंकाना सुमारे १ कोटी पेक्षा अधिक रुपयांना चुना लावला असल्याचे उघडकीस आले आहे.

- Advertisement -

आरोपींचा असा छडा लागला

जानेवारी महिन्यात हे दोघे मुंबईतील नागपाडा परिसरात आले होते. त्यादरम्यान या दोघांनी एका व्यक्तीला एटीएममधून रोकड काढून देतो, असे सांगून त्याचे एटीएम कार्ड वापरले. मात्र एटीएम मधून रोकड न काढता हे दोघे तेथून निघून गेले. दरम्यान, एटीएममध्ये रोकड काढून हे दोघे पसार झाले असल्याची तक्रार या व्यक्तीने नागपाडा पोलीस ठाण्यात केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बागवे यांनी या गुन्हाचा तपास पोलीस अधिकारी सचिन शिंदे यांच्याकडे सोपवला. सीसीटीव्ही माध्यमातून या दोघांचा शोध घेत असताना दोघे गोवा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या दोघांना गोवा येथून अटक केली. या दोघांच्या चौकशीत हा सर्व प्रकार समोर आला असल्याची माहिती पोलीस अधिकारी संतोष बागवे यांनी दिली.

नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हा प्रकटीकरण पथकाने या दोघांना गोवा येथून अटक करुन मुंबईत आणले. चौकशीत दोघे बँकांची कशाप्रकारे फसवणूक करीत होते? हे उघडकीस आले. या दुकलीने देशभरातील १५ बँकांची १ कोटी रुयांची फसवणूक केली असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. बँकांची फसवणूक करण्याचा हा प्रकार प्रथमच समोर आला आहे.
-संतोष बागवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (नागपाडा )
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -