घरमुंबईमनसेच्या नियोजित मोर्चाचा मार्ग पोलिसांनी बदलला

मनसेच्या नियोजित मोर्चाचा मार्ग पोलिसांनी बदलला

Subscribe

आता मरिन ड्राइव्ह ते आझाद मैदान मोर्चा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देशात अनधिकृतरित्या घुसलेल्या पाकिस्तानी आणि बांगलादेशींना देशातून हाकलून लावण्याच्या मागणीसाठी ९ फेब्रुवारीला मोर्चाचे आयोजन केले आहे. मनसेला हा मोर्चा भायखळा येथून मोहम्मद अली रोड मार्ग आझाद मैदान, असा काढायचा होता. मात्र मनसेच्या मोर्चाच्या या प्रस्तावित मार्गाला नकार देत पोलिसांनी मनसेला धक्का दिला आहे. भायखळा ते आझाद मैदान या मार्गावरून मोर्चा काढण्यास पोलिसांनी परवानगी नाकारताना मनसेच्या मोर्चाला मरिन ड्राइव्ह ते आझाद मैदान या मार्गावरून मोर्चा नेण्याची परवानगी दिली.

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चाचा मार्ग नाकारला आहे. हा मार्ग नाकारताना पोलिसांनी मनसेला पर्यायी मार्ग सुचवला आहे. पोलिसांची ही सूचना मनसेने मान्य केली असून मनसेचा ९ फेब्रुवारीचा हा मोर्चा मरिन ड्राइव्ह ते आझाद मैदान असा निघणार आहे.मनसेकडून या नव्या मार्गाचे पोस्टरही प्रसिद्ध करण्यात आले आहे.

- Advertisement -

भायखळा ते आझाद मैदान या मार्गालगत मुस्लीम धर्मियांची मोठी वस्ती आहे. देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात मुस्लीम समाजही रस्त्यावर उतरला आहे. मोर्चा मुस्लिमबहुल भागातून गेल्यास याचा काही समाजकंटक फायदा उचलण्याचा प्रयत्न करू शकतात. यामुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच कारणामुळे पोलिसांनी मनसेला हा मार्ग नाकारला आहे. शिवाय या मार्गावरून मोर्चा जात असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही पोलिसांचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -