घरमहाराष्ट्रभररस्त्यात प्राध्यापक तरुणीला पेट्रोल टाकून जाळले

भररस्त्यात प्राध्यापक तरुणीला पेट्रोल टाकून जाळले

Subscribe

वर्ध्यातील खळबळजनक घटना

येथील नंदोरी मार्गावरील महालक्ष्मी किराणा दुकानासमोर एका तरुणाने प्राध्यापक तरुणीवर भररस्त्यात पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. त्यात ती गंभीर जखमी झाली. तिला प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले. ती प्राध्यापक तरुणी ४० टक्के भाजली असून तिचा चेहरा विद्रुप झाला आहे. तसेच तिची वाचाही गेली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही घटना सोमवारी सकाळी 7.30 वाजता वर्दळीच्या रस्त्यावर घडली. पोलिसांनी आरोपी विकेश नगराळे याला ताब्यात घेतले आहे.

ही प्राध्यापक तरुणी दारोडा गावाची रहिवासी आहे. ती येथील मातोश्री आशाताई कुणावार महाविद्यालयात वनस्पती शास्त्राची प्राध्यापक आहे. दररोज दारोडा येथून बसने येऊन ती स्थानिक नंदोरी बस थांब्यावर उतरते. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी ती नंदोरी चौकातून पायदळ कॉलेजमध्ये जात होती. त्याचवेळी तिच्या मागावर असलेली एक व्यक्ती दुचाकीवर पाठीमागून आली. त्याने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. त्याने स्वतःच्या गाडीतील पेट्रोल कापलेल्या प्लास्टिक बॉटलमध्ये काढले. तसेच कपडा गुंडाळलेला टेंभा त्याच्या सोबत होता. या तरुणीचा पाठलाग करीत अकस्मात तिच्या अंगावर त्याने पेट्रोल टाकले व पेटवलेला टेंभा तिच्या अंगावर फेकला त्यानंतर तो तेथून फरार झाला.

- Advertisement -

या पेट्रोल हल्ल्यात ती गंभीर भाजली. तिच्या पाठीमागून येत असलेल्या एका विद्यार्थिनीने आणि या मार्गाने जाणार्‍या तरुणांनी लागलीच तिच्या चेहर्‍यावरील आग विझवून तिला येथील उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर तिला पुढील उपचाराकरिता नागपूर येथे पाठविण्यात आले. या घटनेनंतर आरोपी व त्याचा सहकारी मोटारसायकलने पळून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी एका विद्यार्थिनीने पोलिसांना दिली. या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी म्हणून विकेश नगराळे रा.दारोडा या युवकाला पोलिसांनी टाकळघाट, बुटीबोरी पोलीस स्टेशन येथून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमेश तुळस्कर यांच्या तक्रारीवरून भादंवि 307, व 326 या अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. अमानवीय कृत्यामुळे शहरात एकच खळबळ माजली असून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा आक्रोश प्राध्यापिकेवर झालेल्या पेट्रोल हल्ल्याची माहिती मातोश्री कुणावार महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मिळताच त्या येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर येऊन धडकल्या.

- Advertisement -

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक बसराज तेली हे उपस्थित होते. मुलींनी त्यांना गराडा घालून दोषी युवकावर कठोर कारवाईची मागणी केली.

यावेळी विद्यार्थिनींनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी विद्यार्थिनींनी न्याय देण्याच्या घोषणाही दिल्या. प्राध्यापिकेवर झालेल्या पेट्रोल हल्ल्याने संतप्त झालेला जमाव या कार्यालयासमोर पोहोचला. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गाठून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असून कठोर पावले उचलण्याची मागणी त्यांनी केली. यावर बैठक घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन आय.जी. प्रसन्ना यांनी उपस्थितांना दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -