Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई संजय राठोड राजीनामा देणार की मुख्यमंत्री राजीनामा घेणार!

संजय राठोड राजीनामा देणार की मुख्यमंत्री राजीनामा घेणार!

वनमंत्री राठोडांसाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे असून शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोंडी ते स्वतःहून दूर करतील की मुख्यमंत्री राठोड यांना राजीनामा देण्यासाठी आदेश देतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल

Related Story

- Advertisement -

बीडच्या पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड हे अडचणीत आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेण्याआधी शनिवारी वनमंत्री संजय राठोड हे राजीनामा देतील असे खात्रीलायकरित्या समजते. वनमंत्री संजय राठोड हे राजीनामा देण्यासाठी भाजपाकडून सातत्याने दबाव सुरू आहे. येत्या सोमवारपासून विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार असल्याने अधिवेशनात गोंधळ होऊ नये म्हणून वनमंत्री संजय राठोड राजीनामा देणार असल्याची दाट शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच त्यांची गंच्छती अटळ असून, त्यांच्या हकलपट्टीसाठी भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत, तर वनमंत्री राठोड यांचे फोन कॉल्स डिटेल्स आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

संजय राठोड यांचा राजीनामा तात्काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वीकारतील आणि तो राज्यपालांकडे पाठवतील, जेणे करून अधिवेशन व्यवस्थित पार पडेल असे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात येत आहे. तर, दुसरीकडे जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत संजय राठोड यांचा राजीनामा घेऊ नये असे शिवसेनेच्या एका गटाचे म्हणणे होते. मात्र, भाजपने वनमंत्री राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालूच देणार नाही, अशी कठोर भूमिका घेतल्याने येत्या दोन दिवसात राठोड यांचा राजीनामा घेण्याशिवाय शिवसेनेकडे पर्याय उरलेला नाही.

- Advertisement -

बीडच्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून मृत्यू झालेल्या घटनेला तीन आठवडे उलटून गेले असले तरी अद्याप FIR नोंदवलेला नाही. वनमंत्री संजय राठोड आणि मृत पूजा चव्हाण यांचे जवळीक सांगणारे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत, १२ ऑडिओ क्लिपदेखील व्हायरल झाल्या आहेत. पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर तब्बल १५ दिवसांनी वनमंत्री संजय राठोड पोहरादेवीच्या मंदिरात प्रकट झाले आणि कोरोनाच्या काळात जमावबंदी असताना देखील त्यांनी शक्तिप्रदर्शन केले होते. त्यामुळे वनमंत्री राठोड यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मास्क लावा कोरोनाला टाळा, या मूलमंत्रालाच हारताळ फासला होता. त्यामुळे शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधूनही राठोड यांच्यावर गर्दी जमवल्याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे.

१ मार्चपासून अधिवेशन सुरळीत पार पडायचे असेल तर मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, असा सूर शिवसेनेसह महाविकास आघाडीमध्ये ऐकायला मिळत आहे. त्यामुळे रविवार अखेरीस वनमंत्री संजय राठोड राजीनामा देतील अशी दाट शक्यता आहे.

- Advertisement -