घरमुंबईभिवंडीतील उड्डाणपूल खड्डेमय; नागरिक त्रस्त

भिवंडीतील उड्डाणपूल खड्डेमय; नागरिक त्रस्त

Subscribe

भिवंडीतील उड्डाणपुलांची दयनिय अवस्था झाली असून पालिकेने वेळीच या पूलाची दुरूस्ती करावी अशी मागणी पालिकेचे गटनेता निलेश चौधरी यांनी केली आहे.

भिवंडी शहरातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी जुना मुंबई-आग्रा रोडवर धामणकर नाका, कल्याण नाका ते बागे फिरदोस मशीद तसेच भिवंडी-वाडा रोडवर वंजारपट्टी नाका असे तीन उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. मात्र या पुलांच्या दुरूस्तीकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. या तिनही पुलांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे भिवंडीत वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. भिवंडी-वाडा रोडवरील वंजारपट्टी नाका येथे गेल्या दोन वर्षांपूर्वी एमएमआरडीएच्यावतीने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलावर मुसळधार पावसामुळे मोठमोठे खड्डे पडल्यामुळे उड्डाणपुलाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहतूककोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी अवजड वाहने खड्ड्यामध्ये आदळून बंद पडत आहेत. त्यामुळे उड्डाणपुलाच्या ढाच्यालाच धोका निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिका प्रशासनाच्यावतीने तातडीने एमएमआरडीएच्या अभियांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता यांना लेखी पत्र पाठवून हा उड्डाणपूल तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी भाजप गटनेते निलेश चौधरी यांनी केली आहे.

potholes on flyover in Bhiwandi
भिवंडीतील उड्डाणपूल खड्डेमय; नागरिक त्रस्त

तातडीने पुलाची दुरुस्ती करावी

शहरातील वाहतूककोंडी टाळण्यासाठी भिवंडी-वाडा व नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या वंजारपट्टी नाका या मुख्य चौकात एमएमआरडीएच्या माध्यमातून चौरंगी मार्ग असलेला उड्डाणपूल दोन वूर्षपूर्वी उभारण्यात आला आहे. या उड्डाणपुलाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. या उड्डाणपुलाची निगा व दुरुस्तीचे काम जेएमसी या कंपनी ठेकेदाराकडे आहे. मात्र गेल्या दीड वर्षापासून ठेकेदाराने उड्डाणपुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे पुलावरील रस्त्याचा पृष्ठभाग खराब होऊन वरच्या थराचा स्लॅब खुला झाला आहे. रस्त्यावरील काँक्रीट खराब झाल्याने मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे उड्डाणपुलावरील भिवंडी-वाडा-नाशिककडे जाणारी लहान मोठे ट्रक व कंटेनर आदी अवजड वाहने उड्डाणपुलावरील खड्ड्यांमध्ये आदळत असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. दररोज विविध वाहने खड्ड्यात आदळून बंद पडत आहेत. तसेच मोटार सायकलींचे वारंवार अपघात होत असून वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी तातडीने ठेकेदारामार्फत हा उड्डाणपूल दुरुस्त करून घ्यावा व नागरिकांना दिलासा द्यावा असे पत्र पालिकेच्यावतीने देण्यात येऊन तातडीने पुलाची दुरुस्ती करून घ्यावी, अशी मागणी निलेश चौधरी यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पब्जी खेळण्यास विरोध केला म्हणून महिलेला मारहाण


पुलांवरील खड्डे ठरताहेत वाहतूककोंडीला कारणीभूत

या पुलाच्या दुरुस्तीकडे वेळीच लक्ष दिले नाही तर स्व. राजीव गांधी उड्डाणपुलाची जशी अवस्था झाली आहे, तशीच अवस्था वंजारपट्टी पुलाची होईल, असा धोक्याचा इशारा देखील निलेश चौधरी यांनी दिला आहे. तर स्व.राजीव गांधी उड्डाणपुलाच्या निकृष्ट बांधकामामुळे या पुलाचा एसटी स्थानकासमोरील स्लॅब कोसळल्याची घटना मागील वर्षी घडली होती. त्यानंतर थातुरमातूर दुरुस्तीनंतर पुन्हा हा पूल वाहतुकीस खुला करण्यात आला होता. मात्र बांधकाम खूपच निकृष्ट असल्याने अवजड वाहनांच्या वाहतुकीने पुलाला हादरे बसत आहेत. या पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. तर पूल कधीही क्षतिग्रस्त होण्याचा धोका निर्माण झाल्याने पालिका प्रशासनाने अवजड वाहनांच्या वाहतूकीला बंदी केली आहे. मात्र हलकी वाहने चालवणे देखील त्रासदायक ठरत आहे. तसेच धामणकर नाका येथील उड्डाण पुलाची देखील वाताहत झाली असून जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या पुलांच्या दुरुस्तीकडे पालिका प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने वाहतूक कोंडी फोडण्यासाठी निर्माण केलेले पूल आज वाहतूकीसाठी अडथळे ठरत आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया पालिका गटनेते निलेश चौधरी यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -