घरमुंबईआता होणार 'डेंग्यु' आणि 'मलेरिया'चा खात्मा

आता होणार ‘डेंग्यु’ आणि ‘मलेरिया’चा खात्मा

Subscribe

पावसाळा सुरु झाला असून डेंग्यु आणि मलेरियाने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे मुंबईकरांनो सावधान!

पाऊस सुरु झाला नाही तोच आता वेगवेगळ्या आजारांनी डोकं वर काढलंय. त्यामुळे मुंबईकरांनो सावधान! कारण डेंग्यु आणि मलेरियाचे डास तुमच्या आजूबाजूला घोंगावायला लागले आहेत. या आजाराचे गांभीर्य लक्षात घेत आता मुंबई महानगरपालिकेनेदेखील कंबर कसली आहे. मुंबई आणि उपनगरातल्या अनेक ठिकाणी या रोगांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक औषध फवारणीला सुरुवात झाली आहे.

एनजीओची घेणार मदत

मुंबई महापालिकेतर्फे दरवर्षी पावसाच्या सुरुवातीला डेंग्यु, मलेरिया यांसारख्या आजारांपासून नागरीकांना वाचवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाते. यात प्रतिबंधात्मक औषध फवारणीही महत्त्वाची असते. इमारती, चाळींमध्ये जाऊन ही फवारणी केली जाते. सध्या मुंबई आणि उपनगरातील काही भागांमध्ये ही फवारणी सुरु आहे. विशेषत: सांताक्रुझ, लोअर परळ, ग्रँड रोड, परळ, गोवंडी, बोरीवली  मध्ये फवारणी सुरु असून काम अधिक वेगाने व्हावे यासाठी महानगरपालिकेने एका स्वयंसेवी संस्थेची (NGO) मदत घेतली आहे. या संस्थेच्या माध्यमातून एकाचवेळी अनेक कामगार वेगवेगळ्या ठिकाणी औषध फवारणी तसेच डासांची पैदास होणाऱ्या ठिकाणी असणारा कचरा उचलण्याचे काम करत आहेत.

- Advertisement -
तुमच्या घरात डेंग्यु आणि मलेरियाचे डास तर नाहीत ना?

डेंग्यु आणि मलेरिया हा डासांच्या चावण्यामुळे होतो. ‘एगेस एडीज‘ नावाचा डास चावल्यास डेंग्युची लागण होते. तर ‘मलेरिया अनोफेलेस‘ नावाच्या डासामुळे होतो. हे दोन्ही आजार पावसाळ्यात बळावतात. महत्त्वाची बाब म्हणजे पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यामध्ये हे डास अंडी घालतात. त्यामुळे घरामधील कुंड्या, इनडोअर प्लांटस, गॅलरीतील प्लास्टिकच्या वस्तू, एसीचे साठलेले पाणी, जुने प्लास्टिकचे बूट अशा वापरात नसलेल्या वस्तूंमध्ये पाणी साचते आणि या साचलेल्या पाण्यातूनच डासांची पैदास होते. हे डास आपली अंडी स्वच्छ पाण्यातच टाकतात.

aedes_aegypti_doggett
डेंग्यूचा एगेस एडीज डास
Anopheles
मलेरियाचा अॅनोफेलेस डास
डेंग्यु आणि मलेरियाची लक्षणं

डेंग्यु आणि मलेरिया या दोन्ही आजारांमधील ताप, डोकेदुखी, अंगदुखी, उलट्या, थंडी वाजणे, अंग मोडून येणे ही लक्षणं थोड्या फार फरकाने सारखीच असली तरी या दोन्ही आजारांसाठी स्वतंत्र उपचारपद्धती आहेत. त्यामुळे तुम्हाला अशी कोणतीही लक्षणं आढळल्यास त्वरीत तपासणी करा.

- Advertisement -
कशी घ्याल काळजी?

१. घरात कोठेही पाणी साचू देऊ नका

२. घरात एसी असल्यास एसीचे पाणी वेळोवेळी रिकामं करत जा

३. घरात मनी प्लँट आणि इतर झाडे असल्यास त्यातील पाणी बदला. शक्य असल्यास अशी झाडे घरात ठेवू नका

४. खिडक्यांमध्ये कुंड्या असल्यास कुंड्यांच्या खाली असलेल्या प्लेटमधील पाणी काढून टाका

५. संध्याकाळी घराच्या खिडक्या उघड्या ठेवू नका. मच्छर येणार नाहीत अशा जाळ्या खिडक्यांना बसवून घ्या

६. पिण्याचे पाणी झाकून ठेवा. शक्य असल्यास पाणी गरम करुन प्या

७. थंडगार पेय टाळा, बाहेर खायचं असेल तर गरम पदार्थच खा

८. इमारतीच्या आवारात पाणी साचले असेल तर पाणी वेळीच काढून टाका

९. मलेरिया आणि डेंग्युच्या डासांची प्रतिबंधात्मक फवारणी इमारतीच्या आवारात करुन घ्या

१०. अंगावर डास बसू देऊ नका. पूर्ण बाह्यांचे कपडे घाला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -