आम्ही संघर्ष केला, आणि पुढेही करू. पण त्यासाठी तुमची साथ हवी; राज ठाकरेंचं आवाहन

. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने शुभेच्छा पत्र शेअर केलंय. या पत्रात राज ठाकरेंनी हे आवाहन केलंय.

balasahebancha raj drama based on raj thackeray balasaheb thackeray relation coming on stage 23 january

मराठी भाषा दिनानिमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी माणसांना उद्देशून एक आवाहन केलं आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देत सर्व मराठी बांधवांना एकत्र येण्याचं आवाहन केलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने शुभेच्छा पत्र शेअर केलंय. या पत्रात राज ठाकरेंनी हे आवाहन केलंय.

मराठी भाषेच्या अभिजात भाषेच्या दर्जासाठी आम्ही संघर्ष केला आणि पुढे देखील करु. पण त्यासाठी आमच्या संघर्षाला तुमची साथ द्या, असं आवाहन राज ठाकरे यांनी या पत्रात केलं आहे. तसंच यात त्यांनी लिहिलं की, “कुसुमाग्रजांच्या सांस्कृतिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाला अभिवादन म्हणून तेव्हाच्या सरकारने, कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, 27 फेब्रुवारी, ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून घोषित केला. पण नेहमीप्रमाणे सरकारी उदासीनतेत तो साजरा व्हायचा. कुठल्याही राजकीय पक्षाला देखील तो साजरा करायची इच्छा नव्हती. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तो अत्यंत उत्साहात साजरा करायला सुरुवात केली. मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा मिळावा म्हणून पत्रव्यवहार करणारा पक्ष पण आमचाच पहिला. हे सगळं सांगायचा उद्देश इतकाच की, आपल्या भाषेसाठी, आपल्या सणांसाठी, आपल्या संस्कृतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून इतर एकही पक्ष हिरीरीने पुढे आलेला नाही. आणि सध्या जी एकूणच जी राजकीय दंगल सुरु आहे, त्यात कोणी येईल अशी शक्यता वाटत नाही.”

“लाडक्या मराठी भाषेच्या गौरव दिनानिमित्त शुभेच्छा देताना या भाषेसाठी आपल्याला सगळ्यांना उभं रहावं लागणार आहे हे भान सोडून चालणार नाही. व्यवहारात मराठी, प्रशासनात मराठी, दूरसंचार माध्यमांमध्ये मराठी, दूरदर्शनच्या समालोचनात मराठी इथपासून ते अभिजात भाषेच्या दर्जासाठी आम्ही संघर्ष केला, आणि पुढे देखील करु. पण त्यासाठी तुमची आमच्या संघर्षाला साथ हवी तरच हे शक्य आहे. मला माहिती आहे, मनसेकडूनच तुमच्या सगळ्या बाबतीत अपेक्षा असतात, पण ह्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुमच्या साथीची गरज आहे. आपण ‘मराठी एकत्र’ असू तर ‘सर्वत्र मराठी’ करायला क्षणाचाही विलंब लागणार नाही”, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

“मी माझ्या विकास आराखड्यात म्हणलं आहे तसं, मराठी जगाची ज्ञानभाषा व्हावी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा हे आपलं स्वप्न असायला हवं. हे स्वप्न वास्तवात यावं, ह्याच आजच्या दिवसाच्या शुभेच्छा” , असं राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.