घरमुंबईरणदिवेंनी पत्रकारितेला ज्येष्ठत्व दिले

रणदिवेंनी पत्रकारितेला ज्येष्ठत्व दिले

Subscribe

मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गगार

संस्थांना उंच करणारी ठराविक माणसं असतात. राज्यातल्या पत्रकारितेला ज्येष्ठत्व देण्यात ज्यांचा विशेषत्वाने उल्लेख करता येईल, त्यात ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचा आवर्जून समावेश होत असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने जाहीर केलेल्या जीवन गौरव पुरस्काराच्या वितरणावेळी मुख्यमंत्री बोलत होते. दिनू रणदिवे यांच्या पत्नी सुनीताताई रणदिवे यांचा सत्कार पत्रकार नेहा पुरव यांनी केला. आयबीएन लोकमतचे प्रतिनिधी महेश तिवारी, प्राजक्ता पोळ आणि विश्वास वाघमोडे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे.

बाळासाहेब ठाकरेंनी त्यांची व्यंगचित्रे दिनूजींच्या संयुक्त महाराष्ट्र पत्रिकेत छापण्यापासून आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी रणदिवेंच्या पत्रकारितेने विशिष्ट वारसा महाराष्ट्रात निर्माण केला असल्याचे म्हटले. संस्था उंच करणारी काही मंडळी असतात राज्यातील पत्रकारितेला उंच स्तरावर नेण्याचे महत्कार्य रणदिवेंनी केल्याचा उल्लेख आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी केला. पत्रकारातील खर्‍या गुणांची गोफण रणदिवेंच्या पत्रकारितेत असल्याचे फडणवीस म्हणाले. हाडाचा पत्रकार कसा असावा, हे रणदिवेंच्या पत्रकारितेतून शिकण्याचा सल्लावजा सूचना मुख्यमंत्र्यांनी उपस्थित पत्रकारांना केली. जीवनगौरव पुरस्कारासाठी रणदिवेंसारख्या साव्यासाची ज्येष्ठ पत्रकाराची निवड केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे कौतुक केले.

- Advertisement -

आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी राज्य पत्रकार पुरस्कार विजेते महेश तिवारी यांचे विशेषत्वाने कौतुक केले. नक्षलवाद्यांपुढे दोन हात करून गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात पत्रकारिता करण्याचे महत्कार्य महेशने केले असल्याचे सांगताना आम्ही झेड सुरक्षेशिवाय जिथे पोहचू शकत नाही, तिथे महेश तिवारी हे कुठल्याही सुरक्षेविना पोलीस जात नाहीत तिथे पोहोचतात आणि पोटतिडकीने प्रश्न मांडतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाविषयी लिखाण करणारे इंडियन एक्प्रेसचे प्रतिनिधी विश्वास वाघमोडे यांच्या पत्रकारितेचा उल्लेख करताना त्यांच्या वृत्तांवर अनेकदा खुलासे करण्याची वेळ सरकारवर आल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. तर वार्ताहर संघ सदस्यासाठीच्या पुरस्कार विजेच्या आयबीएन लोकमतच्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांनाही मुख्यमंत्र्यांनी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरव केला.

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर आणि संजीव खांडेकर यांची भाषणे झाली. रायकर यांनी दिनू रणदिवे यांच्या पत्रकारितेचे काही किस्से उपस्थितांपुढे ठेवले. रेल्वेच्या संप काळात आम्ही पत्रकार रेल्वे अधिकार्‍यांच्या खुलाशाच्या संप चिरडल्याच्या बातम्या छापत असू, पण प्लॅटफॉर्मवर उभे राहून संप कसा यशस्वी झाला, याचे वार्तांकन रणदिवेंनी केल्याचे रायकर म्हणाले. संजीव खांडेकर म्हणाले, दिनू रणदिवे यांच्या सारख्यांच्या पत्रकारितेने त्या काळात ग्लॅमर नसताना प्रतिष्ठा राखली. सोयी नसताना समाधान होते. आजच्या पत्रकारितेत पसारा वाढला पण प्रभाव नाही राहिला, ग्लॅमर आले पण प्रतिष्ठा लोप पावली. पुरस्कार सोहळ्याचे प्रास्ताविक वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी तर आभार उपाध्यक्ष दिलीप जाधव यांनी मानले.

- Advertisement -

पा.वा.गाडगीळ यांच्यामुळे पत्रकारितेत
दिनू रणदिवे यांनी आपल्या भाषणात त्यांच्या काळातील पत्रकारितेचे किस्से सांगितले. शुध्दलेखनाच्या प्रश्नावरच पत्रकारितेला सोडचिठ्ठी देण्याचा आलेला प्रसंग रणदिवेंनी ऐकवला. पत्रकारितेत सर्वार्थाने गुरू ठरले ते दिवंगत ज्येष्ठ पत्रकार पा.वा. गाडगीळ. गाडगीळांमुळेच आपण पत्रकारितेत रुळलो आणि वाढलो, असे रणदिवे म्हणाले. लोकमान्य वर्तमान पत्रात अ‍ॅप्रॅन्टीस म्हणून रुजू झाल्यानंतर पत्रकारितेत अनेक चढ-उतार आपल्या पत्रकारितेत आल्याचे रणदिवे म्हणाले. गोव्यात मुक्ती आंदोलनात सहभाग घेतला म्हणून पोलिसांचा खूप मार बसला. याची आठवण त्यांनी यावेळी ऐकवली.

पत्रकार पेन्शन आणि घरप्रश्न मार्गी
पत्रकारांच्या पेन्शन योजनेचा निर्णय लवकरच प्रत्यक्ष कृतीत येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. विधिमंडळ वार्ताहर संघातील पत्रकारांच्या घरांच्या प्रश्नावरही त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. पत्रकारांच्या घरांसाठी म्हाडाच्या माध्यमातून योजना तयार करण्यात आली आहे. अर्थात या योजनेची व्याप्ती मोठी असल्याने त्यात विधिमंडळ व मंत्रालयाचे वार्तांकन करणार्‍या पत्रकारांना घर मिळेलच, याची खात्री नव्हती. ही बाब लक्षात घेऊन अशा पत्रकारांना या घरांमध्ये ५० टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. या योजनेसाठी जागा मिळाली आहे. प्रकल्पाचं स्वरूपही निश्चित झालेलं आहे, असे मुख्यमंत्र्यांनी पुढे स्पष्ट केले. येत्या एका महिन्यात यासंबंधीची कार्यवाही पूर्ण होईल. त्यात आचारसंहितेचा कोणताही अडथळा येणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -