Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई गुढीपाडव्याच्या दिवशी राणीची बाग राहणार खुली; मुंबई महानगपालिकेचा निर्णय

गुढीपाडव्याच्या दिवशी राणीची बाग राहणार खुली; मुंबई महानगपालिकेचा निर्णय

Subscribe

नेहमी गुढीपाडव्याच्या दिवशी बंद ठेवण्यात येणारे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय म्हणजेच राणीची बाग यावर्षी जनतेसाठी खुली ठेवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मुंबई महानगरपालिकेने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.

मुंबईकर नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा देणारी बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईकरांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी विरंगुळ्याची ठिकाणेही उपलब्ध करुन देत असते. या विरंगुळ्याच्या ठिकाणांपैकी अत्यंत महत्त्वाचे विरंगुळ्याचे ठिकाण म्हणजे भायखळा पूर्व परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय म्हणजेच राणीची बाग. या उद्यान व प्राणिसंग्रहालयाची साप्ताहिक सुट्टी ही दर बुधवारी असते. मात्र, यापूर्वी महानगरपालिकेने मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्या बुधवारी हे उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले ठेवण्यात येईल. त्यानुसार येत्या बुधवारी म्हणजेच दि. 22 मार्च 2023 रोजी गुढीपाडव्यानिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे. मात्र, या सुट्टीच्या दिवशी उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेच्या सुविधेकरिता खुले ठेवण्यात येणार आहे. तर या आठवड्यातील साप्ताहिक सुट्टी ही येत्या गुरुवारी म्हणजेच दिनांक 23 मार्च 2023 रोजी असणार आहे. जेणेकरुन पाडव्याच्या सुट्टीच्या दिवशी लहान-थोरांना उद्यान व प्राणिसंग्रहालयातील प्राणी, वनस्पती, पक्षी यांना बघता येईल व एकूणच तेथील पर्यावरणाचा आनंद घेता येईल.

दरम्यान, बुधवारी राणीची बाग जनतेकरिता खुले ठेवण्यात येणार असल्याने त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी हे प्राणिसंग्रहालय बंद ठेवण्यात येणार आहे. यानुसार राणीची बाग प्राणिसंग्रहालय गुरुवार, दिनांक 23 मार्च, 2023 रोजी जनतेकरिता बंद राहणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. हे उद्यान साप्ताहिक सुट्टीचा दिवस वगळता आठवड्यातील इतर सर्व दिवशी नागरिकांसाठी खुले असते. इतर दिवशी सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.00 या दरम्यान उद्यानाची तिकीट खिडकी सुरु असते. तर उद्यान सायंकाळी 6.00 वाजता बंद होते.

- Advertisement -

या उद्यानात प्रवेशासाठी प्रती व्यक्ती 50 रुपये इतके शुल्क असून वयवर्ष 3 ते 15 या वयोगटातील मुलांसाठी 25 रुपये इतके प्रवेश शुल्क आकारण्यात येते. विशेष म्हणजे आई – वडिल आणि 15 वर्षे वयापर्यंतची 2 मुले अशा 4 व्यक्तिंच्या कुटुंबासाठी 100 रुपये इतके एकत्रित शुल्क आकारण्यात येते.

राणीची बाग ही मुंबईतील सर्वाधिक प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ आहे. म्हणून या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी इतर दिवसांपेक्षा सर्वाधिक गर्दी पाहायला मिळते. तसेच, याच बागेत आता पेंग्विन देखील दाखल करण्यात आल्याने ते पाहण्यासाठी नागरिक अधिक गर्दी करतात, अशी माहिती मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


- Advertisement -

हेही वाचा – शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये तृतीयपंथीयांना आरक्षणाचा विचार करा, हायकोर्टाचा राज्य सरकारला आदेश

- Advertisment -