घरमुंबईअनधिकृत बांधकाम आणि लालफितीने घेतला बळी

अनधिकृत बांधकाम आणि लालफितीने घेतला बळी

Subscribe

रिक्षाचालकाचे आत्मदहन

अनधिकृत बांधकामात घर घेण्यासाठी पैसे गुंतवल्यानंतर झालेली फसवणूक. पैसे मिळवण्यासाठी सरकारी कामकाजात होत असलेल्या दिरंगाईने नालासोपार्‍यातील रिक्षा चालकाचा बळी गेला. गेले वर्षभर तगादा लावूनही काहीच हाती लागत नसल्याने गणेश दामू भोर यांनी स्वतःला जिल्हाधिकारी कार्यालयात पेटवून घेतले. त्यानंतर काही तासातच त्यांचा अंत झाला.

या दुदैनी घटनेने वसई विरारमधील अनधिकृत बांधकाम करणार्‍यांकडून होणारी फसवणुक आणि पोलीस खात्याचा बिल्डरधार्जिणा कारभार चव्हाट्यावर आला आहे. नालासोपार्‍यात राहणार्‍या रिक्षाचालक गणेश भोर यांनी स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनधिकृत बांधकाम करणार्‍या बिल्डरकडे आठ लाखाची गुंतवणूक केली होती. पण, अनेक महिने उलटून गेल्यानंतरही बिल्डर घर देत नसल्याने फसवणुक झालेल्या भोर यांनी बिल्डरकडे पैशांची मागणी केली. बिल्डरने रडत रखडत सहा लाख रुपये परत केले. त्याच दरम्यान फसवणुकीच्या गुन्ह्याखाली पोलिसांनी बिल्डरला अटक केली.

- Advertisement -

बिल्डरला एमपीआयडी अंतर्गत अटक झाल्याने पैशासाठी भोर यांना वसई कोर्टाचा दरवाजा ठोठावावा लागला. कोर्टाने पोलिसांमार्फत जिल्हाधिकार्‍यांकडून अहवाल मागितला होता. पण, अहवाल आला नसल्याने भोर यांनी मागच्या आठवड्यात कोर्टात पत्र देऊन आपण आत्महत्या करीत आहोत असे म्हटले होते. त्यावेळी कोर्टाने त्यांची समजूत काढली होती. त्यानंतर भोर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. त्याची 4 ऑक्टोबरला सुनावणी होती. पण, 3 ऑक्टोबरलाच भोर निवासी उपजिल्हाधिकारी संजय जाधव यांच्या कार्यालयात पोचले. त्यावेळी पोलीस अधिक्षक कार्यालयातून प्रस्ताव आला नसल्याचे सांगितले. त्यामुळे हताश झालेल्या भोर यांनी अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून दिले. रात्री अडीचच्या सुमारास भोर यांचा मुंबईतील हॉस्पीटलमध्ये मृत्यू झाला.

दरम्यान, पोलिसांकडून वेळेत प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात आला नसल्याने कोर्टाला अहवाल पाठवता आला नाही. पोलीस अधिक्षक कार्यालयातून प्रस्ताव येण्यास विलंब का झाला याची चौकशी केली जाईल. यात दोषी असणार्‍यांवर फौजदारी कारवाई करू, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -