घरमुंबईशिवसेनेच्या नेत्यांमध्ये चढाओढ

शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चढाओढ

Subscribe

राज्यपाल राम नाईक यांची सोमवारी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची मंगळवारी भेट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसर्‍या मेळाव्यात अयोध्येला जाऊन भव्य सभा घेणार, अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा केली होती. मात्र २५ नोव्हेंबरला प्रस्तावित जाहीर सभा होणार का? यावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जाहीर सभा घेण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या अजून मिळालेल्या नसताना ‘मिशन अयोध्या’ यशस्वी करण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चढाओढ लागल्याचे पाहायला मिळत आहे.उद्धव ठाकरेंनी अयोध्येत सभा न घेता फक्त वादग्रस्त राम मंदिराच्या जागेला भेट देऊन महत्त्वाच्या पुजार्‍यांना भेटावे, असे मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनी नेत्यांच्या बैठकीत नुकतेच व्यक्त केल्याचे समजते. तर अयोध्येत पक्षप्रमुखांची जाहीर सभा व्हायलाच पाहिजे, असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचे असल्याचे कळते. त्यामुळे उद्धव यांनी त्यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांनाच या कामाच्या देखरेखीसाठी अयोध्येत पाठवले आहे. सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, अनिल परब आणि इतर आमदार अधिवेशनात व्यस्त आहेत. याचाच फायदा उचलत आम्हीच कसे अयोध्येतील पक्षप्रमुखांचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटत आहोत, हे दाखवण्यासाठी राऊत आणि नार्वेकर यांची धडपड चालल्याची चर्चा शिवसेनेत ऐकायला मिळत आहे.

अयोध्या वारीवर शिवसेनेत मतभेद, पाहा काय म्हणतायत उद्धव ठाकरे!

- Advertisement -

नार्वेकरांचा ‘नेहले पे देहला’

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपूर्ण अयोध्या दौर्‍याची जबाबदारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांच्यावर सोपविली आहे. मागील एक महिन्यापासून ते उत्तर प्रदेशचे दौरे करत आहेत. आतापर्यंत त्यांनी चार वेळा अयोध्या वारी केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेतली होती. मात्र जाहीर सभेसाठी परवानग्या मिळवण्यात त्यांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळेच उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार मिलिंद नार्वेकर यांनी अयोध्या गाठत सोमवारी थेट राज्यपाल राम नाईक यांची भेट घेतली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबंधित परवानग्या द्याव्यात, अशी विनंती नार्वेकर आणि राऊत यांनी मंगळवारच्या भेटीत केल्याचे कळते. राऊत आणि नार्वेकर यांनी मंगळवारी दहा वाजता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घेतलेली भेट प्रलंबित परवानग्या मिळवण्यासाठी सकारात्मक झाल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

नेत्यांमध्येच जुंपली ‘मी मी’ची स्पर्धा

पक्षप्रमुखांच्या संभाव्य जाहीर सभेला गर्दी जमवण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी ठाण्याचे पालकमंत्री, नेते एकनाथ शिंदे आणि मुंबईतल्या काही नेत्यांवर सोपवली आहे. आम्ही गर्दी जमवू; पण जाहीर सभा घ्या, अशी मागणी शिंदे यांनी पक्षप्रमुखांकडे केल्याचे समजते. तर मातोश्रीच्या जवळील खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, आमदार अ‍ॅड. अनिल परब हे देखील आपापल्या परीने आम्ही दौर्‍यासाठी काय काय करतोय? हे दाखविण्याची धडपड करत आहेत. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी देखील उत्तर प्रदेश सरकारला पत्र लिहून जाहीर सभेसाठी परवानग्या देण्याची विनंती केली आहे.

असा असेल उद्धव ठाकरेंचा दौरा

उद्धव ठाकरेंच्या नियोजित वेळापत्रकानुसार २४ नोव्हेंबर रोजी शरयू नदीकिनारी संध्याकाळी ५.१५ वाजता ते आरती करतील. त्याआधी लक्ष्मण किला येथे ते काही पुजार्‍यांना भेटणार आहेत. २५ नोव्हेंबरला ते वादग्रस्त रामजन्मभूमीला भेट देऊन आधी पत्रकार परिषद घेतील आणि त्यानंतर दुपारी १ वाजता जाहीर सभा घेतील.

दौर्‍याला परवानग्या मिळाल्या

उद्धव ठाकरेच्या अयोध्या दौर्‍याला सर्व परवानग्या मिळाल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली आहे. अयोध्येतील राम मंदिराचे 68 एकर क्षेत्र हे अतिसंवेदनशील यलो झोनमध्ये येत असल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौर्‍याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या आयुक्तांबरोबरच, नगर निगमचे आयुक्त, स्थानिक पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या विशेष बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. दौर्‍याच्या नियोजनासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने ठाण मांडत या परवानग्या पूर्णत: मिळवल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केला.

शरयू नदीवर महाआरती करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांची परवानगी मिळाली आहे. महाआरती करण्यासाठी कोणत्याही प्रकारची गरज लागत नाही. परंतु शिवसेनेने या कार्यक्रमाची रितसर परवानगी पोलिसांकडून मिळवली आहे. याचवेळी संध्याकाळी आशीर्वाद उत्सव साजरा केला जाणार आहे. हा आशीर्वाद उत्सव स्थानिक संत, महंत करणार आहेत. त्यामुळे ही परवानगीही मिळाली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे यजमान म्हणून आशीर्वाद उत्सवात सहभागी होणार आहेत. त्यामुळे संत, महंतांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांना आशीर्वाद उत्सवातून संत, महंतांचे आशीर्वाद प्राप्त होणार असल्याचे शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्यांनी आपलं महानगरला नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले .अयोध्या क्षेत्राबाबत सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या आयुक्तांबरोबरच, नगर निगमचे आयुक्त, स्थानिक पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या विशेष बैठका झाल्या आहेत. अयोध्या भूमीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दीपोत्सव आणि कार्तिक मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍याला परवानगी मिळण्यास उशीर झाला. उद्धव ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा असल्याने कुठल्याही प्रकारचा अनूचित प्रकार घडू नये म्हणून ठराविक जणांनाच रामलल्लाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. याचवेळी उद्धव ठाकरे इथल्या स्थानिक लोकांशी जनसंवाद करणार आहेत.

सभा नाही, जनसंवाद करणार !

मुंंबईतील एका कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सभेबाबत विचारले असता, सभा घेणार हे मी कधी सांगितले? सभा घेण्यासंदर्भात शिवसेनेत दोन मतप्रवाह आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ज्यांच्या पोटात दुखते तेच अशा पद्धतीने सांगत सुटले आहेत, असा टोला लगावला.

२४ नोव्हेंबर रोजी मी अयोध्येत जाणार आहे, मात्र अद्याप अधिकृतरित्या माझा कार्यक्रम जाहीर केलेला नाही. परंतु दसरा मेळाव्यात मी सांगितल्याप्रमाणे २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येतील श्रीरामाचे दर्शन घेणार आहे. तोच माझा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. त्याअनुषंगाने मला तेथील संतांनी आमंत्रित केल्यानुसार शरयू नदीची आरती करणे आणि अन्य कार्यक्रमांचाही समावेश त्यात करण्यात येणार आहे. माझ्या अयोध्येतील कार्यक्रम पत्रिकेला १-२ दिवसांत अंतिम स्वरूप देण्यात येईल. अयोध्या दौर्‍याप्रकरणी शिवसेनेत दोन गट पडल्याची बातमी माझ्या वाचनात आली नाही. तसे कुठेच ऐकिवात नाही. शिवसेना जेव्हा चांगले काम करते, तेव्हा अनेकांना पोटशूळ उठतो. त्यामुळे त्याला काही विशेष महत्त्व देण्याची गरज नाही.
-उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नियोजित अयोध्या दौरा व्यवस्थित पार पडत आहे. यात तेथील सभेचा विषय कुठून आला, हे मला माहित नाही.
– खासदार,संजय राऊत
   शिवसेना नेते

मुंबई ठाण्यातील शिवसैनिकांनी फौजबाद, अयोध्या, गोंडा एक्स्प्रेसने राज्यभरातून 20 नोव्हेंबरलाच अयोध्येला कूच केली. बुधवारी कुर्ला लोकमान्य टर्मिनस येथून ठाण्यातील शिवसैनिक रवाना होतील. देशभरातून 1 लाख शिवसैनिक अयोध्येला जातील अशी माहिती शिवसेनेकडून देण्यात येते. मंगळवारी शिवसेना नेते एकनाथ शिंदे, आमदार सुनिल प्रभू आणि आमदार अजय चौधरी हे अयोध्येत पूर्वतयारीसाठी गेलेत.

शिवसेनेत गटतट नाहीत असा दावा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करीत असले तरी खासदार संजय राऊत यांचा अयोध्या दौर्‍यात दुसर्‍या कुणालाही क्रेडीट मिळू नये म्हणून खटाटोप सुरू आहे. राऊत यांना एकनाथ शिंदे नकोत. खासदार विनायक राऊत आणि अ‍ॅड. अनिल परब यांचीही पुढेपुढे लुडबूड नको आहे. खासदार अनिल देसाई हे नेहमीप्रमाणे कानामागून तिखट होतील, अशी भीती राऊत यांना आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -