घरमुंबईमुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा न देताच सचिन अहिर शिवसेनेत

मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा न देताच सचिन अहिर शिवसेनेत

Subscribe

माजी मंत्री सचिन अहिर यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश करत हाती शिवबंधन बांधून घेतले. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा अनपेक्षित धक्का होता. सचिन अहिर हे मागच्या सलग सहा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष होते. आतापर्यंत त्यांनी चार टर्म म्हणजे १२ वर्ष मुंबईचे अध्यक्षपद भुषविले आहे. मात्र शिवसेनेत प्रवेश करतेवेळी त्यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा आणि प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामाच दिला नसल्याचे समोर आले आहे. आपलं महानगरने याबाबत सचिन अहिर यांना संपर्क साधून राजीनाम्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, “राजीनामा साहेबांकडे दिला आहे.” मात्र कोणत्या साहेबांकडे राजीनामा दिला? असा प्रतिप्रश्न आपलं महानगरकडून विचारला असता सचिन अहिर यांनी फोन डिसकनेक्ट केला.

सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक महत्त्वाचे नेते होते. १९९९ साली जेव्हा राष्ट्रवादीची स्थापना झाली, तेव्हापासून ते पक्षाचे संस्थापक सदस्य म्हणून पक्षात होते. अतिशय कमी वयातच त्यांना पक्षाच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये बसण्याचा मान मिळाला होता. सत्तेत असताना त्यांच्यावर गृहनिर्माण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती. तसेच शरद पवारांच्या पुण्याईमुळे ते गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष होते. तसेच २०१४ साली वरळीतून पराभव झाल्यानंतर त्यांच्यावर सलग दोन टर्म मुंबईच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मुबंईत राष्ट्रवादी काँग्रेस सुरुवातीपासूनच कमकुवत होण्यामागे सचिन अहिर यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. यातच मुंबईच्या अध्यक्षानेच राजीनामा न देता पक्ष सोडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच नाचक्की झाली आहे.

- Advertisement -

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कारवाई का नाही केली?

सचिन अहिर यांनी पक्ष सोडल्यानंतर अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे बोट दाखवत, “सचिन अहिर यांच्याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारा” असे सांगत कानावर हात ठेवले. तर जयंत पाटील यांच्याशी आपलं महानगरने संपर्क साधला असता ते बैठकीत व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. अहिर आणि जंयत पाटील यांचे गेले काही वर्ष मुबंईत घनिष्ठ हितसंबंध असल्याची दबकी चर्चा राष्ट्रवादीत कित्येक वर्षांपासून सुरु आहे. राज्यात सत्तेत असताना जयंत पाटील हे १५ वर्ष मुंबईचे पालकमंत्री होते. तर गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर याच काळात जयंत पाटील यांचे निकटवर्तीय बनले. या जवळीकीमधूनच पाटील यांनी आतापर्यंत अहिर यांच्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचा संशय पक्षातूनच व्यक्त केला जात आहे. अहिर यांच्याठिकाणी दुसऱ्या कोणत्याही नेत्याने जर राजीनामा न देता पक्षांतर केले असते, तर त्यावर शिस्तभंगाची कारवाई केली असती. मात्र अहिर यांच्याबाबत पक्ष मवाळ का? असा प्रश्न मुंबईतीलच राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने उपस्थित केला आहे.

राजीनाम्यावरुन प्रदेश कार्यालयाचे दिल्लीकडे बोट

काँग्रेस आणि राष्ट्रवादीत मुंबई प्रांताच्या प्रदेश अध्यक्षाला राज्याच्या प्रदेशाध्यक्षाचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांची नियुक्ती किंवा हकालपट्टी दिल्लीतून होत असते. त्यामुळेच अहिर यांच्या राजीनाम्याबाबत आता प्रदेश कार्यालय दिल्लीकडे बोट दाखवत आहे. शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार देखील दिल्लीलाच असल्याचेही प्रदेश कार्यालयातून सांगण्यात आले. सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश करतेवेळी खुलासा केला होता की, ‘मी शिवसेनेत जात असल्याचं पवार साहेबांना सांगण्याची हिंमत झाली नाही. कारण साहेब फार मोठे नेते आहेत’. मात्र, असं असतानाही त्यांनी पदाचा राजीनामा ना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला, ना दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीकडे दिल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.

- Advertisement -

कार्यकर्त्यांनी मात्र फटाके फोडून आनंद व्यक्त केला

सामान्यतः एखादा नेता पक्ष सोडून गेल्यावर पक्षात मरगळ वैगरे दिसते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी अहिर यांनी पक्ष सोडल्याचा आनंद व्यक्त केला. तसेच मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसने ‘उंदीर गेला’ अशी हेटाळणीही सोशल मीडियावर केली. मुंबईतील सहा जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्षांनी प्रदेश कार्यालयात जमून मुंबईत राष्ट्रवादी वाढण्यासाठी सचिन अहिर यांनी प्रयत्न केले नव्हते. तसेच त्यांच्यासोबत एकही कार्यकर्ता गेला नाही, असेही सांगितले.

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -