भाजपाला कोण पराभूत करू शकतो या आधारावर जागावाटपाचा निर्णय व्हावा – नाना पटोले

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून अनेक प्रकारचे दावे केले जात आहेत. अशातच लोकसभेच्या जागांबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले की, जागा कोण कमी-जास्त घेतो याचा विचार न करता भाजपाला त्या-त्या भागात कोण पराभूत करू शकतो या आधारावर जागावाटपाचा निर्णय व्हावा.

नाना पटोले म्हणाले की, संविधानिक पदावर बसून राज्यपालासारख्या पदावर बसून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटलांचा अवमान करणारी व्यवस्था भाजपाच्या मानसिकेतमुळे निर्माण झाली. अर्ध्या डझनपेक्षा जास्त मंत्र्यांनी महापुरुषांचा अवमान केला आणि महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला. महाराष्ट्राचं आर्थिक, शेती, उद्योग ही सर्व व्यवस्था संपवण्याचे पाप भाजपा करते आहे. त्याला थांबवण्यासाठी काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की, मेरिटच्या आधारावर या सगळ्या गोष्टींचा निर्णय व्हावा, असे नाना पटोले यांना वाटते.

2014 मधली परिस्थिती वेगळी होती, 2019 मध्ये परिस्थिती वेगळी होती. आता परिस्थिती बदलली आहे. जागा कोण कमी-जास्त घेतो याचा विचार न करता भाजपाला त्या-त्या भागात कोण पराभूत करू शकतो या आधारावर जागावाटपाचा निर्णय व्हावा. म्हणून येत्या 2 ते 3 तारखेला महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीमध्ये आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या सर्व नेत्यांना बोलावून आढावा घेणार आहोत. आम्ही एक सर्वे करायला लावला आहे. त्या सर्वेमधून जो रिपोर्ट येईल त्या माध्यमातून महाविकास आघाडीसमोर जागावाटपाचा प्रस्ताव ठेवला जाईल. त्यानंतर सगळ्यांच्या सहमतीने मेरिटच्या आधारावर निर्णय घेण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि याला विरोध राहण्याचा कोणाला कारण नाही, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

परिस्थितीचा आढावा घेऊन स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला जाईल
स्वबळावर लढणार का? या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधीच आम्ही सांगितले आहे की, जिल्हा परिषद पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका असेल तेथील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन स्वबळावर लढण्याचा त्यावेळी निर्णय घेतले जातील.