घरमुंबईझाले  मोकळे आकाश!

झाले  मोकळे आकाश!

Subscribe

समलैगिक संबंध गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. हे संबंध गुन्हा ठरवणारे कलम 377 न्यायालयाने रद्द केले. त्यामुळे आमच्या नात्याला कायद्याने मान्यता मिळाली आहे. आमच्यासाठी आजचा दिवस स्वातंत्र्य दिवस आहे

दळ उमलत जाते एकेक
वर दवबिंदूंची थरथर
मन धुक्यात हरवत जाते
अंधार परतीच्या वाटेवर
लख्ख उजळून आले श्वास
झाले मोकळे आकाश
नाते सावरताना माझ्या
अश्रूंचा प्रकाश
म्हणेल ओली माती- झाले मोकळे आकाश

समलैगिक संबंध गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. हे संबंध गुन्हा ठरवणारे कलम 377 न्यायालयाने रद्द केले. त्यामुळे आमच्या नात्याला कायद्याने मान्यता मिळाली आहे. आमच्यासाठी आजचा दिवस स्वातंत्र्य दिवस आहे. आमच्यातील समलिंगी नात्यामुळे आम्ही दोघांनी खूप सोसले. विशेषतः समाजाकडून बराच मानसिक त्रास सहन केला. सातत्याने टोमणे ऐकावे लागले. त्याचबरोबर अनेक वाईट प्रसंगांचाही सामना केला, परंतु आज या सर्व त्रासाला पूर्णविराम मिळाला आहे. आमच्या संघर्षाचा विजय झाला आहे. आम्ही २०१० साली अमेरिकेत या कायद्याला मान्यता नसतानाही विवाह केला. २०१४ साली तिथे आमच्या नात्याला कायदेशीर मान्यता मिळाली. आज भारतातही या नात्याला मान्यता मिळाली. कायद्याने मान्यता दिली तरी समाजाकडून मान्यता मिळायला अजून वेळ लागेल याची जाणीवही आम्हाला आहे.

- Advertisement -

आम्हाला समाज स्वीकारू शकत नाही, याचे दु:ख मनात कायम होते. मनाचे खच्चीकरण व्हायचे, परंतु आता आमच्या नात्याला कायद्याने स्वीकारले आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे आमच्या समोरील परिस्थिती नक्कीच बदलणार आहे. १९४७ साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा समस्त भारतीयांच्या मनात जे स्वातंत्र्य अनुभवल्याची भावना होती, तिच भावना आज आम्हा समलैंगिकांच्या मनात आहे. आता आम्हाला आमचे नाते कुणापासूनही लपवण्याची गरज नाही. समाजात बिनधास्तपणे आणि खुलेपणाने वावरण्याचा आम्हाला कायद्याने हक्क मिळाला आहे. इतके दिवस नागरीक म्हणून आमचा दर्जा दुय्यम होता. कायद्याच्या नजरेमध्येही आम्ही गुन्हेगार ठरत होतो. मनातील भावभावनांची कुचंबणा होत होती. न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे त्यांना मोकळीक मिळाली. आता आम्हाला कुणाचीही चिंता करण्याची गरज नाही. आजपासून आमच्या आयुष्याची ही एक नवी सुरुवात ठरणार आहे.

संघर्ष सोडला नाही
समाजात ज्या नात्याला मान्यता नव्हती, त्या नात्याचा आम्ही स्वीकार केला होता. असे नाते सोबत घेऊन जीवन व्यथित करताना आम्हाला अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागले. अमेरिकेमध्ये असतानाही खूप सामाजिक त्रास आम्हाला सहन करावा लागला. पुढारलेल्या देशातही आम्ही खूप टोमणे ऐकावी लागली. विशेषत: भारतीय नागरिकांकडूनच हा त्रास भोगावा लागला. भारतामध्ये आम्ही परतलो, मात्र हा सामाजिक वाद अधिक वाढला. आम्ही नात्यामधील नवी वाट धरली, हा जणूकाही कोणता तरी मोठा गुन्हा केला आहे, अशा रितीने लोक आमच्याकडे पाहत होते, याही परिस्थितीत आम्ही संघर्ष सोडला नाही. 

- Advertisement -

समाजाचा दृष्टीकोन बदलायला वेळ लागेल
समाजाचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल, समाज आम्हाला स्वीकारेल, अशी आशा होती. न्यायालयाच्या निर्णयामुळे समाजाच्या दृष्टीकोनामध्ये लगेच बदल होईल, अशी आशा बाळगणे चुकीचे आहे. पण, त्या दिवसाला आजपासून सुरुवात झाली, असे नक्की म्हणता येईल. न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे आज आम्ही आमच्या नात्याची ओळख मुक्तपणे सांगू शकणार आहोत. आम्हाला समाजाची, नातेवाईकांची काळजी करण्याची गरज नसणार आहे. सुरुवातीला पुण्यामध्ये आल्यानंतर दोन मुले समलैंगिक नात्यामध्ये एकत्र राहणार आहेत, असे म्हटल्यावर आम्हाला राहण्यासाठी कुठेही खोली मिळत नव्हती. तो खूपच खडतर प्रवास होता, पण आता नाही! आता आम्हाला सर्व भारतीयांप्रमाणे समान हक्क उपभोगता येणार आहेत. 

आयुष्य समृद्ध होईल
कामाच्या ठिकाणीही अनेक टोमणी ऐकावी लागली. पण उच्चविद्याविभूषित असल्याने मन कणखर करून त्याकडे दुर्लक्ष करत आम्ही जगलो. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे आजपासून प्रत्येक समलैंगिक व्यक्तीला स्वातंत्र्य मिळाले आहे. त्याला समाजमनाची काळजी करण्याची गरज नाही. यापुढे प्रत्येकाच्या आयुष्यात काही अमुलाग्र बदल घडतील हे नक्की. ओळख लपवणे किंवा समाज काय म्हणेल याची काळजी करणे, याची आता गरज नाही. न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे आयुष्य आता अधिक समृद्ध होईल. 

समाजाने दुजाभाव थांबवावा
लैैंंगिकतेच्या आधारावर कुणाबरोबर दुजाभाव करणे म्हणजे त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे हाच प्रकार होता. पण, त्याला आता आळा बसेल. प्रेम ही खूप चांगली भावना आहे. त्यामध्ये दुजाभाव करता कामा नये. आम्ही प्रेम करतो ही चुकीची गोष्ट नाही. पण तरीही समाज आमच्या बाबतीत दुजाभाव करत होता, करत आहे. आता न्यायालयाच्या निर्णयामुळे तरी समाजाकडून दुजाभाव होणार नाही, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. 

अल्पवयीन मुले, प्राण्यांशी संभोग निषेधार्ह
न्यायालयाने निर्णय देताना अल्पवयीन मुले आणि प्राणी यांच्याशी अनैसर्गिक संभोगाबाबतच्या दंडात्मक तरतुदींचे इतर पैलू कायद्यामध्ये कायम राहू दिले. हा निर्णय स्वागतार्ह आणि महत्त्वाचा आहे, असे म्हणावा लागेल. कारण, या गोष्टीला आमचा कायमच विरोध होता, आहे आणि भविष्यातही असेल. यात कुणाचेही दुमत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -