घरमुंबईशिवसेना भवनासमोर राडा, शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले

शिवसेना भवनासमोर राडा, शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले

Subscribe

भाजपची शिवसेनेच्या विरोधात तक्रार

अयोध्येतील राम मंदिर भूखंड खरेदीत झालेल्या घोटाळ्याच्या आरोपावरून शिवसेनेने केलेल्या टीकेच्या निषेधार्थ भाजपच्या युवा मोर्चाने बुधवारी दादरच्या शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला. यावेळी शिवसैनिकही मोठ्या संख्येने जमा झाल्याने पोलिसांनी आंदोलकांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते अचानक भिडल्याने जोरदार हाणामारी झाली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून शिवसैनिकांचीही धरपकड केली.

राम मंदिर भूखंड घोटाळ्यावरून शिवसेनेने केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून भाजप युवा मोर्चाचे तेजिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली या फटकार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपच्या युवा मोर्चाचा मोर्चा शिवसेना भवनवर येणार असल्याची कुणकुण लागताच शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक जशास तसे उत्तर देण्यासाठी सेना भवनसमोर जमले. साहजिकच सेना भवनसमोर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सेना भवनसमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जवानांनाही या ठिकाणी तैनात करण्यात आले होते.

- Advertisement -

यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या विरोधात ‘सोनिया सेना हाय हाय’च्या घोषणा देत राजाराणी चौकात आले. शिवसेना भवनपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर हा मोर्चा येताच पोलिसांनी हा मोर्चा अडवला. त्यामुळे आंदोलक अधिकच आक्रमक झाल्याने पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड करून त्यांना व्हॅनमध्ये कोंबले.

दरम्यान, मोर्चा संपला असे वाटत असतानाच अचानक शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी काही शिवसैनिकांची धरपकडही सुरू केली. आम्ही गाडी करून चाललो असताना शिवसैनिकांनी आम्हाला मारल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला.

- Advertisement -

दरम्यान, शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या बाचाबाचीवरून शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या.

हे खपवून घेणार नाही : प्रवीण दरेकर
लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पोलिसांच्या उपस्थितीत सरकार आमचे आहे, आम्ही वाटेल ती दादागिरी करू, अशी भूमिका असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरकेर यांनी दिला. आंदोलकांच्या अंगावर जाणार, त्यांना मारहाण करणार, धाकदपटशाह करणार हे योग्य नाही. मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, असेही दरेकर म्हणाले.

अरविंद सावंत यांचे प्रत्युत्तर
दरेकर यांच्या इशार्‍याला शिवसेना खासदार अरविंद सावत यांनी प्रत्युत्तर दिले. मुळात ज्यांना कायदा-सुव्यवस्था माहिती आहे त्यांनीच कायदा-सुव्यवस्था का बिघडवायची? हा विषय इतका जोरात गाजतोय. तर त्याची चौकशी व्हावी, इतकीच मागणी केली होती. यात दुखावण्यासारखे काय होते? असा सवाल त्यांनी केला. प्रत्येक गोष्टीवर स्टंटबाजी का करायची? क्रियेला-प्रतिक्रिया असतात. प्रत्येक प्रतिक्रिया संयमी नसते. चौकशीला घाबरायचे कशाला? घाबरत नाहीत तर रस्त्यावर येण्याची गरज का भासली? असे सवाल सावंत यांनी उपस्थित केले.

भाजपच्या तक्रारीनंतर श्रद्धा जाधवांसह ७ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

राम मंदिराच्या मुद्यावरून भाजप युवा मोर्चाने काढलेल्या फटकार मोर्चात मोठा राडा झाला. यावेळी भाजपच्या पदाधिकार्‍यांसह महिला कार्यकर्त्यांनाही शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी भाजपच्या अक्षता तेंडुलकर यांच्या तक्रारीनंतर शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह 7 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी अक्षता तेंडुलकर यांनी शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना नाही तर सोनियांची सेना झाली, अशी टीका केलीय.

भाजपच्या महिला पदाधिकार्‍यांना मारहाण झाल्याप्रकरणी अक्षता तेंडुलकर यांच्या तक्रारीनंतर माहिम पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यात माजी महापौर श्रद्धा जाधव, राजू पाटणकर, संजय देवळेकर, अक्षय तामोरे, चंदू झगडे, राकेश देशमुख आणि शकी फडके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलन संपल्यानंतर आम्ही परत निघालो असताना काही शिवसैनिकांनी मागून येऊन हल्ला केला. आमदार सदा सरवणकर, श्रद्धा जाधव यांच्या सांगण्यावरुन शिवसैनिकांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप अक्षता तेंडुलकर यांनी केलाय.‘शिवसैनिकांनी पाठीमागून हल्ला केला’

आंदोलन संपल्यानंतर आम्ही चौघे पार्किंगला लावलेली गाडी काढण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी काही शिवसैनिकांनी आमच्यावर मागून येऊन हल्ला केला. आम्हाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. मारहाणीच्या वेळी श्रद्धा जाधव तिथे पोहोचल्या. त्यांनी शिवसैनिकांपेक्षा आधी महिला म्हणून माझा विचार केला पाहिजे होता. त्यांनी आम्हाला होणारी मारहाण रोखली पाहिजे होती, अशा शब्दात अक्षता तेंडुलकर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -