घरमुंबईशिवसेना आमदार तुकाराम कातेंच्या हल्लेखोरांना अटक

शिवसेना आमदार तुकाराम कातेंच्या हल्लेखोरांना अटक

Subscribe

शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर हल्ला केलेल्या हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. कातेवर हल्ला केलेल्यांपैकी ४ जणांना चेंबूर आणि वाशीनाका येथून अटक केली आहे.

अणुशक्तीनगर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर हल्ला केलेल्या हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. कातेवर हल्ला केलेल्यांपैकी ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेले हल्लेखोर कंत्राटदाराची माणसे असल्याचे समोर आले आहे. शिवसैनिकांनी कंत्राटदारांच्या डंपरचे नुकसान केल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शहाजी उमप (परिमंडळ ६) यांनी दिली आहे.

चार हल्लेखोरांना अटक

तुकाराम काते यांच्यावर हल्ल्याप्रकरणी सचिन खंडागळे (३१), मंगेश सावंत (२६), विशाल खंदारे (२४) आणि सुरज ऊर्फ सटकू कारले (२६) असे अटक करण्यात आलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत. हे सर्व आरोपी चेंबूर आणि वाशीनाका परिसरात राहणारे आहेत. तर इतर आरोपींचा शोध सुरु आहे. काते यांच्या हल्ला प्रकरणातील आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी ६ पथक तयार केले होते. या पथकाने ४ आरोपींना मंगळवारी अटक केली. तर इतर हल्लेखोर आणि याप्रकरणाचा मुख्यसुत्रधार महेश लोंढे याचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

- Advertisement -

शिवसैनिकांनी ट्रकची केली होती तोडफोड

मानखुर्दच्या महाराष्ट्रनगरजवळ मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेडचे काम सुरू आहे. या कामाचे कंत्राट दिल्लीतील राधा कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आले आहे. ६७ एकरमध्ये सुरू असलेल्या कामाचा काही भाग खाडीमध्ये येत असल्यामुळे त्या ठिकाणी मुरूम टाकण्याच्या कामासाठी राधा कन्स्ट्रक्शन या कंपनीने ८ कंत्राटदार नेमले होते. त्यापैकी प्रसाद इंटरप्राइजेस या फर्मला देखील मुरूम टाकण्याचे काम देण्यात आले होते. ही फर्म चेंबूर लालडोंगर येथे राहणारे महेश लोंढे यांची आहे. १२ ऑक्टोबर रोजी रात्री शिवसैनिकांनी वाशी चेकनाका येथे महेश लोंढे यांचे ४ ट्रक अडवून ट्रकचे नुकसान केले. तसेच पाच ट्रक महाराष्ट्रनगर येथे अडवून पोलीस ठाण्यात जमा केले होते.

प्रसाद इंटरप्राइजेसच्या मालकाने केला हल्ला

या रागातून प्रसाद इंटरप्राइजेस या फर्मचे कंत्राटदार महेश लोंढे यांनी आठ ते दहा सहकाऱ्यांसोबत शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजता आमदार तुकाराम काते यांच्यावर हल्ला करण्यात आला. मोटार सायकलवरुन आलेल्या हल्लेखोरांनी तलवारीने कातेंवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र या हल्ल्यात काते थोडक्यात बचावले. काते यांचे अंगरक्षक यशवंत दुर्गुडे आणि कार्यकर्ते किरण सावंत हे या हल्ल्यात जखमी झाले. याप्रकरणी काते यांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी याप्रकरणाच्या तपासात वेग आणत ४ आरोपींना अटक केली. तर इतर आरोपींचा शोध सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -