CoronaVirus: १४ दिवसांमध्ये साडेपाच हजार ठिकाणी केली जंतुनाशक फवारणी

सध्या कोरोना रोखण्यासाठी मुंबई अनेक ठिकाणी निर्जंतुकीकरण केले जात आहे. मुंबईत तब्बले साडेपाच हजार ठिकाणी निर्जंतुकीकरण केल असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

Spray the disinfectant in more than five thousand places in 14 days
CoronaVirus: १४ दिवसांमध्ये साडेपाच हजार ठिकाणी केली जंतुनाशक फवारणी

कोरोनोच्या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना आखल्या जात असून याअंतर्गत मुंबईतील इमारती, रस्ते आणि वस्त्यांमध्ये रासायनिक द्रव्यांची फवारणी केली जात आहे. मुंबई लॉकडाऊन झाल्यापासून आतापर्यंत मुंबई अग्निशमन दलाच्या तसेच महापालिकेच्या कामगारांच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईत तब्बल साडेपाच हजार ठिकाणी सोडियम हायपोक्लोराईड पाण्यात मिसळून त्याद्वारे फवारणी करण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण करण्याचा प्रयत्न

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर या विषाणुच्या संसर्गाचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्या निर्देशानुसार मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने संपूर्ण मुंबईत सोडियम हायपोक्लोराईड पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सर्वप्रथम महापालिका रुग्णालय, मार्केट, महापालिका विभागीय कार्यालये, तसेच वाडी आणि वस्ती, रस्ते आदी ठिकाणी या माध्यमातून फवारणी करण्यात आली आहे. रस्ते, वस्ती आणि इमारतींचे निर्जंतुकीकरण करताना, ज्या भागांमध्ये ‘कोरोना’चे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, त्याठिकाणीही जंतूनाशकांची फवारणी करून संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे.

९६ ठिकाणी जंतूनाशक रासायनिक द्रव्याची फवारणी

मुंबई अग्निशमन दल तसेच महापालिकेच्या किटक नाशक विभागाच्या माध्यमातून मागील १४ दिवसांमध्ये कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेली ठिकाणे, तसेच होम क्वारंटाईन ठेवण्यात आलेल्या रुग्णांच्या परिसरांसह इतर प्रमुख रस्ते, झोपडपट्टी परिसर, चाळी, महापालिकेच्या मालमत्ता, खासगी रुग्णालये, महापालिका रुग्णालये, महापालिकेची विभाग कार्यालये आदींस प्रमुख सुमारे साडेपाच हजार ठिकाणी फवारणी केली आहे. यामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या रुग्णांच्या परिसरांमध्ये एकूण ९६ ठिकाणी जंतूनाशक रासायनिक द्रव्याची फवारणी करून परिसरात विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्याचा प्रयत्न केला आहे.

नगरसेवकांनी स्वखर्चाने सुरू केली फवारणी

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी केली जात असतानाच नगरसेवक आणि खासदार आदींनी स्व:खर्चातून अशाप्रकारची मशीन्स खरेदी करून त्याद्वारे फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी आपल्या परिसरांमध्ये अशाप्रकारच्या मशिन्स खरेदी करून विभागात फवारणी सुरू केली आहे. तर आमदार रमेश कोरगावकर, आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले, काँग्रेसचे जगदीश अमिन कुट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव, शिवसेनेचे किरण लांडगे, भाजपचे हरिष भांदीग्रे, आदींनी स्वत:च्या मशिनरीसह फवारणी करून घेण्यास सुरुवात केली आहे. तर मुंबई महापालिकेच्या पथकाला पूर्ण सहकार्य करत आपल्या महत्वाच्या विभागात फवारणी करून घेण्याचा प्रयत्न सोनम जामसुतकर, सुजाता पाटेकर, जागृती पाटील, रजनी केणी, दक्षा पटेल, उज्ज्वला मोडक, सारिका मंगेश पवार, राजुल देसाई नगरसेवकांच्या माध्यमातून होत आहे.

१५ मे २८ मार्चपर्यंत केलेल्या फवारणींची आकडेवारी

एकूण सर्व विभागांमधील फवारणी : ५४७९

शासकीय, निमशासकीय कार्यालयांमधील फवारणी : ४७५

एमपीएल परिसरातील फवारणी : ९८२

होम क्वारंटाईन परिसरातील फवारणी :८१६

कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेल्या परिसरात फवारणी : ९६

इतर ठिकाणी केलेली फवारणी : ३०५३

फवारणीसाठी वापरण्यात आलेले रासायनिक द्रव्य : ७२३ लिटर्स


हेही वाचा – CoronaVirus: मध्य रेल्वेचा गरजूंना मदतीचा दिला हात