शिवसेनेकडूनच आदित्य ठाकरेंची कोंडी? नितेश राणेंनी शेअर केले अनिल परब यांचे ‘ते’ ट्विट

Anil Parab Aditya Thackeray Nitesh Rane
परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि आमदार नितेश राणे

“सुशांत सिंह राजपूतच्या वांद्रे येथील निवासस्थानी १३ जूनच्या रात्री कोणतीही पार्टी झाली नव्हती. त्याच्या घरातील दिवे रात्री १०.३० वाजताच बंद झाले होते”, असा दावा करणारा एका महिलेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा दावा खुद्द सुशांतच्या समोर राहणाऱ्या महिलेने केला आहे. या महिलेचा व्हिडिओ भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शेअर केला असून त्यासोबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेले एक ट्विट देखील जोडले आहे. अनिल परब यांनी सुशांतच्या घरी १३ जून रोजी पार्टी झाल्याचा दावा त्या ट्विटमध्ये केला होता. परब यांना ही माहिती कुठून मिळाली, ती त्यांनी सीबीआयकडे दिली का? असे प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केले आहेत. तसेच शिवसेनेतील जुने नेते आदित्य ठाकरेंचे करियर उध्वस्त करत असल्याचा आरोप देखील त्यांनी पुन्हा केला आहे.

सीबीआयने (CBI Team for Sushant Singh Rajput) सुशांत सिंह प्रकरणाचा तपास आपल्या हातात घेतल्यानंतर वेगवेगळ्या दिशेने तपास सुरु केला आहे. त्यासाठी सुशांतच्या निवासस्थानी पुन्हा एकदा आत्महत्येचा सिन रिक्रिएट करण्यात आला. याच दरम्यान सुशांतच्या समोर राहणाऱ्या एका महिलेने केलेल्या दाव्यामुळे सुशांतच्या मृत्यू प्रकरणातील गूढ आणखी वाढत चालले आहे.

या महिलेने सांगितले की, १३ जूनच्या रात्री सुशांतच्या घरातील लाईट बंद होती. फक्त किचनमधील लाईट सुरु होती. सुशांतच्या घरात असे कधी होताना दिसले नाही. सकाळी ४ वाजेपर्यंत सुशांतच्या घरातील दिवे सुरु असायचे. मात्र त्यादिवशी रात्री १०.३० वाजताच त्याच्या घरातील लाईट बंद झाली होती. १३ जूनच्या रात्री सुशांतच्या घरात पार्टी झाली होती, हा दावा या महिलेच्या जबाबामुळे खोटा ठरत आहे.

कडक लॉकडाऊन असताना सुशांतसिंगच्या घरी पार्टी कशी झाली आणि त्या पार्टीला कोण उपस्थित होते? याची मुंबई पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली होती. या ट्विटचे स्क्रिनशॉट नितेश राणेंनी शेअर करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. अनिल परब यांना नक्की काय सुचवायचे आहे? त्यांना नक्की काय माहीती आहे? ही पार्टी कुठे झाली होती? तिथे कोण उपस्थित होते? याची माहिती त्यांनी CBI ला दिली आहे का? असे प्रश्न विचारत असतानाच शिवसेनेतील जुने विरुद्ध नवे असा वाद सुरु असून काही लोक आदित्य ठाकरे आणि त्यांच्या टीमचे करिअर संपवत असल्याचे नितेश राणे म्हणाले.