घरमुंबईडान्स बारवरील छाप्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित

डान्स बारवरील छाप्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित

Subscribe

एका डान्सबारवर केलेल्या छाप्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात बारबाला आढळल्या आहेत.

दक्षिण मुंबईतील एका डान्सबारवर अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या छापेमारीमुळे गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी बारवर केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात बारबाला आढळल्या. त्यामुळे त्या परिसरातील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळसिंह पाटील यांना दोषी ठरवून पोलीस आयुक्ताकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत बारवरील छाप्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्याची ही पहिलीच वेळ असल्याची चर्चा पोलीस दलात सुरु आहे. या कारवाईमुळे मुंबईतील इतर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे धाबे दणाणले आहे. या कारवाईच्या विरोधात निलंबित करण्यात आलेले अधिकारी ‘मॅट’मध्ये जाण्याची शक्यता आहे.

नियमांना धाब्यावर ठेवून डान्सबार सुरु

गोकुळसिंह पाटील असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. पाटील यांनी दक्षिण मुंबईतील गावदेवी पोलीस ठाण्यात ऑक्टोबर २०१८ मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदाचा कार्यभार सांभाळला होता. गावदेवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ‘गोल्डन गुंज’ या बियर बारवर काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी रात्रीच्या सुमारास छापा टाकला होता. या छाप्यात पोलिसांना मोठ्या प्रमाणात बारबाला मिळून आल्या होत्या. नियमाचे उल्लंघन करून हा बार सुरु असल्याचे पोलिसांच्या तपासत पुढे आले होते.

- Advertisement -

का केले निलंबित?

‘गोल्डन गुंज’ हा बार गावदेवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. त्यामुळे त्या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची ही जबाबदारी असून त्यांच्या उपस्थित डान्स बार विनापरवाना सर्रासपणे सुरु असल्याचा ठपका वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळसिंह पाटील यांच्यावर ठेऊन त्यांच्यावर बदलीची कारवाई न करता त्यांना थेट सेवेतून निलंबित कऱण्यात आले. या कारवाईचे आदेश मुंबई पोलीस आयुक्त यांनी अप्पर पोलीस आयुक्तांना दिले असून अप्पर पोलीस आयुक्त यांनी त्याची अंमलबजावणी करून पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

याअगोदर पोलीस हवालदाराला केले होते निलंबित

इंडियांना बारवर गुन्हे शाखेने कारवाई केली होती, त्यावेळी ताडदेव पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला निलंबित कऱण्यात आले होते. मात्र या प्रकारे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची ही पहिलीच वेळ असून यापूर्वी अनेक वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर केवळ बदलीची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईमुळे मुंबईतील पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे धाबे दणाणले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला दोषी ठरवून त्यांच्यावर थेट निलंबनाच्या कारवाईमुळे पोलीस दलामध्ये चांगलीच चर्चा रंगली असून खाई अधिकाऱ्यांनी या कारवाईमुळे नाराजी व्यक्त केली आहे. या कारवाईमुळे खच्चीकरण झालेले गोकुळसिंह पाटील हे या कारवाईच्या विरोधात मॅट मध्ये जाण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -