घरमुंबईउत्तरपत्रिका तपासणी, पुर्नमुल्यांकनाच्या कामातील दोषी व्यक्तींवर दंडात्मक कारवाई

उत्तरपत्रिका तपासणी, पुर्नमुल्यांकनाच्या कामातील दोषी व्यक्तींवर दंडात्मक कारवाई

Subscribe

विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणी करणारे तसेच पुर्नमुल्यांकनाच्या कामाशी निगडीत शिक्षक आणि शिक्षकांकडून व्यक्तींकडून वारंवार चुका असून याचा फटका जर विद्यार्थ्यांना बसत असेल तर अशा व्यक्तींकडून मग ती कुणीही असो, त्यांना मानधन न देता त्यांच्या पगारावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. त्याबरोबर त्या दोषी व्यक्तीकडूनच विद्यार्थ्यांकडून पुर्नमुल्यांकनासाठी आकारण्यात आलेले शुल्क वसूल करुन ते विद्यार्थ्याला परत देण्यात यावे, असे आदेश उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिले आहेत.

मुंबई विद्यापीठातील विविध प्रलंबित समस्या संदर्भात राज्यमंत्री वायकर यांनी बुधवारी विद्यापीठाच्या कालिना परिसरात बैठक बोलावली होती. या बैठकीला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू कुलकर्णी, कुलसचिव भिरुड, परीक्षा नियंत्रक घाटुळे, अभियंता, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी कहार, सह संचालक, सिनेट सदस्य प्रदिप सावंत, महादेव जगताप, शशिकांत झोरे, कारंडे, कोळंबकर तसेच विद्यापीठाच्या विविध विभागांतील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

गेल्या काही वर्षांमध्ये पुर्नमुल्यांकनासाठी अर्ज करणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. पुर्नमुल्यांकनासाठी अर्ज करणार्‍या विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थ्यांच्या गुणात वाढ झाल्याचेही निष्पन्न झाले आहे. गुणांमध्ये वाढ झाली तर निकाल विलंबाने लागत असल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या संधी, परदेशात जाण्याची, चांगली नोकरी मिळविण्याची संधी तर काहींनी कमी गुण मिळाले म्हणून आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्याचे सिनेट सदस्यांनी राज्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले. त्यानुसार परीक्षा झाल्यावर तसेच पुर्नमुल्यांनासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणारे आणि या कामाशी निगडीत असलेली कोणतीही व्यक्ती दोषी आढळल्यास त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात यावी. ही रक्कम त्यांच्या पगारातून वळती करण्यात यावी. पुर्नमुल्यांकनासाठी अर्ज करणार्‍या तसेच त्याचे गुण वाढले असतील तर त्या विद्यार्थ्याला पुर्नमुल्यांकनासाठी भरलेली रक्कम तात्काळ परत देण्यात यावी. ही रक्कमही दोषी व्यक्तीकडून वसुल करावी. त्याचप्रमाणे विद्यापीठातील ज्या ज्या व्यक्ती परीक्षेतील गैरप्रकार आढळून येतील अशा दोषी व्यक्तींवर विद्यापीठ कायद्यानुसार तात्काळ कारवाई करण्यात यावी असे, निर्देशही राज्यमंत्री यांनी यावेळी उपस्थित विद्यापीठातील अधिकार्‍यांना दिले.

परीक्षेच्या काळात परीक्षा विभाग दिवस-रात्र सुरू ठेवा

ज्याप्रमाणे अधिवेशनाच्या काळात विधानभवन तसेच मंत्रालयन दिवस-रात्र सुरू असते अगदी त्याचप्रमाणे परीक्षेच्या काळात परीक्षा विभाग हा दिवस-रात्र सुरू ठेवण्यात यावा. या विभागात या परीक्षा काळात त्या त्या विषयातील प्राध्यापकांची तसेच अन्य अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात यावी, असे निर्देशही राज्यमंत्री यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिले आहेत.

- Advertisement -

विद्यापीठातील रिक्त जागा भरण्यासाठी प्रयत्न

गेल्या काही वर्षांमध्ये विद्यापीठातील रिक्त झालेल्या विविध जागा अद्याप भरण्यात न आल्याने विद्यापीठात विविध पदांच्या मिळून ५३ टक्के जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी लवकरच विद्यापीठांचे कुलपती, मुख्यमंत्री, संबंधित खात्याचे मंत्री वित्तमंत्री, यांच्या समवेत कुलगुरूंसह संयुक्त बैठक पार पडल्यावर हा प्रश्‍न तात्काळ निकाली काढण्यात येईल, असे राज्यमंत्री यांनी यावेळी सांगितले. आयटाने विद्यापीठाबरोबर केलेल्या कराराचा भंग केल्याने, कायदेशीर बाजू तपासून आयटाला देण्यात आलेली जागा तात्काळ ताब्यात घेण्यात यावी. त्याचबरोबर त्यांना देण्यात येणार्‍या सुविधा बंद करुन करार टर्मिनेट करण्यात यावा, असे निर्देशही राज्यमंत्री यांनी दिले. सेंट्रल लायब्ररीप्रश्‍नी मंत्रालयात तात्काळ बैठक घेण्यात येईल, तसेच विद्यापीठाच्या अखत्यारित असलेल्या जागेवर वसलेल्या भारतनगर झोपडपट्टीधारकांना शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे घरे देऊन जागा मोकळी करण्यासाठी येथील झोपड्यांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्याचे पत्र विद्यापीठ प्रशासनाने आपल्याला पाठवावे, असे निर्देशही वायकर यांनी यावेळी विद्यापीठ प्रशासनाला दिले.

विद्यापीठाच्या सांस्कृतिक केंद्राचे काम तात्काळ पुर्ण करण्यात येईल तसेच मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची नविन इमारत जानेवारी २०१९ पर्यंत पुर्णता कार्यान्वित करण्यात येईल, असे आश्‍वासन विद्यापीठातील अभियंता यांनी राज्यमंत्री यांना दिले.

कॅम्पसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी तात्काळ टेंडर काढा

विद्यापीठाच्या परिसरात विद्यापीठाच्या तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी टेंडर काढण्यात यावे, असे निर्देशही राज्यमंत्री यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -