घरमुंबईरिक्षा, टॅक्सीचालकांना हवी भाडेवाढ!

रिक्षा, टॅक्सीचालकांना हवी भाडेवाढ!

Subscribe

नागपुरातील पावसाळी अधिवेशन पूर्ण होण्याआधी टॅक्सी आणि रिक्षा भाडेवाढीच्या निर्णयाला सरकारने मान्यता दिली नाही तर मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षाचालक संप पुकारतील तसेच न्यायालयात दाद मागतील, असा इशारा मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस ए. एल. क्वाड्रोस यांनी दिला आहे.

बेस्ट आणि एसटीच्या तिकीट दरवाढीनंतर मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षाचालक भाडेवाढीसाठी जोर धरू लागले आहेत. सोबतच सीएनजीचे दर आणि सततच्या महागाईमुळे मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालवणे परवडेनासे झाले आहे. नागपुरातील पावसाळी अधिवेशन पूर्ण होण्याआधी टॅक्सी आणि रिक्षा भाडेवाढीच्या निर्णयाला सरकारने मान्यता दिली नाही तर मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षाचालक संप पुकारतील तसेच न्यायालयात दाद मागतील, असा इशारा मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस ए. एल. क्वाड्रोस यांनी दिला आहे. गेल्या सहा महिन्यात सीएनजीच्या दरात दोनदा वाढ करण्यात आली. त्याचा फटका रिक्षा, टॅक्सी चालकांना बसत आहे. त्यामुळे मागच्या महिन्यात भाडेवाढीची मागणी करण्यात आली होती. मात्र त्यावर राज्य सरकारकडून आतापर्यंत कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. राज्य सरकारच्या दिरंगाईमुळे टॅक्सी आणि रिक्षावर आधारित १२ लाख लोकांच्या व्यवसायांवर परिणाम होत आहे.

हायकोर्टात दोन वर्षे चालले हे प्रकरण

मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने दिलेल्या माहितीनुसार २०१२ ला हतीम कमेटीने टॅक्सी आणि रिक्षा दरवाढीची शिफारस केली होती. या दरवाढी विरोधात हाईकोर्टामध्ये ग्राहक पंचायतकडून याचिका दाखल करण्यात आली होती. ज्यात टॅक्सी आणि रिक्षा दरवाढ रद्द करण्याची मागणी केली. हायकोर्टात हे प्रकरण दोन वर्षे चालल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने हतीम कमेटीच्या रद्द करून २०१४ मध्ये नवीन कमेटी गठीत करण्यास सांगितले होते. त्यांनतर कटवा कमिटीची स्थापना केली. कमिटीच्या सदस्यांनी अभ्यास करून टॅक्सी आणि रिक्षा दरवाढीच्या शिफारशी सरकारला केल्या होत्या. तेव्हापासून या कमिटीच्या शिफारशींची राज्य सरकारकडून अंलबजावणी होताना दिसून येत नाही. त्यामुळे सध्या रिक्षा आणि टॅक्सी चालवणे अवघड होऊन बसले आहे.

- Advertisement -

टॅक्सी-रिक्षा तोट्यात

सीएनजीच्या दरात एप्रिल २०१८ मध्ये १ रुपये ३१ पैसे तर जूनमध्ये १ रुपये ९८ पैसे वाढ करण्यात आली आहे. सोबतच टॅक्सी -रिक्षाचे विमा, विविध करसुद्धा वाढविण्यात आल्यामुळे टॅक्सी आणि रिक्षा चालक व्यवसाय तोट्यात जात आहे. मुंबईत एकूण टॅक्सी संख्या ४८ हजार, तर रिक्षाची संख्या १ लाख ५० हजार इतकी आहे. या टॅक्सी आणि रिक्षा चालविण्याच्या व्यवसायात सरासरी ५ लाख लोक आहेत. मात्र सततच्या वाढत्या महागाईमुळे आज व्यवसाय अडचणीत सापडला आहे.

राज्य सरकारचे दुर्लक्ष

आम्ही मागील महिन्यात सरकारकडे रिक्षाचे भाडे किमान दोन रुपयांनी, तर टॅक्सीचे भाडे किमान तीन रुपयांनी वाढवण्याची मागणी केली होती. मात्र राज्य सरकारने यावर आतापर्यंत कोणताही विचार केलेला नाही. यावर सरकारने लवकर निर्णय घेतला नाही तर येणार्या दिवसांत संपूर्ण मुंबईत टॅक्सी आणि रिक्षा चालक संपावर जातील. तसेच आम्ही न्यायालयात जाणार आहोत.
– ए. एल. क्वाड्रोस, सरचिटणीस, मुंबई टॅक्सीमेन युनियन.

- Advertisement -

लुबाडणूक करणार्‍यांना विरोध

पाऊस, अपघात अशा आपत्कालीन परिस्थतीचा फायदा घेऊन जे टॅक्सीचालक प्रवाशांना लुबाडतात त्यांचा आम्ही विरोध करतो. मात्र प्रत्येक टॅक्सी किंवा रिक्षाचालक हा लुबाडण्याचे काम करत नाही. यामुळे मुंबईतल्या टॅक्सी आणि रिक्षा चालकांवर आरोप लावणे चुकीचे आहे.
– के. के. तिवारी, अध्यक्ष, स्वाभिमान टॅक्सी रिक्षा युनियन.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -