घरमुंबईचक्रीवादळाच्या शक्यतेने जिल्हा प्रशासन सतर्क; कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

चक्रीवादळाच्या शक्यतेने जिल्हा प्रशासन सतर्क; कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

Subscribe

चक्री वादळाच्या सूचनेमुळे ठाणे जिल्हा प्रशासन सतर्क झालं असून कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

चक्रीवादळाच्या वाढत्या शक्यतेने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. चक्रीवादळाच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी आणि उपाययोजना, पूर्वतयारीसाठी कर्मचाऱ्यांच्या नियोजित सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. ‘नियुक्त कर्तव्यावर असलेले कर्मचारी यांनी सूचनेशिवाय मुख्यालय सोडू नये, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल’, असा इशाराच जिल्हा प्रशासनाने दिला आहे. ठाणे जिल्हा प्रशासनाने चक्रीवादळावर उपाययोजना करण्याची पूर्वतयारी सुरु केली आहे. तर जिल्हा प्रशासनाने मात्र संबंधित सर्वच कार्यालयाच्या प्रमुखांना लेखी सूचना पाठविल्या आहेत.

संबंधित परिसरातील नोडल अधिकारी यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करावी. तसेच, अधिकाऱ्यांची सर्व माहिती सादर करावी. नियंत्रण कक्ष २४ तास सुरु ठेवावे. तसेच विभागाला देण्यात आलेल्या आपत्कालीन यंत्र-सामुग्री, लाईफ जॅकेट, लाईफ बायझ, रिंग्स, रबरी होड्या यांच्या तपासण्या करून त्या जय्यत तयारीत ठेवाव्याच, तसेच यांत्रिक बोटी, छोट्या होड्या, या खाजगी असलेल्या उपलब्ध कराव्यात, सध्या उपलब्ध असलेल्या बोटींची तपासणी करावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर ग्रामपंचायतीच्या सर्वच कर्मचाऱ्यांना चक्रीवादळाच्या बाबत दवंडी पिटून जनजागृती करणे असे लेखी आदेश जारी करण्यात आलेले आहेत.

- Advertisement -

चक्री वादळासाठी विशेष सूचना

चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या हॉटेल रिसॉर्ट खाली करण्यात यावेत, तसेच या हॉटेल्स आणि रिसॉर्टची बुकिंग ६ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर पर्यंत घेण्यात येऊ नये, तसेच समुद्री किनाऱ्यालगतच्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी यंत्रसामुग्रीची संख्या मोजमाप करावी. त्याचप्रमाणे किनाऱ्यालगतच्या ग्रामपंचायत समितीने गावात किती लोक राहतात याची आकडेवारी ठेवावी. चक्री वादळाबाबत जिल्हा प्रशासनाने लेखी सूचना सर्व पालिका, नगरपालिका यांच्यासह सर्वच ग्रामपंचायती आणि किनाऱ्यालगतच्या ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.


हेही वाचा – ‘महा’ वादळापाठोपाठ ‘बुलबुल’ चक्रीवादळ, महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा!

कदाचित जर चक्री वादळाच्या परिस्थितीत नागरिकांचे स्थलांतर करावयाचे असल्यास त्यांच्या निवारा, खाणेपिणे आणि औषध यांची व्यवस्था करण्यात यावी, जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य केंद्राने आपल्या रुग्णालयात औषधांचा पुरवठा जय्यत ठेवावा, सर्व सरकारी आणि खाजगी दवाखान्यांमध्ये प्रथमोपचार गट आणि आवश्यकतेनुसार रुग्णवाहिका आणि इतर सुविधा तैनात ठेवाव्यात. समुद्रात कामानिमित्त किंवा मच्छीमारीसाठी गेलेल्या सर्व बोटींना परतीच्या प्रवासाच्या सूचना द्याव्यात, गरजेनुसार सर्व बोटींना आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात, मच्छीमारीसाठी गेलेल्या बोटींना सुरक्षित किनाऱ्यावर आणावे, तटरक्षक दलाने डायव्हर्स टीम तैनात ठेवावी, त्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाला देण्यात यावी, आदी सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -