घरठाणेपालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यातील संघर्ष टोकाला

पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यातील संघर्ष टोकाला

Subscribe

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची तिजोरी कोणाची, ठाकूरांबरोबर भाजपची फौज

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या येत्या ३० मार्चला होत असलेल्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भाजपशी हातमिळवणी करीत सहकार पॅनल मैदानात उतरवले आहे. या पॅनलने बिनविरोध आलेल्या सहापैकी पाच जागा आपल्याच असल्याचा दावा केला आहे. सहकार पॅनलमधून बविआचे आमदार राजेश पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

तर महाविकास आघाडीने वेगळे पॅनल मैदानात उतरवल्याने यंदाची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे. महाविकास आघाडीच्यावतीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी निवडणुकीची धुरा हाती घेतली आहे. त्यामुळे बविआचा पाठिंबा असतानाही बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने त्यांना दूर केल्याचे दिसून आले आहे. वसई विरार महापालिका हाती घेण्यासाठी शिंदे यांनी आयुक्तांपासून अनेक वरिष्ठ अधिकारी बसवले आहे. त्यांच्या माध्यमातून शिंदेंनी बहुजन विकास आघाडीचे महापालिकेतील वर्चस्व मोडीत काढण्याचे प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि हितेंद्र ठाकूर यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे.

- Advertisement -

बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांनी राज्यातील महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. मात्र, बविआचे अद्याप शिवसेनेशी पटत नसल्याने त्याचे पडसाद ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत दिसून आले आहेत.

महाविकास आघाडीने दूर केल्यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी थेट भाजपशीच हातमिळवणी केली आहे. ठाकूर आणि भाजपने सहकार पॅनलच्या माध्यमातून महाविकास आघाडीपुढे आव्हान उभे केले आहे. विशेष म्हणजे सहकार पॅनलने निवडणुकीसाठी बविआची शिट्टी ही निशाणी घेतली आहे. २१ पैकी सहा जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यातील पाच जागा आपल्याच असल्याचा दावा सहकार पॅनलकडून करण्यात आला आहे. विद्यमान अध्यक्ष राजेंद्र पाटील बविआचेच आहेत. तर शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा हेही आपल्याच पॅनलचे बिनविरोध संचालक असल्याचा सहकारचा दावा आहे.

- Advertisement -

त्याचबरोबर बिनविरोध असलेले राजेश पाटील, दिलीप पाटेकर आणि बाबुराव दिघा हेही आपलेच असल्याचा सहकारचा दावा आहे. बिनविरोध निवडून आल्यानंतर या पाचही संचालकांनी आमदार किसन कथोरे यांच्यासोबत विरारमध्ये येऊन ठाकूरांची भेट घेतली होती. दुसरीकडे, बिनविरोधमधील अमित घोडा आणि बाबुराव दिघा आपलेच असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या पॅनलने केला आहे. बँकेच्या मागील सत्तेत बविआची भागिदारी होती. त्यांचे राजेंद्र पाटील चेअरमन होते. त्यामुळे भाजप आणि ठाकूरांच्या सहकार पॅनलचे मोठे आव्हान महाविकास आघाडीपुढे असणार आहे.

१५ जागांसाठी ४६ उमेदवार रिंगणात
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहा जण बिनविरोध निवडून आले असून उर्वरित १५ जागांसाठी ४६ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीसाठी १५ तालुक्यांत १८ मतदार केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. तर ३१ मार्च रोजी या निवडणुकीची मतमोजणी ही ठाण्यात होणार आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर जे मतदार क्वारंटाईन झोनमधील असतील त्यांनी मतदानाच्या दिवशी शेवटच्या अर्धा तासात मतदानासाठी यावे, असे आवाहन केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दिगंबर हौसारे यांनी दिली. ठाणे व पालघर या जिल्ह्यातील एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक येत्या ३० मार्च रोजी होत आहे. याच दिवशी सकाळी ८ ते दुपारी ४ या कालावधीत १५ तालुक्यांतील १८ मतदार केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे.

पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यातील संघर्ष टोकाला
Shashi karpehttps://www.mymahanagar.com/author/shashi-karpe/
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -