दरडोई उत्पन्नात ठाणे जिल्हा दुसऱ्या स्थानी तर पहिल्या क्रमांकावर…

प्रातिनिधीक फोटो

दरडोई उत्पन्नाबाबात एक आर्थिक सर्वेक्षण करण्यात आलं आहे. या सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार दरडोई उत्पन्नात सलग आठ वर्ष मुंबईनंतर दुसरा क्रमांक ठाणे जिल्ह्याने मिळवत राज्याची आर्थिक उपराजधानी हे स्थान कायम राखले आहे. तर या सर्वेक्षणातून असे समोर आले आहे की, मुंबईसोबत कोकणाने संपूर्ण राज्यात दरडोई उत्पन्नात आघाडी घेतली आहे. तर मुंबई केवळ देशातील नाही तर जगातील आर्थिक उलाढाल घडवणारं मुख्य केंद्र बनलं आहे. त्यामुळे दरडोई उत्पन्नाचा विचार करता मुंबईचा सलग आठ वर्ष पहिला क्रमांक असल्याचे सांगितले जात आहे. या सर्वेक्षणात यंदा पुण्याला मागे टाकत पालघरसह ठाणे जिल्ह्याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर दरडोई उत्पन्नात ठाण्याने पुण्याबरोबरच नाशिक, नागपूर या राज्यातील इतर मोठ्या शहरांनाही मागे टाकले आहे.

दरडोई उत्पन्नाच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार, राज्याच्या २०२०-२१च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार २०१९-२० या आर्थिक वर्षात मुंबई शहराचे दरडोई उत्पन्न ३ लाख ४४ हजार १४१ रुपये, तर ठाण्याचे दरडोई उत्पन्न २ लाख ९१ हजार ८३६ इतके आहे. पुण्याचे दरडोई उत्पन्न २ लाख ७९ हजार ७७७, नागपूरचे २ लाख ३८ हजार ९५५ आणि कोल्हापूरचे २ लाख ४ हजार ८२१ लाख इतके आहे. २०१०-११ पर्यंत दरडोई उत्पन्नामध्ये मुंबईपाठोपाठ पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यानंतर मात्र ठाण्याने दुसरा क्रमांक पटकावला आहे.

आर्थिक सर्वेक्षण अहवालात ठाणे-पालघर एकत्रितरित्या विचारात घेतले असता राज्यातील सर्वाधिक सात महापालिका या दोन जिल्ह्यांत आहेत. यानुसार, ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार या महापालिकांबरोबरच अंबरनाथ आणि बदलापूर ही वेगाने विकसित होत असलेली शहरे या जिल्ह्यात आहेत.

  • राज्यात मुंबईसह कोकण विभाग दरडोई उत्पन्नामध्ये ३ लाख ७९९ रुपयांसह पहिल्या क्रमांकावर
  • पुणे विभागाने सरासरी २ लाख २४ हजार २४४ रुपयांच्या दरडोई उत्पन्नासह राज्यात दुसरा क्रमांकावर
  • नागपूर विभाग १ लाख ७९ हजार ४६४ रुपये दरडोई उत्पन्नासह राज्यात तिसऱ्या क्रमांकावर
  • नाशिक विभाग १ लाख ५५ हजार ९९५ रुपयांच्या दरडोई उत्पन्नासह चौथ्या क्रमांकावर
  • औरंगाबाद १ लाख ३१ हजार ३२८, तर अमरावती १ लाख १५ हजार ७५२ रुपयांच्या दरडोई उत्पन्नासह राज्यात अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर

दरडोई उत्पन्न म्हणजे…

वार्षिक दरडोई उत्पन्न हे एखाद्या विशिष्ट क्षेत्रात ( देश, प्रदेश, राज्य) राहण्याऱ्या प्रति व्यक्तीचे वार्षिक सरासरी उत्पादनाचे मोजमाप करते. हे मोजमाप त्या क्षेत्राचे एकूण उत्पन व एकूण लोकसंख्या यांचा भागाकर करून काढले जाते. देशाचे दरडोई उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्न व एकूण लोखसंख्या यांची सरासरी करून काढले जाते. दरडोई उत्पन्नाला Per capita income असेही म्हटले जाते.