घरमुंबईरस्ता रुंदीकरणाचा फायदा फेरीवाल्यांना

रस्ता रुंदीकरणाचा फायदा फेरीवाल्यांना

Subscribe

ठाण्यातील हिरानंदानी मेडोज परिसरात रस्ता रुंदीकरणाने निर्माण झालेल्या अतिरिक्त रस्त्यावर फेरीवाले आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. येथे येणारे ग्राहकदेखील तेथेच गाड्या पार्किंग करत असल्याने या परिसरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ठामपाने रस्ता रुंदीकरण केले. मात्र, या जागांवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाले आहे. ज्याचा त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. याकडे ठामपा अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहे. असा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत. प्रशासनाने तत्काळ कारवाई न केल्यास परिसरातील नागरिक आणि मनसेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा येथील लोकपूरम को-ऑप.हाऊ.सोसायटीज असोसिएशन या स्थानिक रहिवाशांच्यावतीने अजय भोसले आणि मनसे प्रभाग अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर आणि निखील जाधव यांनी दिला आहे.

घाणेकर नाट्यगृहासमोरील पोखरण रोड नं. 2 येथे कोट्यवधींचा खर्च करून ठामपा प्रशासनाने स्थानिक नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी 90 फुटांचा रस्ता केला. या प्रशस्त रोडच्या वाढीव क्षेत्रावर फेरीवाले आणि खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. या फेरीवाले आणि खाद्य पदार्थ विक्रेते यांना ठामपा वर्तकनगर प्रभाग समितीच्या अधिकार्‍यांचे तसेच स्थानिक हप्तेखोरांचे संरक्षण असल्याचा आरोप निखील जाधव यांनी केला आहे. अनेकवेळा तक्रार अर्ज वर्तकनगर प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले. मात्र, अद्याप या परिसरामध्ये चौकशी करण्यासदेखील संबंधित अधिकारी आलेले नाहीत.

- Advertisement -

अखेर या परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि फेरीवाले-खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला. यावर वाहतूक उपायुक्त, वाहतूक शाखा नौपाडा कार्यालयाने तत्काळ ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना प्राप्त तक्रारीनुसार फेरीवाले आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवावी आणि कारवाई करावी असे पत्र पाठविले. 30 नोव्हेंबर, 2018 रोजी पाठवलेल्या पत्राला सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरीही ठामपा प्रशासन आणि आयुक्तांनी याची दखल घेतलेली नाही.

हिरानंदानी मेडोज परिसरातील रस्त्यावरील फेरीवाले आणि खाद्य पदार्थ विक्री करणार्‍यांवर अनेक वेळा कारवाई करण्यात आली आहे. मात्र, कालांतराने ते पुन्हा त्या ठिकाणी बसतात. त्यांच्यावर वारंवार आणि वेळोवेळी कारवाई करण्यात येते.
– चारुशीला पंडित, सहाय्यक आयुक्त वर्तकनगर प्रभाग समिती ठामपा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -