घरमुंबईदेवभूमीतील हाहाकार नैसर्गिक आपत्ती नव्हती - सामनाचा केंद्रावर निशाणा

देवभूमीतील हाहाकार नैसर्गिक आपत्ती नव्हती – सामनाचा केंद्रावर निशाणा

Subscribe

पाणी साठ्यामुळेच हिमकड्यांवर दबाव

हिमालयातील देवभूमीत मागील काही वर्षांपासून अनेक जल प्रलय, नैसर्गिक आपत्ती घडली आहे. काही दिवसांपुर्वी उत्तराखंडमधील चमोलीत हिमकडा कोसळला. या हिमकड्यात अनेकजणांचा मृत्यू झाला. तर शेकडोंहून अधिक कामगार आणि रहिवाशी बेपत्ता आहेत. यावरुन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत. आपणच आपल्या हाताने पायावर मारलेल्या कुऱ्हाडीमुळे हे देवभूमीत जलप्रलय आणि नैसर्गिक आपत्ती घडत आहेत. एकीकडे उत्तराखंडला देवभूमी म्हणायचे आणि दुसरीकडे त्याच देवभूमीत खोदकाम करुन जीवघेणे प्रकल्प उभे करायेच याला काय म्हणावे? पुन्हा अशा दुर्घटना घडल्यानंतर त्याला ती नैसर्गिक प्रकोप ठरविणे हे तर थोतांडच आहे. त्यामुळे देवभूमीत जो काही हाहाकार माजला आहे ती नैसर्गिक आपत्ती नव्हतीच असे सामनातून म्हटले आहे. आपणच आपल्या हाताने पायावर कुऱ्हाड मारतो आहे. हिमालयातील हाहाकार थांबवण्यासाठी तेथील प्रकल्पांचे प्रहार थांबवावे लागतील. देवभूमीत सुरु असलेल्या ऊर्जा प्रकल्पांवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून टीका करण्यात आली आहे.

जाणून घ्या काय म्हटलंय सामना अग्रलेखात

पुढचा व्यक्ती चुकत असेल तर मागचा व्यक्ती सावरतो परंतु वारंवार पुढचा व्यक्ती चुकत असेल तर त्याला काय म्हणावे? उत्तराखंडमध्येही असेच घडले आहे. मागील ७ वर्षांपूर्वी केदारनाथ तीर्थक्षेत्राच्या परिसरात जो जलप्रलय आला आणि त्यामुळे जो विध्वंस घडला त्याच्यापासून आपण काहीही शिकलो नाही हे उत्तराखंडमधील ताज्या प्रलयाने सिद्ध केले आहे. हिमालयातील उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील हिमकडा कोसळला यामुळे धौलीगंगा नदीला संहारक म्हणावा असा महापूर आला. शासन, जनता यापैकी कोणालाही काही कळण्याच्या आत १० किलोमीटरच्या परिसरात जलप्रलयाने हाहाकार माजला होता.

- Advertisement -

कोट्यावधींच्या प्रकल्पांना जलसमाधी

ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्प आणि ऋषीगंगा धरण याचे अतोनात नुकसान झाले. खास करून ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्प तर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. तपोवन आणि ऋषीगंगा या दोन प्रकल्पांवरील शेकडो कामगार अचानक आलेल्या जलप्रलयात वाहून गेले. नदीकाठच्या गावांतील अनेक लोकांना जलसमाधी मिळाली. हजारो कोटींचा खर्च करून उभारण्यात येत असलेले दोन ऊर्जा प्रकल्प क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. तपोवन जलविद्युत प्रकल्पाचे धरण फुटले. असे सामना अग्रलेखात म्हटले आहे.

शेकडो मजूर बेपत्ता

प्रकल्पातील बोगद्यात शेकडो मजूर काम करत होते. मजुरांना बचावाची संधीही मिळाली नाही. ज्या बोगद्यात हे मजूर काम करत होते तो बोगदा आता माती, चिखल आणि दगड-धोंडय़ांनी भरून गेला आहे. आपत्ती व्यवस्थापन आणि लष्कराचे जवान यांनी बोगद्याचा प्रवेश मार्ग खोदण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. ऊर्जा प्रकल्पांबरोबरच या प्रलयाच्या तडाख्यात आलेल्या सर्वच ठिकाणी बचावकार्य वेगाने सुरू आहे, मात्र अजूनही २००च्या आसपास लोक बेपत्ता आहेत ही चिंतेची बाब आहे. जिवाचा थरकाप उडविणाऱ्या या रौद्र प्रलयाने २०१३ मधील केदारनाथच्या विध्वंसाचीच आठवण करून दिली.

- Advertisement -

प्रकल्पांमुळेच हिमलयात दुर्घटना

केदारनाथमधील दुर्घटनेनंतरच हिमकडा कोसळून अशा प्रकारची दुर्घटना घडू शकते, असा इशारा तज्ञांनी दिला होता. त्या इशाऱ्याकडे केलेले दुर्लक्षच आता महागात पडले आहे. कित्येक लोक प्राणाला तर मुकलेच, शिवाय ऊर्जा प्रकल्पावरील कोटय़वधी रुपयांचा खर्चही बरबाद झाला. केदारनाथच्या भयंकर दुर्घटनेनंतर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने तज्ञांची जी उच्चस्तरीय समिती नेमली होती त्या समितीने उत्तराखंड आणि एकूणच हिमालयात जे जलविद्युत प्रकल्प उभे राहत आहेत ते भयंकर आपत्ती घडवू शकतात, असे आपल्या अहवालात म्हटले होते. इतकेच काय अशा ऊर्जा प्रकल्पांमुळेच केदारनाथची दुर्घटना घडली, असा ठपकाही समितीने ठेवला होता. या समितीच्या अहवालानंतर सर्वोच्च न्यायालयाने गंगेच्या खोऱ्यातील चोवीस जलविद्युत प्रकल्पांना स्थगिती दिली होती, मात्र न्यायालयाच्या निर्णयापूर्वी सरकारने सखोल अभ्यास करण्याच्या नावाखाली आणखी एक समिती नेमण्याचे कारण पुढे करून हा गंभीर विषय प्रलंबित ठेवला.

पाणी साठ्यामुळेच हिमकड्यांवर दबाव

ऊर्जा प्रकल्पांची धरणे व पाणीसाठय़ांमुळेच हिमालयाच्या ठिसूळ पर्वतरांगांवर आणि हिमकडय़ांवर प्रचंड दबाव वाढतो आहे. त्यामुळेच थंडीच्या दिवसांत आणि उंच शिखरांवर बर्फ कोसळत असतानाही हिमकडा कोसळण्याची अनोखी घटना घडली. उत्तराखंडमधील या दुर्घटनेमागे ग्लोबल वॉर्मिंग हे कारण असेलही, मात्र तज्ञांच्या समितीने हिमालयातील ऊर्जा प्रकल्प भविष्यात काळ बनून येतील, असा इशारा दिल्यानंतरही पर्यावरणाची ऐशीतैशी करणारे ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा अट्टहास हवाच कशाला? देवभूमीत जो हाहाकार झाला ती नैसर्गिक आपत्ती नव्हतीच. आपणच आपल्या हाताने पायावर मारलेली ती कुऱ्हाड आहे. केवळ हिमालयाच्या गुहेत ध्यानधारणा करून देवभूमीचे रक्षण होणार नाही. त्यासाठी देवभूमीवरील प्रकल्पांचे प्रहार थांबवावे लागतील, अन्यथा भविष्यातील पिढय़ांना यापेक्षाही मोठे हाहाकार बघावे लागतील अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यता आली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -