घरमुंबईफलाटावरच केली महिलेची प्रसूती

फलाटावरच केली महिलेची प्रसूती

Subscribe

दादर स्थानकात नेहमीच प्रवाशांची प्रचंड गर्दी असते पण या गर्दीतसुद्धा एखादी घटना सगळ्यांचेच लक्ष वेधते. रविवारी रात्री एक गरोदर महिला आपला पती आणि मुलांसह पुण्याला जाण्यासाठी दादर स्थानकात ट्रेनची वाट बघत थांबली होती. अचानक सुरू झालेल्या प्रसूतीवेदनांमुळे तिला प्रसूतीसाठी रुग्णालयात हलवणे गरजेचे होते, मात्र तितक्या कमी वेळात ते शक्य नव्हते. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रात्रपाळीस असणार्‍या दादर लोहमार्ग पोलीस ठाण्यातल्या महिला कर्मचार्‍यांनी आडोसा करत फलाटावरच तिची प्रसूूती केली आणि नंतर तिला सायन रुग्णालयात दाखल केले. महिला पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे प्रसूती सुखरूपपणे पार पडली.

मूळच्या पुण्याच्या असणार्‍या गीता दिपक सतय्या (वाघरे) या मुंबईतून पुण्याला परतत होत्या. रविवारी रात्री १ च्या सुमारास दादर स्थानकातल्या फलाट क्रमांक तीनवर त्या ट्रेनची वाट बघत उभ्या होत्या. त्यांचा पती आणि दोन लहान मुलेसुद्धा त्यांच्यासोबत होती. गरोदर असल्याने अचानकपणे त्यांना प्रसूतीवेदना सुरू झाल्या. लवकरात लवकर त्यांना रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. मात्र ते शक्य नसल्याने जवळच असलेल्या लोहमार्ग पोलीस ठाण्यातल्या महिला कर्मचार्‍यांनी तिथेच आडोसा करून प्रसूतीची तयारी सुरू केली. दादर पोलीस ठाण्यात कर्तव्यास असणार्‍या महिला पोलीस हवालदार नायणकर, महिला पोलीस शिपाई लोंढे आणि पोलीस शिपाई पिसाळ यांनी ही प्रसूती सुखरूप पार पडण्यासाठी प्रयत्न केले. प्रसूती पार पडली होती. मात्र, गीता सतय्या यांना रुग्णालयात दाखल करणे महत्त्वाचे आहे, हे समजून त्यांना सायन रुग्णालयात दाखल केले. वेळेत सगळ्या गोष्टी झाल्याने बाळ आणि माता दोघेही सुखरूप असल्याचे दादर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -