शासकीय कार्यालयाचे इमारत उद्घाटन वादाच्या भोवऱ्यात

शासकीय इमारतीचे उद्घाटन करताना स्थानिक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना निमंत्रित करणे आवश्यक असताना विक्रमगडमधील औंदे ग्रामपंचायतीच्या उद्घाटनाला सदस्यांना न बोलावताच उद्घाटनाचा कार्यक्रम उरकल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

शासकीय इमारतीचे उद्घाटन करताना स्थानिक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना निमंत्रित करणे आवश्यक असताना विक्रमगडमधील औंदे ग्रामपंचायतीच्या उद्घाटनाला सदस्यांना न बोलावताच उद्घाटनाचा कार्यक्रम उरकल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. धक्कादायक बाब म्हणजे उटावली ग्रामपंचायतीत नियमबाह्य काम केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेली ग्रामसेविका मात्र कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

ओंदे ग्रामपंचायत क्षेत्रातील जिल्हापरिषद सदस्य असल्याने शासकीय प्रोटोकॉलनुसार मला या ग्रामपंचायतीच्या नवीन इमारत उदघाटनाचे निमंत्रण देणे गरजेचे होते. मात्र या उदघाटनाचे मला कुठल्याही प्रकारचे निमंत्रण देण्यात आले नाही.
– गणेश कासट, जिल्हा परिषद सदस्य

गावाच्या विकासात ग्रामपंचायतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कार्यालयाची इमारत आकर्षक, सुसज्ज व प्रशस्त असणे कालपरत्वे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीची इमारत ही गावाची ओळख बनली आहे. आपल्याही गावाची ग्रामपंचायत इमारत ही अशीच भव्यदिव्य असावी या संकल्पनेतून ओंदे ग्रामस्थांनी पुढाकार घेत ओंदे ग्रामपंचायतीची भव्य इमारत बांधून पुर्ण झाली. या नवीन इमारतीचे उदघाटन गटविकास अधिकारी राजेंद्र खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र उदघाटन होत नाही तोच हे उदघाटन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

ओंदे ग्रामपंचायतच्या नवीन इमारतीच्या उदघाटनाची मला काहीच कल्पना नाही. मला कुठल्याही प्रकारचे निमंत्रण देण्यात आले नाही. मी या भागातील पंचायत समिती सदस्या आहे. मला निमंत्रण देणे गरजेचे होते.
– अंजली भोये, पंचायत समिती सदस्य

शासकीय इमारतीच्या उदघाटनप्रसंगी त्या क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांना बोलवणे गरजेचे असते. मात्र या उद्घाटनाचे कुठलेही निमंत्रण जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना देण्यात आले नाही. तसेच ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रतिष्ठींत व्यक्तींनाही निमंत्रण नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. उटावली ग्रामपंचायतीच्या निलंबित ग्रामसेविका वदंना प्रसाद उद्घाटनप्रसंगी हजर असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मला अजून ओंदे ग्रामपंचायतीचा कार्यभार देण्यात आलेला नाही.मला ग्रामपंचायतीकडून फोन आला कि ओंदे ग्रामपंचायत नविन कार्यालयाचे उदघाटन आहे. मला कार्यभार न दिल्यामुळे जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य व इतर ग्रामस्थांना उद्घाटनाचे आमंत्रण देताआले नाही.
– संदिप सुतार, ग्रामसेवक ग्राम पंचायत, ओंदे

पालघर जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या आदेशनुसार निलंबित ग्रामसेविका वदंना प्रसाद यांना वाडा पंचायत समिती कार्यालय दिले आहे. त्या मुख्यालय सोडून कोणाच्या परवानगीने या ग्रामपंचायतीच्या उद्घाटनाला उपस्थित राहिल्या. याबाबत जिल्हा परिषदेकडे तक्रार करणार असल्याचे माजी सैनिक तुकाराम महाले यांनी सांगितले. ओंदे येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन समारंभासाठी पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर खुताडे, सहाय्यक गटविकास अधिकारी ईश्वर पवार, ओंदे ग्रामपंचायतीच्या सरपंच चंद्रकला खुताडे, ग्रामसेवक संदीप सुतार, ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा –

मी राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत नाही, शरद पवांराची स्पष्टोक्ती