खोट्या स्वाक्षर्‍या करणार्‍या नदीमला नवी मुंबईतून अटक

arrest
प्रातिनिधीक फोटो

क्रिकेट असोसिएशनचे सदस्यत्त्व घेण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी रियाज भाटीला कॉलेज विश्वस्तांची हुबेहूब स्वाक्षरी करून देणार्‍या हस्ताक्षरतज्ञ नसीम अन्सारीला नवी मुंबईतून अटक करण्यात आली आहे. नसीमने यापूर्वीदेखील अनेकांना खोट्या स्वाक्षर्‍या करून दिल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीत उघडकीस आले आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्यत्व मिळवण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी रियाज भाटी याने एका नामांकित कॉलेजच्या विश्वस्तांची खोटी स्वाक्षरी असलेल्या पत्रावरून मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्यत्व मिळवले होते. मात्र हा प्रकार कॉलेज विश्वस्तांच्या लक्षात येताच त्यांनी रियाज भाटी याच्याविरोधात पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. तक्रार केल्याचे समजताच रियाज भाटी त्याने कॉलेज विश्वस्तांना कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देण्यास सुरुवात केली. अखेर हे प्रकरण मुंबई खंडणी विरोधी पथकाकडे जाताच पथकाने रियाज भाटी याला गेल्या आठवड्यात अटक केली होती.

रियाज भाटीला कॉलेज विश्वस्तांची हुबेहूब स्वाक्षरी करून देणारा नदीम अन्सारी आहे, अशी माहिती मिळताच खंडणी विरोधी पथकाने त्याचा शोध घेऊन नवी मुंबईतून त्याला अटक केली. नदीम हा हस्ताक्षरतज्ञ असून तो स्वाक्षरी बघून त्याची हुबेहूब नक्कल करतो. तो या क्षेत्रात ‘हॅन्डरायटिंग एक्सपर्ट’ म्हणून ओळखला जातो.

नदीमने रियाज भाटी याच्याकडून पैसे घेऊन कॉलेज विश्वस्ताची हुबेहूब स्वाक्षरी करून दिली होती. नदीम याने यापूर्वी बँक कर्जासाठी अनेकांकडून पैसे घेऊन कागदपत्रांवर खोट्या स्वाक्षर्‍या करून दिल्या होत्या. त्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल असून त्याला यापूर्वी अटकदेखील झाली होती, अशी माहिती समोर येत आहे.