Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई आरोग्य यंत्रणेचीच हेल्थ बिघडलेय

आरोग्य यंत्रणेचीच हेल्थ बिघडलेय

Related Story

- Advertisement -

२०१९ या वर्ष वैद्यकीय क्षेत्रात बर्‍याच घडामोडी घडल्या. ज्यात सरकारी, पालिका आणि खासगी या तिन्ही क्षेत्रांचा समावेश आहे. खरंतर गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य विभागात सुधारणा झाली पाहिजे अशी बोंब आहे. पण, यावर प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष केलं गेलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

२०१९ या वर्षात लोकांना दिल्या गेलेल्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून सुविधा आणि सेवा लक्षात राहण्यापेक्षा हॉस्पिटलमध्ये गाजलेली प्रकरणं सर्वात जास्त लक्ष राहिली. त्या बातम्या लोकांनी अगदी चवीचवीने वाचल्या. त्यावर भाष्य केलं आणि त्यातूनच सरकारच्या आणि पालिकेच्या आरोग्य विभागाला अजूनही अनेक परिक्षा द्यावा लागणार आहेत हे उघड झालं.

- Advertisement -

पालिकेच्या नायर हॉस्पिटलमध्ये डॉ. पायल तडवी या महिलेला झालेली रॅगिंग आणि त्यातून केलेल्या आत्महत्या प्रकरणानंतर पालिका हॉस्पिटलमध्ये अजूनही होणार्‍या रॅगिंग प्रकरणांना वाचा फोडली. त्यातून हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या डॉक्टरांना आणि त्यांना असिस्ट करणार्‍या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात समुपदेशनाची गरज असल्याचं स्पष्ट झालं. शिवाय, डॉ. तडवी या प्रकरणाला अनेक वळणं या दरम्यान देण्यात आली. जातीवरुन राजकारण केलं गेलं. हे प्रकरण २०१९ वर्षात फारच गाजलं.

या प्रकरणाला निस्तरत असताना पालिकेचं केईएम हॉस्पिटल प्रकाशझोतात आलं. हॉस्पिटलमध्ये एका पाठोपाठ तीन वेगवेगळी प्रकरणं घडली. ज्यामुळे केईएम हॉस्पिटलच्या रुग्ण सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला.उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या राजभर कुटुंबातील प्रिन्स नावाचा अडीच महिन्यांचा मुलगा केईएम हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल झाला होता. हॉस्पिटलमध्ये बालकांच्या अतिदक्षता विभागात ७ नोव्हेंबरला ईसीजी मशीनमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे लागलेल्या आगीत प्रिन्स गंभीर जखमी झाला. त्याचा डावा हात भाजल्यामुळे तो हात शस्त्रक्रिया करून काढून टाकण्यात आला. पण, उपचार करुनही प्रिन्सचा मृत्यू झाला. प्रिन्सच्या कुटुंबियांनी या घटनेतून सावरावं म्हणून पालिकेकडून त्याच्या नातेवाईकाला दहा लाखांची मदत केली. पण, ही मदत नक्कीच प्रिन्सला पुन्हा आणू शकत नाही.त्यापाठोपाठ, केईएम हॉस्पिटलमध्ये मांजरीने मानवी भ्रूण खाल्ल्याचा प्रकार घडला आहे. त्यातून हॉस्पिटल प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आला. आणि तिसर्‍या प्रकरणात एका नऊ वर्षाच्या मुलाचा डॉक्टरांनी चुकीचे औषध दिल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. घरी घ्याव्या लागणार्‍या औषधांमध्ये एक गोळी मोठ्या आकाराची होती. ती गरम दुधातून घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. तरीही गोळी घशात अडकून मुलाला अस्वस्थ वाटू लागले. उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आणताना त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे, चुकीच्या औषधामुळे मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला. या तिन्ही प्रकरणांमुळे केईएम हॉस्पिटल वर्षाअखेरीस सर्वांच्या लक्षात राहिले. त्यात पालिका हॉस्पिटलमध्ये नेहमीप्रमाणे औषधांच्या आणि रक्ताच्या तुटवड्याचा मुद्दाही भरपूर गाजला.

एमआरआय, सिटीस्कॅनसाठी वाढती प्रतिक्षा यादी 

- Advertisement -

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आता स्वत: मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत. त्यात महानगर पालिकेत मुख्यमंत्र्यांच्या पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांच्या महाविकासआघाडीला आता पालिकेच्या प्रमुख चार म्हणजेच केईएम, सायन, नायर आणि कूपर तसंच, १६ उपनगरीय हॉस्पिटलवर तत्परतेने लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण, आजही उपनगरीय हॉस्पिटलमध्ये पुरेशा उपलब्ध नसलेल्या सुविधांमुळे छोट्या छोट्या तपासणींसाठीही रुग्णांना या चार प्रमुख हॉस्पिटलमध्ये फेर्‍या माराव्या लागतात. शिवाय, एमआरआय, सिटीस्कॅन, आयसीयू, एक्स-रे या विभागातील सेवांचा उपभोग घेण्यासाठी रुग्णांना महिनोंमहिने प्रतिक्षा यादीत राहावं लागतं. त्यामुळे हे वर्ष पालिका हॉस्पिटलसाठी तितकंस चांगलं राहिलं नाही.

सरकारी हॉस्पिटलकडून वेगवेगळ्या सुविधांच्या घोषणा 

२०१९ या वर्षात सरकारी हॉस्पिटलकडून रुग्णांना वेगवेगळ्या सुविधा दिल्या जात होत्या. सरकारच्या सर जेजे समुह हॉस्पिटल अंतर्गत येणार्‍या सेंट जॉर्ज, जीटी या हॉस्पिटलची कामगिरी बर्‍यापैकी होती. कामा या फक्त महिलांच्या हॉस्पिटलमध्ये संसर्गामुळे अर्भकांचा मृत्यू होण्याच्या घटनेतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरावड्यातच ४ अर्भकांचा मृत्यू झाला होता. ही आकडेवारी वर्षाच्या अखेरीसही वाढतच होती. त्याआधी डॉ. राजश्री कटके या कामा हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिक्षिका ही वादाच्या भोवर्‍यात अडकल्या होत्या. त्यामुळे, त्यांची जे.जे मध्ये केलेली बदली थेट अंबोजोगाईला करण्यात आली. डॉ. कटके यांच्यानंतर अधिक्षक पदी विराजमान झालेल्या डॉ. अमिता जोशी यांचंही हॉस्पिटलकडे दुर्लक्ष होत असल्याचा सूर आजही कर्मचार्‍यांकडून येत आहे. त्यामुळे, या एकमेव महिलांच्या हॉस्पिटलकडेही सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

डॉ. अजय चंदनवाले यांच्या रुपाने जे.जे हॉस्पिटल समुहाला शिस्त लागत असताना त्यांची देखील बदली करण्यात आली. त्यांच्याकडे थेट वैद्यकीय शिक्षण व संचालनायाच्या सह-संचालकपदाचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला. सध्या डॉ. पल्लवी सापळे या जे.जे हॉस्पिटल समुहाचा संपूर्ण कार्यभार हाताळत आहेत. पण, त्यांनी ही अजून या सर्व प्रशासकीय बाबींकडे गांभिर्याने बघणं तेवढंच गरजेचं आहे.

अवयवदानात महाराष्ट्र अग्रेसर 

सतत केल्या जाणार्‍या जनजागृतीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अवयवदानाला उत्तम प्रतिसाद मिळाला. अवयवदानात महाराष्ट्र पहिल्या स्थानी आहे. तर, मुंबई आणि ठाण्यात यंदा सर्वात जास्त अवयवदान झालं आहे. आतापर्यंत मुंबईत ७६ अवयवदान झाले आहेत. पण, ही जनजागृती इथवर थांबून उपयोग नाही कारण, अवयवदानाच्या प्रतिक्षेत असणारी यादी ही वाढती आहे.

टीबी, कर्करोग यावर चांगले उपचार असणं गरजेचं 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत टीबीमुक्त भारत असं स्वप्न पाहिलं आहे. पण, टीबीच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ आणि त्यावर दिले जाणारे उपचार हे कमी पडत आहेत. टीबीवर दिल्या जाणार्‍या औषधांवर संशोधन होऊन ते रुग्णांना लवकरात लवकर कसे उपलब्ध होतील यावर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे. कर्करोग रुग्णांची संख्या ही वाढती आहे. कर्करोगाच्या विषाणूंवर संशोधन करुन योग्य निदान आणि तात्काळ उपचार मिळाले तर कर्करोगातून होणार्‍या मृत्यूंची संख्या नक्कीच रोखता येईल. एकूणच जर २०१९ या वर्षाचा आढावा घेतला तर हे वर्ष आरोग्य क्षेत्रासाठी प्रतिकूल होतं.

- Advertisement -