घरमुंबईमंत्रालयातील अधिकारी मस्त, सुरक्षारक्षक मात्र त्रस्त

मंत्रालयातील अधिकारी मस्त, सुरक्षारक्षक मात्र त्रस्त

Subscribe

अग्निशमन दलाचे जवान ढेकणांनी हैराण , महिला पोलिसांच्या खोलीत उंदरांचा सुळसुळाट

मंत्रालय…मुंबईतील प्रशस्त अशी ही सरकारी इमारत…याच इमारतीतून चांद्यापासून बांद्यापर्यंतचा राज्याचा गाडा हाकला जातो. आघाडीच्या काळात आग लागल्यानंतर कोट्यवधी रुपये खर्च करून हीच मंत्रालयाची इमारत चकाचक करण्यात आली आणि त्याची चर्चाही सर्वत्र झाली. मंत्री आणि अधिकार्‍यांना विविध सुविधा देण्यात आल्या. पण सर्वात धक्कादायक आणि लज्जास्पद गोष्ट अशी की, मंत्रालयाच्या या इमारतीत मंत्री आणि अधिकार्‍यांची सुरक्षा करणारे अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यांच्या गैरसोयीला पारावार उरलेला नाही, असेच म्हणावे लागेल.

मंत्रालयात अग्निशमन दलाचे जवान आणि मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांसाठी मंत्रालयात दोन खोल्या देण्यात आल्या आहेत. मात्र या खोल्यांची अवस्था फारच दयनीय आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना जी खोली देण्यात आली आहे त्यामध्ये ना धड पाण्याची व्यवस्था ना बसण्याची. या खोलीमध्ये ढेकणांनी उच्चाद मांडला आहे. त्यामुळे जवान हैराण झालेले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांना जमिनीवर चक्क पुठ्ठे टाकून जेवायला बसावे लागते. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या खोलीमध्ये जे पंखे लावण्यात आले आहेत तेदेखील बंद असल्याची माहिती या जवानांनी आपलं महानगरला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांच्या खोलीत चार पंखे असून यातील दोन पंखे पूर्णत: बंद आहेत. तर उरलेले दोन पंखेदेखील धड चालत नसल्याचे या जवानांंनी सांगितले. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोयही करण्यात आलेली नाही. जवानांना प्रत्येक वेळी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत जाऊन पाण्याच्या बॉटल्स भरून आणाव्या लागतात. या खोलीमध्ये साधे हात धुण्यासाठी वॉशबेसिनदेखील नाही. इतकेच नव्हे तर, नुकतेच मंत्रालयाच्या साफसफाईचे कंत्राट मिळालेल्या क्रिस्टलला जी खोली देण्यात आलेली आहे त्यामध्ये मात्र वॉशबेसिन वैगरे बसवण्यात आलेले आहे.

- Advertisement -

या समस्यांबद्दल वारंवार वरिष्ठांंना सांगूनही कुणीच लक्ष देत नाही. विशेष म्हणजे नोकरीवर गदा येण्याच्या भीतीने कुणी आवाज उठवत नाही, अशी प्रतिक्रिया अग्निशमन दलाच्या जवानांनी आपलं महानगरला दिली. आपल्याला होणार्‍या त्रासाबद्दल या जवानांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिसला सांगितले. मात्र कायमस्वरुपी उपाययोजना न करता तात्पुरती मलमपट्टी करून जात असल्याचा आरोप या जवानांनी केला. तसेच या जवानांना कपडे, बूट ठेवण्यासाठी चांगले कपाट देणे गरजेचे आहे. मात्र दिलेले कपाटदेखील व्यवस्थित नाही.

मंत्रालयात लागलेल्या आगीवर किंवा एखाद्या दुर्घटनेवर त्वरीत नियंत्रण मिळवण्यासाठी मंत्रालयात अग्निशमन दलाचे जवान २४ तास तैनात असतात. हे जवान तिन्ही शिफ्टमध्ये मंत्रालयात काम करत असतात. यामध्ये फायरब्रिगेड आणि ड्रायव्हर यांचा समावेश असतो. त्यामुळे या जवानांना मंत्रालयाच्या सार्वजनिक विभागाकडून एक खोली देण्यात आली आहे. मात्र या खोलीची अवस्था पाहिली तर नको रे बाबा अशी खोली असे वाटेल. जशी अवस्था अग्निशमन दलाच्या जवानांना दिलेल्या खोलीची आहे तशीच अवस्था महिला पोलिसांच्या खोलीची असल्याचे निदर्शनास आले आहे. या एका खोलीत मंत्रालायाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या ५० महिला पोलीस कर्मचारी राहतात. मात्र या खोलीतही कसलीच सुविधा नाही. या खोलीत तर दिवसाढवळ्या उंदरांचा वावर पाहायला मिळतो. मात्र याबद्दल तिथे उपस्थित असलेल्या महिला पोलिसांना विचारले असता त्यांनी वरिष्ठांच्या भीतीने बोलण्यास नकार दिला. महिला पोलिसांना तरी एक खोली देण्यात आली आहे, पण पुरुष पोलिसांच्या नशिबी तीदेखील नसल्याची माहिती मिळत आहेत. पोलीस पुरुष तर मंत्रालयातील वॉशरुममध्ये आपले कपडे अनेकदा बदलतात.

- Advertisement -

अधिकार्‍यांना मात्र सर्व सुविधा –

याच खोल्यांना लागून असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात, तसेच इतर अधिकार्‍यांच्या खोल्यांमध्ये सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. या खोल्यांमध्ये एसी, पिण्याच्या पाण्याची सोय, बेसिन अशा सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. मात्र त्याच मंत्रालयाचे रक्षण करणार्‍या जवानांकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे मंत्रालयातील मंत्री, अधिकारी मस्त तर सुरक्षारक्षक त्रस्त असेच म्हणण्याची वेळ आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -