घरमुंबई‘स्वच्छ सर्वेक्षण 2019’ करिता शहरातील भिंती रंगीबेरंगी

‘स्वच्छ सर्वेक्षण 2019’ करिता शहरातील भिंती रंगीबेरंगी

Subscribe

प्लास्टिक, थर्माकोल विरोधात जागृती

स्वच्छतेत सुरूवातीपासूनच जागरूकता दाखवत आघाडीवर असणारे शहर म्हणून जनतेच्या सक्रीय सहभागाने नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच आघाडीवर राहिली आहे. यामुळेच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राबविल्या जाणा-या स्वच्छ सर्वेक्षणात प्रत्येक वर्षी शहरांच्या संख्येत वाढ होऊनही नवी मुंबई महानगरपालिकेने आपले मानांकन उंचावत ठेवले आहे. याच अनुषंगाने यावर्षीही स्वच्छ सर्वेक्षण 2019 करिता नवी मुंबई शहर सज्ज झाले असून आठही विभाग कार्यालय क्षेत्रात लोकसहभागातून स्वच्छताविषयक विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

स्वच्छता संदेशांचे विविध माध्यमातून प्रसारण करण्यात येत आहे. या अनुषंगाने शहरातील दर्शनी भागातील मोक्याच्या भिंती स्वच्छता संदेशांसह आकर्षक रंगसंगतीत रंगू लागल्या आहेत. या रंगतदार भिंती लक्ष वेधून घेत असून त्यामधून शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडण्यासोबतच स्वच्छतेचा संस्कारही नागरिकांच्या मनावर बिंबवला जात आहे. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण व झोपडपट्टी भागातही ओला व सुका कचरा निर्माण होतो. त्याच ठिकाणी वेगवेगळा करणे व कचरा गाडीतही वेगवेगळा देणे या करिता प्रत्यक्ष संपर्काद्वारे सुसंवाद, पथनाट्यासारखे मनोरंजक कलाप्रकार या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. प्लास्टिक व थर्माकोलच्या वापरावरही प्रतिबंध आणण्याबाबत जागृती करण्यात येत आहे.

- Advertisement -

आपण निर्माण करीत असलेल्या कच-याची आपणच विल्हेवाट लावू शकलो तर क्षेपणभूमीपर्यंत कचरा वाहून नेण्याचा खर्च वाचेल व पर्यायाने हा निधी नागरिकांनाच सुविधा पुरविण्यासाठी वापरता येईल. अशाप्रकारे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. आपला परिसर व आपले शहर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, हे लक्षात ठेवून सार्वजनिक ठिकाणी कचरा न करणे आणि आपल्या कच-याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी आपणच पुढाकार घेणे एवढे जरी प्रत्येक नागरिकाने मनाशी पक्के ठरवले तरी आपले शहर स्वच्छतेत नेहमीच अग्रभागी राहील. याकरिता प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक व शहर स्वच्छतेत आपले संपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन महापौर जयवंत सुतार व महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -