घरताज्या घडामोडीसार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीन अधिकाऱ्यांना अटक; १ लाख ४० हजारांची लाच घेताना एसीबीची कारवाई

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीन अधिकाऱ्यांना अटक; १ लाख ४० हजारांची लाच घेताना एसीबीची कारवाई

Subscribe

कार्यालयातून पोलिसांनी १३ लाख १५ हजार रुपयांची कॅश जप्त केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीन अधिकाऱ्यांना लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. कार्यकारी अभियंता एम. वाय शंखपाळे, शाखा अभियंता महेंद्र भानुदास ठाकूर आणि लघु टंकलेखक संतोष अरविंद शिर्के अशी या तिघांची नावे आहेत. सात लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच आधीच घेतल्यानंतर उर्वरित ९० हजार रुपयांची लाचेची रक्कम घेताना ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी या कार्यालयातून पोलिसांनी १३ लाख १५ हजार रुपयांची कॅश जप्त केली आहे. एकाच वेळेस तीन अधिकाऱ्यांच्या अटकेने संबंधित विभागातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.

ही कारवाई गुरुवारी अंधेरी येथील भवन्स कॉलेजसमोरील दादाभाई मार्ग, उत्तर मुंबई प्रशासकीय इमारत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात झाल्याचे सांगण्यात आले. या परिसरात शंकपाळे हे कार्यकारी अभियंता, महेंद्र ठाकूर हे शाखा अभियंता, तर संतोष शिर्के हे लघु टंकलेखक म्हणून कार्यरत आहेत. यातील तक्रारदार सेवानिवृत्त झाले असून ते सध्या त्यांच्या मुलीच्या बांधकाम व्यवसायात मदत करतात.

- Advertisement -

२०१५-१६ साली त्यांच्या मुलीच्या कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागासाठी सात लाख रुपयांचे काम केले होते. या कामाचे त्यांना बिल मंजूर झाले होते. त्यामुळे कंपनीच्या वतीने संबंधित विभागात अर्ज करण्यात आला होता. मात्र अर्ज करुनही कार्यालयात हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी बिल मंजूर करण्यासाठी महेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी दोन बिले अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यासाठी त्यांच्याकडे दीड लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी शंकपाळे यांची भेट घेतली आणि त्यांनी त्यांना संतोष शिर्के यांच्याकडे पाठविले. यावेळी त्यांनीही त्यांच्याकडे बिल मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. मंजूर केलेल्या रक्कमेच्या २० टक्के म्हणजेच १ लाख ४० हजार रुपयांची लाच दिल्यानंतर ते बिल मंजूर करण्यात येतील असे संतोष शिर्के यांनी सांगितले.

त्यासाठी त्यांनी पहिला ५० हजार रुपयांचा हप्ता घेतला होता. उर्वरित ९० हजार रुपये नंतर देण्याचे ठरले होते आणि ही रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर गुरुवारी संतोष शिर्के यांना शंखपाळे यांच्या आदेशावरुन तसेच महेंद्र ठाकूर यांच्या सांगण्यावरुन लाचेची ९० हजार रुपयांची लाच घेताना या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्या अटकेनंतर इतर दोन्ही बड्या शासकीय अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. यावेळी संतोष शिर्केच्या कार्यालयातील कपाटातून पोलिसांनी १३ लाख १५ हजार रुपयांची कॅश जप्त केली आहे. दरम्यान या कारवाईनंतर त्यांच्या राहत्या घरी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले होते, पण या कारवाईचा तपशील समजू शकला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -