घरमुंबईवसईतील 14 अनधिकृत शाळांना टाळे

वसईतील 14 अनधिकृत शाळांना टाळे

Subscribe

शिक्षण विभागाची धडक कारवाई सुरू

अनधिकृत शाळा बंद करण्याची नोटीस बजावूनही शाळा सुरु ठेवल्याने शिक्षण विभागाने वसई तालुक्यातील 14 अनधिकृत शाळांना टाळे ठोकण्याची कारवाई केली.

वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासनाच्या हद्दीत तयार झालेल्या आणि होत असलेल्या अनधिकृत शाळांनी शिक्षणाचे अक्षरक्ष: बाजारीकरण मांडले आहे. मध्यंतरी जिल्हा शिक्षण विभागाने अनधिकृत शाळांमध्ये पालकांना त्यांच्या मुलांना प्रवेश न देण्यासंदर्भात आवाहन केले होते. त्यानंतर सुमारे 150 अनधिकृत शाळांपैकी काही शाळांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. नुकतेच शिक्षण विभागाने वसईतील आणखी 14 शाळांवर कारवाई करत त्यांना टाळे ठोकले आहे.

- Advertisement -

शिक्षण विभागाने 14 अनधिकृत शाळा बंद करण्यापूर्वीदेखील 39 शाळांवर याआधी कारवाई केली होती. त्यावेळी इतर शाळांनाही नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. काही शाळांना मान्यतेची प्रक्रिया सुरु केली आहे तर काही राजरोसपणे सुरु आहेत. त्यामुळे सध्या 14 शाळांना टाळे ठोकण्याबरोबरच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. वसई-विरार शहर महापालिका हद्दीत सुमारे 150 अनधिकृत शाळा असल्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी जाहीर केले होते. या 150 अनधिकृत शाळांची यादी जाहीर करून पालकांनी विद्यार्थ्यांना या शाळेत दाखल न करण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले होते.

त्यानंतर 150 पैकी फक्त 25 शाळांनीच शिक्षण विभागाची मान्यता घेतल्याचे समोर आले असले तरी अन्य अनधिकृत शाळांमध्ये हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे. शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अनधिकृत शाळा थाटणे, त्यातून सामान्य पालकांची पर्यायाने विद्यार्थ्यांची फसवणूक करणे, अव्वाच्या सव्वा प्रवेश शुल्क आकारणे अशा एक ना अनेक कारणांमुळे या अनधिकृत शाळा समोर आल्या आहेत. पालकांचा या शाळांविरोधातील रोष वाढत असताना जिल्हा शिक्षण विभागाने आता थेट कारवाई सुरु केली आहे.

- Advertisement -

अनधिकृत शाळांची यादी जिल्हा शिक्षणाधिकार्‍याकडून जाहीर झाल्यानंतर या शाळांविरोधात आता कारवाईला सुरूवात झाली आहे. आत्तापर्यंत शिक्षण विभागाने विरार, कळंब, पेल्हार, दहीसर या केंद्रांतील 14 अनधिकृत शाळा बंद केल्या आहेत. तर इतर काही शाळांवर गुन्हे दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. आत्तापर्यंत 150 अनधिकृत शाळांपैकी 25 शाळांनी शासन मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केले असल्याची माहिती वसईचे पंचायत समिती प्रशासनाकडून देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -