घरमुंबईदुसऱ्यांना स्वच्छतेचे धडे, विद्यापीठाचीच मात्र बोंब!

दुसऱ्यांना स्वच्छतेचे धडे, विद्यापीठाचीच मात्र बोंब!

Subscribe

लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वत: कोरडे पाषाण ही सर्वश्रुत म्हण सध्या मुंबई विद्यापीठाच्या बाबत खरी ठरत आहे. स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात होऊन तीन वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. स्वच्छ भारत अंतर्गत भारतभर विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. यामध्ये मुंबई विद्यापीठानेदेखील मोठा गाजावाजा करत सहभाग घेतला होता. मात्र काही काळ स्वच्छता अभियान राबवल्यानंतर आता मुंबई विद्यापीठालाच स्वच्छतेबद्दल विसर पडल्याचे चित्र विद्यापीठ आवारात दिसत आहे. विद्यापीठात ठिकठिकाणी धुळीचे साम्राज्य असून काही ठिकाणी कचरा उघड्यावरच टाकला आहे. या अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

मुंबई विद्यापीठात मुंबईतीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय विद्यार्थीदेखील दरवर्षी मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेण्यासाठी येतात. अशा वेळी विद्यापीठातील अस्वच्छतेमुळे विद्यापीठाची प्रतीमा मलीन होत आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने याची दखल घेऊन स्वच्छता राखावी असे मत तेथील विद्यार्थ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर आपलं महानगरच्या प्रतिनिधीजवळ व्यक्त केले.
विद्यापीठातील इमारतींची स्वच्छता दररोज करण्यात येते, मात्र इमारतीबाहेरील परिसराची दुरवस्था झाली आहे. या स्वच्छतेकडे अधिक लक्ष दिले जात नाही. तुटलेले कचऱ्याचे डब्बे, रॅबिटचा ढिगारा, गाड्यांवर साचलेली धूळ, इमारतीलगत असलेल्या आवारात पडलेला कचरा अशी अनेक अस्वच्छतेची उदाहरणे बघायला मिळत आहेत. विद्यापीठ सफाईसाठी दरवर्षी बजेट काढून देखील सफाईच्या नावे बोंब असल्याचे दिसून आले आहे.

- Advertisement -

मुंबई विद्यापीठच नव्हे तर इतर महाविद्यालयांमध्ये देखील स्वच्छता राखण्याची गरज आहे. पुढील महिन्यापासून पावसाळा सुरु झाल्यानंतर पाणी साचल्याने होणारे आजार टाळण्यासाठी परिसर स्वच्छ असणे आवश्यक आहे. विद्यापीठाचे निकाल पार पडल्यानंतर युवा सेना स्वच्छतेबाबत संबधित अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.

राजन कोळंबेकर, सिनेट सदस्य

- Advertisement -

“एका कामगाराला चार इमारतींचे काम करावे लागते. सर्व विभागाला पुरेसे कामगार दिले पाहिजेत. विद्यापीठातील रॅबिट तसेच उघड्यावर टाकले जाते. ते वेळेवर उचलले जात नाही. देशातील पंतप्रधानांचा शब्द विद्यापीठ पाळत नाही. काही वर्षांपूर्वी स्वच्छ भारत आंतर्गत विद्यापीठात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. पण ती फक्त त्या दिवसा पूर्तीच होती.”

सचिन बनसोडे, अध्यक्ष, छात्र भारती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -