Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई वसई-विरार पालिकेत 122 कोटींचा अपहार

वसई-विरार पालिकेत 122 कोटींचा अपहार

25 ठेकेदारांवर गुन्हा दाखल

Related Story

- Advertisement -

ठेका कर्मचार्‍यांची आर्थिक पिळवणूक आणि सरकारी कर चोरी करून सुमारे 122 कोटींहून अधिक रकमेचा अपहार केल्याप्रकरणी वसई-विरार महापालिकेच्या 25 ठेकेदारांवर विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुलै 2009 साली वसई-विरार महापालिकेची स्थापना झाली. तेव्हापासून फेब्रुवारी 2018 पर्यंत ठेका पद्धतीने कर्मचारी पुरवण्याचे काम करणार्‍या ठेकेदारांनी हा अपहार केला आहे.

पालिकेसाठी वकील,अभियंते, डॉक्टर, आरोग्य आणि अग्निशमन कर्मचारी, संगणक चालक, लिपीक, मजूर, सुरक्षारक्षक आणि वाहनचालक पुरवण्याचा ठेका या 25 ठेकेदारांकडे होता. यात 3165 पेक्षा जास्त कर्मचारी या ठेकेदारांनी पुरवले होते. या सर्वांची आर्थिक पिळवणूक झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. शिवाय कर्मचारी आणि ठेक्यातील सेवा पुरवताना सरकारचा संबंधित प्रक्रियेतील कर ठेकेदाराकडून भरला नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

यात देयकासोबत आवश्यक कागदपत्रे आणि वैधानिक तरतुदींची पुर्तता नसताना दरमहा लाखो रुपयांची देयके मंजुर करून ठेकेदाराला रक्कम देणार्‍या महापालिका अधिकारी आणि कर्मचार्‍यांचाही या संपूर्ण प्रकरणात समावेश आहे. पालिका अधिकार्‍यांच्या आशिर्वादामुळे या ठेकेदारांनी कर्मचार्‍यांना किमान वेतन, कर्मचारी भविष्य निधी तसेच ईएसआयसीच्या संरक्षण लाभापासून वंचित ठेवून वेठबिगारासारखे राबवून घेतल्याचे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांना माहिती अधिकारात समजले. तसेच या ठेकेदारांनी शासनाचा 29.51 कोटींचा सेवाकर आणि व्यवसाय कर, कर्मचारी वेतन 92.97 कोटी असा एकूण 122.48 कोटी रुपयांचा अपहार केल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.

हे सर्व पुरावे सादर करून मनोज पाटील यांनी पालघरचे पोलीस अधिक्षक गौरव सिंग यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार गौरव सिंग यांनी आदेश दिल्यानंतर विरार पोलीस ठाण्यात या सर्व ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच या सर्वांची धरपकड करण्यात येणार आहे.

- Advertisement -

या प्रकरणी नियमानुसार जी काही कारवाई असेल ती करण्यात येईल.
-बी. जी. पवार, आयुक्त, वसई विरार शहर महानगर पालिका

- Advertisement -